बेडकांच्या विश्वात

    19-Mar-2023
Total Views |
Frog

बेडूक आणि इतर उभयचरांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी दि. २० मार्च रोजी जागतिक बेडूक दिन साजरा केला जातो. बेडूक हे केवळ रंजक नाहीत, तर ते आपल्या पर्यावरणातही महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यांचे जीवनचक्र पाण्याशिवाय अपुरे आहे, अशा या उभयचर प्राण्याविषयी जाणून घेऊया.

भारतातील बेडकांच्या प्रजाती


बेडूक हा उभयचर प्राणी आहे. उभयचर म्हणजे असे प्राणी जे त्यांच्या जीवनचक्रातील काही काळ पाण्यामध्ये व उर्वरित काळ जमिनीवर व्यतित करतात. जगामध्ये उभयचर प्राण्यांच्या ८,५८८ प्रजाती आढळून येतात. भारतामध्ये उभयचरांच्या ४५४ प्रजाती आहेत यापैकी बेडकांच्या ४११ प्रजाती आहेत. महाराष्ट्रामध्ये उभयचरांच्या ४३ प्रजातींची नोंद झाली आहे. यापैकी बेडकांच्या ३७ प्रजाती आहेत अठराव्या शतकामध्ये भारतीय व परदेशी वन्यजीव अभ्यासकांनी भारतातील उभयचर प्राण्यांची शास्त्रीय वर्गवारी (systematics) करण्यास सुरवात केली.

बेडकांबद्दलच्या गैरसमजुती


बेडूक विषारी असतात -काही बेडकांच्या जाती विषारी असतात. मध्य व दक्षिण अमेरिकेच्या जंगलांमध्ये सापडणारे ‘पॉईझन डार्ट फ्रॉग’ हे अतिशय विषारी असतात. त्यांच्या त्वचेमधून विषाचा स्त्राव होतो. परंतु, भारत व भारतीय उपखंडामध्ये एकही विषारी बेडूक आढळत नाही. बेडकांचे लग्न लावल्याने पाऊस पडतो. भारतामध्ये बर्‍याच ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातीला बेडकांचे लग्न लावले जाते, उत्तर-पूर्व राज्यांमध्ये तर काही ठिकाणी हा मोठा सण साजरा केला जातो. पण यामागे कोणतेही शास्त्रीय तथ्य नाही.

बेडकांचा स्पर्श झाल्यास अंगावर फोड येतात - भारतामध्ये बेडकाची एकही विषारी प्रजाती नाही, त्यामुळे आपल्या येथील बेडकांचा स्पर्श झाल्यास कोणताही आजार किंवा बाधा होत नाही.बेडूक घरात आल्यास धनप्राप्ती होते - यामागेही कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. अंगणातील दिव्यांवर येणारे किडे खाण्यासाठी बेडूक बर्‍याच वेळेला घराजवळ अथवा घराच्या आत येतात.

बेडूक व त्यांचे आवाज

 
प्राणी, पक्षी, किटक, मासे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आवाज देत असतात. माणसाला जशी संवाद साधण्यासाठी भाषेची गरज असते तशीच या जीवांनासुद्धा असते. माणसाएवढे प्रगत नसले तरी हे जीव एकमेकांशी संवाद साधून संदेश देण्याचे काम करतात. हे संदेश आणि आवाज नेक प्रकारचे असू शकतात. बेडकांच्या ओरडण्याला सुद्धा असेच कारण आहे. बेडकांचे नर डबक्याभोवती जमून आवाज देतात, हे आवाज मादीला आकर्षित करण्यासाठी व दुसर्‍या नराशी स्पर्धा करण्यासाठी असतात. काही मोजके अपवाद वगळले तर इतर सर्व जातींमध्ये फक्त नर बेडूक आवाज देऊ शकतो. बेडकाच्या गळ्याखाली एक किंवा दोन (प्रजातीनिष्ठ) त्वचेच्या पिशव्या (vocal sacs) असतात. स्वरयंत्रामधून तयार होणार्‍या आवाजाची तीव्रता या पिशव्यांमध्ये वाढवली जाते आणि मग हा आवाज आजूबाजूच्या परिसरात प्रसारित होतो. बेडकांच्या विविध प्रजाती भिन्न प्रकारचे आवाज काढतात, यामध्ये कर्कश किंचाळी सारख्या आवाजापासून अगदी मधुर शिट्टीसारखा आवाज करणारे बेडूक सुद्धा आहेत. जसा प्रत्येक पक्षाचा आवाज वेगळा असतो तसाच बेडकांच्या प्रत्येक प्रजातीचा आवाज वेगळा असतो.


