स्त्रीशक्तीचा परिमळ

    18-Mar-2023
Total Views |
 
Kunda Naik
 
 
भारतीय जनता पार्टीच्या आजच्या देदीप्यमान यशाचा पाया रचणार्‍या कार्यकर्त्यांचा वैयक्तिक संसार चाकोरीपेक्षा खूप वेगळा असला तरीही तो मनापासून करणार्‍या स्त्रियांपैकी एक कुंदा नाईक... उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या पत्नी. यशस्वी पुरुषामागे पडद्याआड उभी असलेली स्त्रीही जगावेगळी असते का? राम नाईक यांची कन्या विशाखा कुलकर्णी यांनी लिहिलेली त्यांच्या आईची संक्षिप्त जीवनकथा तरी तेच सांगते.
 
देशातील सर्वांत मोठ्या राज्याचे राज्यपाल म्हणून बाबांच्या (राम नाईक यांच्या) शपथविधीचा समारंभ सुरू होता. मंचावरील आई-बाबांसाठीची भव्य आसने, सजावट सारेच नेत्रदीपक होते. शपथविधीनंतर पहिली प्रतिक्रिया कानावर आली. अशावेळी अभिमानाने, आनंदाने डवरलेले राज्यपालांच्या कुटुंबीयांचे चेहरे पाहिले आहेत. पण, या ‘लेडी गव्हर्नर’ किती शांत, संयमाने बसल्या होत्या, अशी होती आमची आई!
 
साता जन्मांची साथ
 
आईचे वडील, नावाजलेले वकील का. ना. धारप... चिरनेर सत्याग्रहींचा खटला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह लढविणारे, गांधीहत्येनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चाललेल्या खटल्यात कायदेशीर मदत करणारे, स्वातंत्र्यवीर दोषमुक्त झाल्यानंतर स्वतः आजोबांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. सावरकरभेटीचे भाग्य 12व्या वर्षी लाभलेली आमची आई... तिच्यावरचे देशप्रेमाचे संस्कार आणखी वेगळे सांगायला नकोत.
 
वडिलांचे छत्र गेले, तरी समृद्धी आणि नावलौकिक कायम असलेल्या कुटुंबातील आईचे जराही आर्थिक पाठबळ नसलेल्या व आई-भावाची जबाबदारी असलेल्या बाबांशी लग्न झाले, ते बहुदा लग्नाच्या गाठी ईश्वर वरूनच बांधतो म्हणूनच!
 
संघ स्वयंसेवकाची गृहिणी
 
सहा ऐसपैस खोल्यांच्या दक्षिण मुंबईतील घरातून उपनगरात दीडखणी चाळीत आलेल्या आईला संघवाल्याशी लग्न म्हणजे आपलं आयुष्य वेगळं कसं असणार, याची पहिली चुणूक लग्नानंतर दोनच महिन्यांत दिसली. आजीने घरात हौसेने ठेवलेल्या सत्यनारायण पूजेच्यावेळी मुसळधार पाऊस असतानाही प्रसादाला मोठ्या संख्येने संघ स्वयंसेवक व परिवार उपस्थित राहिला. या नव्या परिवाराला आईनेहीमनोमन आपलं मानलं.
 
त्यावेळी गोरेगाव पूर्वेच्या घरातून 12 किलोमीटर अंतरावर सांताक्रुझला नोकरी, तिथून संघ शाखा, बैठका उरकून घरी परत येण्याचा सर्व प्रवास बाबा सायकलवरून करीत. रेल्वेपेक्षा सायकलने जाण्यात दिवसाकाठी 20-25 मिनिटं वाचतात, हा बाबांचा हिशेब समजून घेताना, आपला नवरा समाजकार्यासाठी आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ देऊ इच्छितो, हे आईला उमगले. त्यामुळेच पहिल्या लेकीच्या पहिल्या वाढदिवसालाही बाबा हजर राहिले नाहीत, म्हणून रागाविण्यापेक्षा त्यापुढे घरातील प्रत्येक वाढदिवस बाबांच्या सोयीने वाढता किंवा आधी साजरा करायला तिने सुरुवात केली.
 
