हिंदू नववर्ष अन् संवत्सरारंभाचे स्वागत..

    18-Mar-2023
Total Views |
चैत्र शुद्ध 1, बुधवार, दि. 22 मार्च. शालिवाहन शके 1945, शोभन संवत्सरारंभ. या शुभदिनी हिंदू नववर्ष अन् संवत्सरारंभाचे स्वागत करणार आहोत. त्यानिमित्ताने भारतीय कालगणना, संवत्सरांची माहिती देणारा हा लेख...
 
 
Indian Chronological Year
 
 
ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद।
प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्रृहे मन्ड़लं कुरु॥
 
(हे ब्रह्मध्वजा, तुला माझा नमस्कार असो. तू सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहेस. आज नववर्षाचा आरंभ होत आहे. तू माझ्या घरी नेहमी मंगलकारक गोष्टी घडवून आण, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.)
 
गुढीपाडवा, गुढीपूजन अर्थात ब्रह्मध्वज उभारत आपला उत्सव साजरा करण्याचा दिवस. आपणा सार्‍यांना आपल्या या हिंदू नववर्षाच्या अन् संवत्सरारंभाच्या आताच शुभेच्छा.
 
याच दिवशी आपले नवीन पंचांग चालू होते. पंचांगावर गणपतीची प्रतिमा असते. अशा पंचांगाचे व गणपतीचे पूजन आपल्यात केले जाते. या प्रसंगी पंचांगालाही आपण नमस्कार करू. गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे पंचांग पूजन आणि श्रवण जसे घरोघरी आपण करतो तशीच अजून एक प्रथा आहे. आपली शेती निसर्गावर अवलंबून असते. आज त्यामुळे ग्रामीण भागात गुढी पाडव्याला सामूहिक पंचांग वाचन केले जाते. त्यातून शेतीचे पंचांग गावकरी वर्गास कळते. आगामी हंगामाचे पर्जन्यमान, पीकमान, जनावरांसाठी चार्‍याची तजवीज हे आडाखे ठरवण्यासाठी पंचांग वाचन महत्त्वाचे असते आणि त्या सल्ल्यावर शेतीची काम ठरवली जातात. पूर्वापार चालत आलेली ही प्रथा अनेक ठिकाणी आजही आपल्याला आढळते.
 
या मुहूर्तावर आपण आताच्या शालिवाहन शके 1945, शोभन संवत्सर विषयी थोडक्यात जाणून घेऊ.
 
सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. अत्यंत उत्साहपूर्ण असे वातावरण या दिवशी असते. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सरनाम घेऊन येते. संवत्सर म्हणजे 60 वर्षांचा काळ. शालिवाहन शकाखेरीज अन्य अनेक संवत्सरे आहेत. 60 वर्षांत सूर्याभोवती गुरूच्या पाच आणि शनीच्या दोन प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि दोघांच्या आकाशातील स्थितीची पुनरावृत्ती होते. गुरूच्या प्रदक्षिणेचा 1/12 काळ म्हणजे एक संवत्सर होय. गुरूला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास सुमारे 12 वर्षे लागतात. म्हणजे एक संवत्सर होय. 86 संवत्सरांमध्ये 85 वर्षे पूर्ण होतात. काही फरकांमुळे एका वर्षाचा लोप होतो. संवत्सर हा महाकालाचा एक भाग मानला जातो.
 
कालाचे मापन करण्याच्या पद्धतीस ‘कालगणना’ म्हणतात. जगात खालील ऐतिहासिक कालगणना आहेत : (1) चिनी कालगणना, (2) इजिप्तमधील कालगणना, (3) बॅबिलोनिया व सिरिया या संस्कृतीमधील कालगणना, (4) ज्यू कालगणना, (5) ग्रीक कालगणना, (6) रोमन कालगणना, (7) मध्य अमेरिकेतील कालगणना, (8) ख्रिस्ती कालगणना आणि (9) भारतीय कालगणना.
 