‘इंडियन बुल फ्रॉग’ (Hoplobatrachus tigerinus, मराठी नाव - सोन्या बेडूक) ही भारतामध्ये आढळणारी बेडकाची सर्वात मोठी प्रजाती आहे. इतर महिन्यात हिरवट रंगाचे दिसणार्‍या या प्रजातीच्या नरांचा रंग पावसाळ्यात पिवळा धमक होतो, गळ्याखाली दोन मोठ्या जांभळ्या रंगाच्या पिशव्या दिसतात. पहिल्या दोन जोराच्या पावसानंतर हे पिवळे नर मोठ्या डबक्यांमध्ये एकत्र येतात आणि बैलासारखा आवाज देऊन माद्यांना आकर्षित करतात. महाराष्ट्रातील आंबोलीमध्ये सापडणार ‘नॉदर्न डान्सिंग फ्रॉग’ (Micrixalus uttaraghati) हा लहानसा बेडूक जंगलांमधील झर्‍यांमध्ये राहतो. पावसाळा संपल्यानंतर झर्‍यांमधील पाणी कमी होते. त्यावेळी हा बेडूक मादीला आकर्षित करण्यासाठी उच्च वारंवारतेचा (high frequency) आवाज देतो, आवाज देताना मागचा एक पाय हवेमध्ये गोल फिरवतो. हा वैशिष्ट्यपूर्ण बेडूक फक्त आंबोलीमध्येच सापडतो.

बेडकांचे अस्तित्व धोक्यात


जगामधील बेडकांच्या एक तृतीयांश प्रजाती या र्‍हासाच्या मार्गावर आहेत. गेल्या काही वर्षात शंभरहून जास्ती प्रजाती लुप्त झाल्या आहेत. भारतामधील ४११ प्रजातींपैकी पाच टक्के प्रजाती या अतिधोकाग्रस्त तर नऊ टक्के प्रजाती या धोकाग्रस्त वर्गवारीमध्ये आहेत. उभयचर प्राण्यांचा र्‍हास होण्यामागे अनेक करणे आहेत. त्यातील काही महत्त्वाची कारणे.अधिवासाचा र्‍हास (habitat loss) - वाढते शहरीकरण, आद्योगिक विस्तार, नष्ट केल्या जाणार्‍या पाणथळ जागा अशा व इतर मानवी हस्तक्षेपांमुळे बेडकांचे त्यासोबतच इतर जीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पक्षी व इतर मोठ्या प्राण्यांसारखे बेडूक लांबवर स्थलांतर करू शकत नाहीत. त्यामुळे अधिवास नष्ट झाल्यास तेथील बेडकांचा ह्रास होतो. किटकनाशके/तृणनाशके - शेत व फळबागांमध्ये उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर होत आहे.


बेडूक हा प्राणी अतिसंवेदनशील असल्यामुळे ही घटक रसायने त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरत आहेत. जंगलांचा र्‍हास-इतर प्राण्यांप्रमाणेच बेडकांच्या अनेक जाती या उत्तम प्रतीच्या जंगलांमध्ये आढळतात. जंगले तोड, वणवे यांमुळे बेडकांचा अधिवास नष्ट होऊन पर्यायाने स्थलनिष्ठ असणार्‍या बेडकांचा र्‍हास होतो.जलप्रदूषण - मासे व उभयचर प्राणी हे जलप्रदूषणाचे पहिले बळी ठरतात. या जीवांवर जगणार्‍या इतर प्राणी पक्षांमध्ये विष संचयन (Accumulation) झाल्याने अन्नसाखळीमधील पुढील जीव सुद्धा जलप्रदूषणाची शिकार ठरतात. पर्यावरणातील एक छोटा वाईट बदल हा पुढे मोठा होत जातो.