सामाजिक कार्यकर्त्याची सर्वांत मोठी कुचंबणा होते ती तो जेव्हा कौटुंबिक कार्यक्रमांत, जबाबदार्‍यांत मागे राहातो तेव्हा. ‘लष्कराच्या भाकर्‍या भाजायला वेळ असतो, पण आमच्याकडे दुर्लक्ष’ हा भाव आणि त्यामुळे निर्माण झालेली कटुता मी अनेक कार्यकर्त्यांच्या घरात पाहिली आहे. आमचं घर त्याला नेहमीच अपवाद राहीलं ते केवळ आईमुळे! तिने नकळतही असा भाव व्यक्त केला नाही. उलटपक्षी ती म्हणायची, “मला निभावता येणार नाही, अशी वेळ आलीच तर बाबा असतील याची मला खात्री असल्याने माझ्या मनातच असं काही येत नाही.”
 
 
Kunda Naik
 
 
पूर्णवेळ पक्षकार्य
 
बाबा नोकरीत प्रगती करीत कंपनीचे मुख्य लेखाअधिकारी व कंपनी सेक्रेटरी झाले होते. घरात आर्थिक सुबत्ता येऊ लागली होती. अशावेळी अचानक बाबांना जनसंघातील वरिष्ठ नेत्यांनी नोकरी सोडून पक्षाचे पूर्णवेळ काम करता का विचारले. इच्छा असली तरी बायको, दोन मुली व आईची जबाबदारी बाबांचा पाय मागे खेचत होती. आईच्या संमतीशिवाय एवढा मोठा निर्णय घेणे त्यांना योग्य वाटत नव्हते. ‘नोकरी आणि पक्षकार्य या दोन्हीत तुमची ओढाताण होते. तुम्हांला पक्ष कार्यात अधिक आनंद आहे तर खुशाल करा,’ असे म्हणत आईने आता ‘आपल्या संसारासाठी मला नोकरी करू द्या,’ ही अट मात्र घातली. एका बाजूला बाबा जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले, तर दुसरीकडे आई मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत शिक्षिका झाली. पुढे बाबा यशाचे सोपान चढत तीनदा आमदार झाले, खासदार झाले. तरीही आईने नोकरी सुरूच ठेवली, ती थेट 1996 मध्ये निवृत्ती येईपर्यंत. 1969 मध्ये कोणतीही वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा तर सोडाच, पण स्वप्नातही राजकीय मानमरातबांची चिन्हे दिसत नसताना बाबांनी जनसंघाचे पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला आणि आईने तो आनंदाने स्वीकारला, निभावला.
 
सकाळचा अमृततुल्य चहा
 
या निर्णयाची परिणीती म्हणून बाबा जनसंघाच्या कामात, तर आई संसारात अक्षरशः गुरफुटून गेली. आई 5 वाजण्याच्या आधी उठून स्वयंपाक उरकून तयार होई. बाबा उठले की 6.30 ला दोघे मिळून चहा पित आणि आई शाळेसाठी निघे. चहाचा तो वेळ खास त्या दोघांचा असे. दोघांनाही दिवसभराच्या कामांना त्या एक कप चहाने विलक्षण स्फूर्ती येई. 1970 ला सुरू झालेली ही दिनचर्या आई वर्षभरापूर्वी पूर्णतः अंथरुणाला खिळेपर्यंत सुरू होती.
 