भारतीय कालगणना
 
वैदिक कालात अहोरात्र पक्ष, चांद्रमास, ऋतू, नक्षत्रे यांचे तत्कालीन लोकांना चांगले ज्ञान झाले असल्याचे दिसते. एवढेच नव्हे, तर सौर मास व चांद्र मास यांचा मेळ घालण्यासाठी लागणार्‍या अधिक मासाचेही त्यांना आकलन झाले होते. त्याही पुढे जाऊन, वासंतिक व शारद संपात यांचेही त्यांस ज्ञान झाले होते. पण, कालगणनेसाठी त्यांना चार किंवा पाच वर्षांचे एक चक्र किंवा युग कल्पावे लागले. याचा अर्थ, ते वर्षगणन पाचाच्या किंवा दहाच्या पुढे नेत असत. पुढे बहुधा चक्रे मोजीत. भारतामध्ये चंद्राच्या अनुषंगाने होणारे 12 चांद्र महिन्यांचे चांद्र वर्ष आणि सूर्य व तारे यांच्या अनुषंगाने होणारे सौर वर्ष, तसेच त्यांचा मेळ घालण्यासाठी धरावा लागणारा अधिमास, याबाबतीत वेदकालीन लोक इतरांच्या मानाने बरेच पुढे गेले होते. पूर्वी भारतात जलद दळणवळणाची साधने नव्हती, तेव्हा काश्मीर ते कन्याकुमारी किंवा प्राग्योतिष ते सिंध हा प्रवास करण्यास काही महिने लागत, अशा वेळी संपूर्ण भारताचा विस्तार केवढा आहे, हे एखाद्याच चिकित्सक विद्वानाच्या ध्यानात येत असेल.
 
पराक्रमी राजे आपल्या राज्याची साम्राज्ये बनवीत. पण, तीही जलद दळणवळणाच्या अभावी फार वर्षे टिकत नसत. त्याकाळी भारतात लहानलहान राज्ये असणे नैसर्गिक बनले होते. अशा काळात लोकव्यवहारही प्रायः प्रादेशिक असत. प्रदेशा-प्रदेशांत भिन्नभिन्न आचार व व्यवहार चालत. अशा परिस्थितीत व्यवहारांमध्ये भिन्नभिन्न कालगणना उत्पन्न होणे साहजिकच होते व तसे झालेही. येथील हिंदू राजांमध्ये अशी एक कल्पना प्रचलित होती की, अत्यंत पराक्रमी राजा जो कोणी असेल, तो आपली स्वतंत्र कालगणना प्रचलित करीत असे. त्यांना इतिहास ठाऊक नव्हता. पण, विक्रमादित्य व शालिवाहन हे मोठे पराक्रमी राजे होऊन गेले व त्यांनी आपल्या कालगणना चालू केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण एक शककर्ते म्हणून ओळखतो. नूतन शालिवाहन शक वर्षामध्ये 350वा शिवराज्याभिषेकोत्सव दिन साजरा होणार आहे.
 
2 जूनला शिवराज शक 350चा प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रावर अव्याहत 300-350 वर्षे राज्य करणार्‍या निरनिराळ्या मुसलमानी सत्तांशी झगडून शिवाजी महाराजांनी स्वतःचे आणि पर्यायाने मराठ्यांचे किंवा हिंदूंचे राज्य स्थापले ते कोणत्याही संकटाची पर्वा न करता टिकेल, एवढेच नव्हे, तर वाढेल, अशी खात्री पटल्यावर. वस्तूस्थिती जगजाहीर करण्यासाठी त्यांनी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि तत्स्मरणार्थ पारंपरिक माहितीप्रमाणे विक्रम, शालिवाहन, चालुक्य, विक्रमादित्य इत्यादींच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःचा राज्याभिषेक काल चालू केला. श. 1596 आनंद संवत्सर ज्येष्ठ शुद्ध 13 या दिवशी हा राज्याभिषेक झाल्यामुळे, त्या दिवसापासून राज्याभिषेक वर्ष एक सुरू झाले. अर्थात, हे वर्तमान वर्ष आहे हे उघड ठरले. याचे शतकांत रूपांतर करावयाचे असल्यास यात ज्येष्ठ शुद्ध 13 पासून फाल्गुन वद्य 30 पर्यंत 1595 व चैत्र शुद्ध 1 ते ज्येष्ठ शुद्ध 12 पर्यंत 1596 मिळवावे लागतात. याच्या प्रत्येक निर्देशात संवत्सराच्या नामाचाही समावेश होत असल्यामुळे याचे रूपांतर करण्यास अडचण पडत नाही. हा चालू करण्यामध्ये यापूर्वी लोक उपयोगात आणीत असलेल्या शुहूर, हिजरी वगैरे यावनी गणना मागे पडाव्या असाही हेतू असेल. पण, तो मात्र सिद्धीस गेलेला दिसत नाहीत. शिवाजी महाराज निग्रही असल्यामुळे त्यांनी आपल्या हयातीपर्यंत गणनेचा प्रायः सर्वत्र प्रयोग केला. पण, संभाजीपासूनच ती प्रथा सुटली आणि केवळ छत्रपतींनी दिलेली दानपत्रे, इनामपत्रे व तद्नंतर पेशवे वगैरे अधिकार्‍यांना दिलेली संमतीपत्रे यात मात्र ही गणना तग धरून राहिली. पेशव्यांचे राज्य जाऊन छत्रपती प्रतापसिंह पदच्युत होईपर्यंत कायम राहिली.
 