बेडकांचे अनन्यसाधारण महत्त्व


किटक नियंत्रण - सर्वच बेडकांच्या आहारात किटकांचा समावेश असतो. एक बेडूक एका वर्षी हजारो किटक खातो, त्यामुळे किटकांवर नियंत्रण होते. यामुळेच बेडकाला शेतकर्‍याचा मित्र असेही म्हणतात.



अन्न-साखळीतील महत्त्वाचा घटक - अनेक साप, पक्षी, मासे, वटवाघुळे यांचे मुख्य खाद्य बेडूक आहे. बेडकांचा नाश झाला तर त्यापुढील अन्नसाखळी तुटून जाईल व पर्यायाने बेडकांवर अवलंबून असणार्‍या इतर जीवांचा र्‍हास होईल.


पोषक पर्यावरणाचे दर्शक - उभयचर असल्यामुळे बेडूक त्याच्या जीवनचक्रात पाण्याच्या संपर्कात येतच असतो. पाणी प्रदूषित झाल्यास त्याचा सर्वात जास्ती अपाय माशांसोबत बेडकांवरसुद्धा होतो. त्यामुळे प्रदूषित पाणी असलेल्या ठिकाणी बेडूक सहसा दिसून येत नाहीत.



विणीचा हंगाम (ब्रीडिंग सिझन)


पावसाळा आला, दोन चार पाऊस झाले, पाण्याची डबकी साठू लागली कि रात्रभर बेडकांच्या आवाजाने झोप उडून जाते. वर्षभर न दिसणारे हे छोटे प्राणी पावसाळ्यातच का दिसतात? कारण, पावसाळा हा त्यांचा विणीचा हंगाम आहे. बेडकाच्या अंड्यांना पक्षाच्या अंड्यासारखे कवच नसते. अंड्यातील जीवांची वाढ होण्यासाठी पाण्याची अथवा हवेमध्ये आर्द्रतेची गरज असते. पावसाळ्यात पाणी आणि हवेतील आर्द्रता मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे बेडूक पावसाळ्यात प्रजोत्पादन करण्यासाठी उत्क्रांत झाले आहेत. आपण शाळेमध्ये शिकतो की, बेडूक पाण्यामध्ये अंडी देतो, हे जरी खरे असले तरी झाडाच्या पानांवर, झाडांवर येणार्‍या शेवाळ्यामध्ये, जंगलातील झर्‍यांमधल्या दगडांवर, ओल्या मातीमध्ये बेडकांच्या विविध प्रजाती अंडी देतात. प्रत्येक प्रजातीची अंडी देण्याची जागा (अध:स्तर) निश्चित असते.


दक्षिण गोवा व कर्नाटकमध्ये सापडणार्‍या मड पॅकिंग फ्रॉग (Nyctibatrachus kumbara) या बेडकाची मादी जंगलातील उथळ झर्‍यांमध्ये असणार्‍या दगडांवर किंवा छोट्या झुडुपांच्या बुंध्यांवर अंडी देते व नंतर चिखलाने ती अंडी लपून टाकते. दक्षिण केरळमध्ये सापडणार्‍या व्हाईट स्पॉटेड बुश फ्रॉग (Raorchestes chalazodes) या बेडकाची मादी एका विशिष्ट प्रजातीच्या बांबू मध्ये अंडी देते. तळाशी छिद्र असणार्‍या बांबूची निवड नर व मादी कडून केली जाते. अंडी दिल्या नंतर पिले बाहेर येईपर्यंत नर अंड्यांचे रक्षण करतो. हा बेडूक स्थलनिष्ठ (endemic) असून दक्षिण केरळमधील फक्त काही भागांमध्येच आढळून येतो.
 
-निनाद गोसावी


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.