आणीबाणीचे दिवस
 
आणीबाणीच्या काळात या दिनचर्येत19 महिन्यांचा अनपेक्षित खंड पडला. आणीबाणीतल्या काळ्याकुट्ट दिवसांत अटकेची टांगती तलवार डोक्यावर असताना आणीबाणी विरूद्धचे आंदोलन मुंबईत धगधगत ठेवताना अनेकदा दिवस-दिवस घरी येणं बाबांना शक्य नसायचं. अशावेळी ताईला दहावीच्या अभ्यासाला सोबत म्हणत स्वतः ‘एम.ए’ करायचा निर्णय घेऊन त्या अभ्यासात आई आपली काळजी विसरू पाहायची. मनावरील तणाव आम्हाला जाणवूही न देत त्या दिवसांना आई सामोरी गेली. तिच्या नोकरीचं महत्त्व या काळात स्पष्ट अधोरेखित झालं.
 
जीवावर बेतलेला अपघात
 
संकटे येतात तेव्हा एका पाठोपाठ येतात. आणीबाणी संपली. केंद्रात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर जनता पार्टी स्थापन करण्यापूर्वी महाराष्ट्र जनसंघाच्या शेवटच्या बैठकीहून परत येताना मुंबईतील कार्यकर्त्यांच्या जीपला जीवघेणा अपघात झाला. बाबा थोडक्यात बचावले. पण, सलग दोन महिने शीवच्या टिळक महापालिका रुग्णालयात होते. गोरेगाव ते शीव बस प्रवास करून आई दिवसभर बाबांची रुग्णालयात शुश्रूषा करे. रात्रीची सोबत, जेवणखाण या सार्‍याची जबाबदारी मात्र आपणहून बाबांच्या सहकार्‍यांनी स्वीकारली. लौकिकार्थाने त्यावेळी बाबा जनता पार्टीत विलीन झालेल्या जनसंघाचे मुंबईचे संघटन मंत्री. अन्य कोणतेही पद नाही. तरीही अटल बिहारी वाजपेयी, सरसंघचालक बाळासाहेब देवरसांपासून खुद्द इंदिरा गांधींचा पराभव करणार्‍या राजनारायणांपर्यंत अनेकानेक मोठी माणसे भेटीला आली. स्वयंसेवक, कार्यकर्ते तर रोजचेच. संकटकाळातल्या त्या अनुभवामुळेच बहुदा आई आम्हांला नेहमी सांगे, बाबांच्या समाजकार्यामुळे वेळी-अवेळी लोकं आली तरी अवमान करायचा नाही. बाबांनी जोडलेली माणसं हेच आपलं खरं वैभव आहे.
 
निवडणुकांचे राजकारण
 
बाबांच्या कामात आईची अशी समाधानी आणि डोळस साथ होती. 1978 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आई-बाबा दोघांनाही राजी करण्याचे काम पक्षश्रेष्ठींना करावे लागले होते. बोरिवली हा त्यावेळचा प्रचंड मतदार संख्या असलेला मतदारसंघ. संगणक, मोबाईल यांचे युग येण्यापूर्वी 1 लाख, 39 हजार मतदारांची कार्डे हाताने लिहिणे हे मोठे काम होते. त्याचे संपूर्ण व्यवस्थापन आईने एकाहाती पाहिले. आमच्या दोन खोल्यांच्या घरातच कार्डे छापून आली. ती कार्यकर्त्यांकडे लिहायला देणे, घेणे, तपासणे, वेळेत वाटपासाठी तयार ठेवणे आणि शिवाय बाबांची उमेदवार म्हणूनची इतर व्यवधाने सांभाळणे, हे सगळे आईने हसतमुखाने केले.
 