आता प्रचलित संवत्सरात सुरू होणार्‍या शोधन संवत्सरासहीत बाकीच्या 60 संवत्सरांची नावे अशी आहेत हे आपण बघू : (1) प्रभव, (2) विभव, (3) शुक्ल, (4) प्रमोद-दूत, (5) प्रजापती, (6) अंगिरा, (7) श्रीमुख (8) भाव-वा, (9) युवा, (10) धाता, (11) ईश्वर, (12) बहुधान्य, (13)प्रमाथी, (14) विक्रम, (15) वृष-भ, (16) चित्रभानू, (17) सुभानू, (18) तारण, (19) पार्थिव, (20) व्यय, (21) सर्वजित, (22) सर्वधारी, (23) विरोधी, (24) विकृती, (25) खर, (26) नंदन, (27) विजय, (28) जय, (29) मन्मथ, (30) दुर्मुख, (31) हेमलंब-बी, (32) विलंब-बी, (33) विकारी, (34) शार्वरी, (35) प्लव, (36) शुभकृत, (37) शोभन, (38) क्रोधी, (39) विश्वावसु, (40) पराभव, (41) प्लवंग, (42) कीलक, (43) सौम्य, (44) साधारण, (45) विरोधकृत, (46) परिधावी, (47) प्रमादी-च, (48) आनंद, (49) राक्षस, (50) नल, अनल, (51) पिंगल, (52) कालमुक्ताक्ष, (53) सिद्धार्थी, (54) रौद्र, (55) दुर्मती, (56) दुंदुभी, (57) रूधिरोद्गारी, (58) रक्ताक्ष, (59) क्रोधन, मन्यु व (60) क्षय.
 
तेव्हा आपण या संवत्सराचे स्वागत करत आपलं भारतवर्ष चिरायु राहण्याचे मागणे ब्रह्मदेवाकडे मागत नमस्कार करत प्रार्थना करू की, हे ब्रह्मदेवा आणि हे प्रतिपालक श्रीविष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य अन् सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यातून मिळणार्‍या शक्तीतील चैतन्य आमच्यामध्ये सातत्याने टिकू दे. आम्हाला मिळणार्‍या शक्तीचा वापर आमच्याकडून साधनेसाठी, गुरुसेवेसाठी, तसेच देव देश अन् धर्माच्या कार्यासाठी केला जाऊ दे, हीच आपल्याचरणी प्रार्थना.
 
जाता जाता एक आठवण. आपण या उत्सवात श्रीखंडासारख्या गोडाधोडाचे भोजन करतो, गुढीच्या गाठी जितक्या आवडीने खातो, तितक्याच चवीने कडुलिंबाचाही जरूर आदर करा. या गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि अन्य पदार्थ एकत्रित करून मिश्रण तयार करून खावे. या चूर्णामध्ये कडुलिंबाची पाने, फुले, मिरी, हिंग, मीठ, ओवा, साखर इत्यादी पदार्थांचे चूर्ण करून ते चिंचेत कालवून भक्षण करावे म्हणजे पंचांग, अध्यात्म आणि आयुर्वेद याची सांगड घालत आपण आपला उत्सव खर्‍या अर्थाने साजरा करू.
 
- श्रीपाद पेंडसे
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.