ठाण्यात भाजपचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

तोडफोड करून कार्यालयात डिझेल ओतले

    08-Mar-2023
Total Views |

Thane BJP Office
 
 
ठाणे : वर्तकनगर येथील महात्मा फुलेनगर भागात भाजपाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय बिस्वाल यांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. घटना घडली त्यावेळी कार्यालयात कोणीही नव्हते, असे बिस्वाल यांनी सांगितले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.
 
वर्तकनगर येथील महात्मा फुलेनगर भागात धनंजय बिस्वाल हे वास्तव्यास असून ते ठाणे शहर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. या परिसरात त्यांचे एकमजली घर असून सुमारे महिन्याभरापूर्वी त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावर भाजपाचे कार्यालय सुरू केले आहे. मंगळवारी धुलिवंदनानिमित्ताने ते घरात असताना पहाटे ५ वाजताच्या सुमारास अचानक कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्याचा त्यांना आवाज झाला. त्यामुळे ते कार्यालयात शिरले असता, एक व्यक्ती त्यांच्या कार्यालयामध्ये डिझेल ओतत होता. बिस्वाल यांना पाहताच त्याने आपल्या साथिदारासमवेत धूम ठोकली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी बिस्वाल यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ठाण्यात भाजपला जनाधार वाढत आहे. त्यामुळे राजकिय असुयेतुन कुणीतरी हे समाजविघातक दुष्कृत्य केले असावे. पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास असुन लवकरच या समाजकंटकांचा छडा पोलीस लावतील.
 
- धनंजय बिस्वाल, ठाणे भाजयुमो उपाध्यक्ष.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.