निवडणूक म्हटली की, आईला नोकरीतून रजा घेण्याशिवाय गत्यंतर नसे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून वेळीच अभ्यासक्रम पूर्ण करायचा, एरवी रजा घ्यायच्या नाहीत, हे ती कटाक्षाने पाळे. बाबांनी तीनदा विधानसभा, तर सातवेळा लोकसभा निवडणूक लढविली. पक्ष वाढला, कार्यकर्ते वाढले, तरीही आईची व्यस्तता तशीच असे. अत्यंत सोज्वळ आईला प्रसंगी रणचंडीकेचे रूप धारण करतानाही मी पाहिले आहे. निवडणूक काळात धमक्यांचे फोन, गलिच्छ बोलणार्‍यांचे फोन ठरलेले. ‘हिंमत असेल, तर समोर येऊन बोला,’ असं ठणकावणारी जिगरबाज आई अशा समाजकंटकांना चूपचाप फोन ठेवायला भाग पाडे.
 
लोकसभा निवडणुकांच्यावेळी 110 किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण लोकसभा मतदारसंघात सतत बाबांसोबत प्रचाराला जाणारी कार्यकर्त्यांची फळीच असे. त्या सार्‍यांचे जेवणखाण आई पाही. पण, हीच आई कधी जाहीर कार्यक्रमांमध्ये मिरवली नाही. बाबांच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्या अमृत महोत्सवासारखा एखादा सत्कार सोहळा अपवाद बाबा उपनगरी रेल्वेने प्रवास करतात, म्हणून कौतुकाने त्यांची छायाचित्रे छापणार्‍यांना ठावूक नसे की ही खासदार पत्नी गोरेगावातून बदली झाल्यावर दररोजच रेल्वेने प्रवास करीत होती.
 
कर्करोगाचा आघात
 
1994 मध्ये आणखी एकदा तिच्यावर परीक्षेचा प्रसंग आला. सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेल्या बाबांना अचानक कर्करोग झाला. ‘लिम्फोमा’ तोही बर्‍यापैकी गंभीर अवस्थेला पोहोचलेला. पण, मी दुबळी पडले, तर हे खचतील, या एका विचाराने आईने त्या संपूर्ण कालखंडात एकदाही डोळ्यात टिपूसभरही पाणी आणलं नाही. तिचे डोळे पाणावले ते बाबा पूर्ण बरे होऊन ‘पुनश्च हरिओम’ करते झाले त्या सभेत अटलजींना ऐकताना. अटलजी भाषणात म्हणाले, “रामभाऊ, तुमचा छोटासा पण अत्यंत नीटनेटका गृहस्थाश्रम सर्वांनी अनुकरण करावा असा आहे. भारतमातेची आणखी सेवा हातून घडावी यासाठीच तुम्हाला पुनर्जन्म लाभलाय.”
 
मंत्र्याची पत्नी
 
‘मंत्र्याची बायको’ म्हणूनही आईने कधी मिरवले नाही. ‘मंत्रीपत्नी’ म्हणून तिच्या जीवनातले अविस्मरणीय अनुभव काय तर लता मंगेशकर घरी आल्या होत्या, जयवंतीबेन मेहतांच्या घरी अटलजींच्यासोबत बसून जेवले, ‘सावरकर’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी दिल्लीला आलेले सुधीर फडके आमच्या घरी राहिले, असे हीच निरीच्छपणाकडे झुकणारी सात्विकता आईचे बळ होते. म्हणूनच एवढं काम करूनही बाबांना जेव्हा निवडणुकीतील अपयशाला सामोरं जावं लागलं, तेव्हा आईचे शल्य होतं ते ‘लोकं काम विसरली का’ यांचं! पण, पराभव झाला, तरी काम थांबवायचं नाही, हे तत्त्वज्ञान बाबांइतकच तिचंही होतं.
 
दहा निवडणुका लढलेल्या बाबांचा पुन्हा निवडणूक न लढवायचा मानस निश्चयात बदलला तो तिच्या पाठिंब्यामुळेच! त्यानंतरच्या निवडणुकीत स्वतः उमेदवार नसले तरी बाबा अहोरात्र राबले. भाजप ऐतिहासिक बहुमताने सत्तेत आली. दिल्लीला कार्यकारिणीची बैठक झाली की, आपण कुठे तरी विश्रांतीला जाऊ, असे बाबा आईला म्हणाले.
 
राजभवन की सोन्याचा पिंजरा?
 
त्या बैठकीनंतर दोघं लगेचच प्रवासाला निघाले ते विश्रांतीला नव्हे, तर देशातल्या सर्वांत मोठ्या राज्याच्या - उत्तर प्रदेशाच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळायला लखनौला. राज्यपाल पद ही निवृत्तीची, ऐषोआरामाची जागा नाही, हे अहोरात्र काम करीत बाबा कृतीतून दाखवत होते. आईला त्या पदाबरोबर येणारा शिष्टाचार अनेकदा सहन व्हायचा नाही. ‘मी सोन्याच्या पिंजर्‍यातील मैना झालेय’ हे तिचं आवडतं वाक्य बनलं! शिष्टाचाराचे लगाम तोडून या ‘लेडी गव्हर्नर’ नवर्‍यासाठी पिठलं करायला चार-चार स्वयंपाकी असतानाही भल्या मोठ्या मुदपाक खान्यात जायच्या. तिच्या हिंदी वाणीत उत्तर भारतीय मिठास नव्हती. पण, सच्चेपणा आणि आस्था ओतप्रोत असे. त्यामुळेच राजभवनातला सामान्य सेवेकरीही ती कमी जेवली असं वाटलं, तर जेवणानंतर थोडं आईस्क्रिम तरी घ्या, असा आग्रह करायचा. श्वासाचा त्रास असल्याने आई पायर्‍या चढू-उतरू शकत नाही, हे लक्षात आल्याने ‘आम्ही तुम्हाला उचलून नेऊ, पण गंगा आरतीला चलाच’ असा आग्रह सुरक्षारक्षक करायचे.
 
स्त्रीशक्तीचा अविष्कार
 
आईचं व्यक्तित्त्व म्हणजे अत्यंत संवेदनशील, भावनाप्रधान स्त्रीशक्तीचा अनोखा अविष्कार! रूढार्थाने पतीसाठी समर्पित जीवन ती जगली. पण, ते पारंपरिक वागणं नव्हतं, तर ती तिची निवड होती. बाहेरून बघणार्‍याला तिने बाबांसाठी किती त्याग केले, कष्ट सोसले याची पुसटशी जाणीवसुद्धा झाली नसेल इतकं ते तिने सहजतेने केले. स्वतः बाबांसाठी वाटेल ते करणारी आई घरातल्या कामवालीपासून जवळच्या मैत्रिणी, नातलग महिलांना वेळोवेळी ताठ कण्याने वागलं पाहिजे, नवर्‍याचा अन्याय सहन करू नका हे बजावायची. ‘माझं भाग्य थोर म्हणून मला नवर्‍याशी संघर्ष करावा लागला नाही पण तुम्ही स्वाभिमानाशी तडजोड नका करू,’ हे तिचं सांगणं होतं. नोकरीच्या ठिकाणीही तिचा कणा ताठच असायचा. तिच्या काळाचा विचार करता ‘दोन मुली पुरेत’ हा तिचा निर्णयही तसा आश्चर्याचा. आम्हांला वाढवतानाही तिने मुली म्हणून अमुक करा किंवा करू नका, असं कधी म्हटलं नाही. शेवटचे 15 महिने आई पूर्णतः अंथरुणावर होती, तरी तिचं केवळ अस्तित्व घराची प्रसन्नता कायम ठेवत होतं. आता नसली तरीही ती दिसतेच; समाधानी माणसांच्या डोळ्यात, घरासाठी कष्ट करणार्‍या गृहिणींत, स्वाभिमानाशी तडजोड न करणार्‍या कर्तृत्ववान स्त्रीच्या बाणेदारपणात आणि बाबा, ताई, शार्दूलच्या आणि माझ्या हृदयात!
 
- विशाखा कुलकर्णी
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.