वैद्यकीय क्षेत्राला सामाजिकतेचे कोंदण

    17-Mar-2023
Total Views |
medical field


वैद्यकीय सेवा हे समाज परिवर्तनाचे आणि सामाजिक सेवेचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे रुग्णालये ही केवळ उपचारांपुरती मर्यादित न राहाता सामाजिक सेवेचे केंद्र म्हणून समोर येऊ शकतात. समाजाचीदेखील श्रीगुरूजी रुग्णालयाकडून अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे स्वाभाविकच रुग्णालयाचा विस्तार आणि नवीन सुविधांची सुरुवात काळाची गरज झाली आहे. त्यातूनच रुग्ण सेवा सदन साकारले आहे.


आपल्या प्रकल्पातीलच एक महत्त्वाकांक्षी अनौपचारिक प्रकल्प म्हणजे ‘सेवांकुर’. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान जागृत व्हावे. त्यांना समस्या, आव्हाने याची जाणीव निर्माण व्हावी आणि या समस्यांच्या सोडवणुकीमध्ये आपणदेखील काही भूमिका घ्यावी या भावाचे जागरण ‘सेवांकुर’च्या माध्यमातून डॉ. हेडगेवार रुग्णालयातील वरिष्ठ डॉ. अश्विनीकुमार तुपकरी आणि त्यांचे सहकारी नियमितपणे करत असत. यातूनच छ. संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिकणार्‍या काही विद्यार्थ्यांनी आपण देखील वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय न करता, डॉ. हेडगेवार रुग्णालयासारखा वैद्यकीय सामाजिक प्रकल्प उभारावा, असे मनोमन ठरविले आणि त्यांच्या या विचाराला डॉ. अश्विनीकुमार तुपकरी आणि विविध संघ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने, भेटीने उभारी मिळत गेली.

 
या समूहाचे अनौपचारिक नाव होते संकल्प समूह. उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी हे सर्व सदस्य महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी शिकत होते, तरी नियमित कालावधीने एकत्रित भेटणे, बैठक करणे आदी माध्यमांतून त्यांच्यातील संकल्पाची उजळणी करणे आणि मनातील सेवाकार्याची ज्योत सतत तेवती ठेवणे सुरूच होते. या बैठकांचे प्रगट रूप म्हणजे नाशिक येथे श्रीगुरूजींच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजेच २००८ साली सुरू झालेले दहा खाटांचे छोटेखानी श्रीगुरूजी रुग्णालय होय.नाशिकसारख्या मुंबईपासून जवळ असलेल्या आणि मराठवाड्यातील अन्य शहरांच्या मानाने संपन्न असणार्‍या या शहरात असा प्रकल्प सुरू करण्याची आकांक्षा बाळगणार्‍या या समूहातील कोणीही सदस्य नाशिकचे नव्हते. मात्र, नाशिक येथे काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, त्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करण्याही तयारी आणि यासाठी पाठबळ देणारी स्थानिक संघशक्ती हे मोठे भांडवलसोबत होते.
 
संकल्प समूहातील डॉ. राजेंद्र खैरे, डॉ. गिरीश बेद्रे, डॉ. धनंजय देशमुख, डॉ. अमोल कदम, डॉ. संतोष गायकवाड यांच्या मेहनतीला पाठबळ देणारे नाशिक येथील त्यावेळचे शहर संघचालक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायकराव गोविलकर यांच्यासोबत शहरातील अन्य ज्येष्ठ स्वयंसेवकांची स्थानिक समिती तयार झाली आणि जनकल्याण रक्तपेढीने भाड्याने दिलेल्या २५०० हजार स्क्वेअर फूट जागेवर दहा खाटांच्या या रुग्णालयाची सुरुवात झाली. त्यानंतर या संकल्प समूहातील डॉ. अभिजित मुकादम, डॉ. गिरीश चाकूरकर, डॉ. सुप्रिया देवरे व डॉ. सचिन देवरे हेदेखील काही महिन्यात रूजू झाले.जागेची, संसाधनांची कमतरता, डॉक्टरांपैकी कोणीही नाशिकचे नसणे, आर्थिक चणचण या विपरीत परिस्थितीचा सामना करत रुग्णालयाची यशस्वी सुरुवात झाली. सुरुवातीला स्वाभाविकच डॉक्टर, कर्मचार्‍यांचे पगार यांसाठीही, डॉ. हेडगेवार रुग्णालयावर अवलंबून रहावे लागत असे.


मात्र, लवकरात लवकर स्वावलंबी होण्यासाठी सर्वच जण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. अत्यावश्यक तेवढाच पगार घेणे, रूग्णालयाशिवाय अन्य दवाखान्यात ‘व्हिजीट’साठी किंवा शस्त्रक्रिया, सल्ला देण्यासाठी गेल्यास तिथे मिळालेले मानधन रुग्णालयाच्या वाढीसाठी तेथील निधीत जमा करणे. रुग्णालयाच्या माहितीसाठी शहरात ग्रामीण भागात प्रवास करणे, कॅम्प करणे व रुग्णालयाच्या वाढीसाठी समाजातील विविध व्यक्तींशी संपर्क करून निधी संकलनदेखील करणे अशा सर्वच आघाड्यांवर ही मंडळी एकाच वेळेस लढत होती.डॉ. गिरीश बेद्रे संकल्पातील सुरुवातीपासूनचे सदस्य. स्वतः टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधून तयार झालेले कॅन्सर तज्ज्ञ. मात्र, कर्करोगाचे युनिट उभारण्याची रुग्णालयाची स्थिती नसल्याने अन्य रुग्णालयात ‘ओपीडी’ करणे व बाकीचा सर्व वेळ रुग्णालयाच्या उभारणीच्या कार्यात देणे, निधी संकलन करणे. एवढेच नव्हे, तर रुग्णालयाच्या होऊ घातलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामावर देखरेख करणे, पाणी मारणे असे अवैद्यकीय कामे थोडी थोडकी नाही, तर पाच वर्षे नेटाने करीत होते.
 
सर्वांच्या या परिश्रमांना मोठा आधार मिळाला तो नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचा. या संस्थेने श्रीगुरूजी रुग्णालयाच्या उभारणीसाठी पाच एकर जागा देऊ केली आणि त्यातून १०० खाटांच्या सुसज्ज श्रीगुरूजी रुग्णालयाचे नवीन इमारतीत २०१३ पासून काम सुरू झाले. सुरुवातीच्या संकल्प समूहातील सहा-सात सदस्यांच्या जोडीला हा जगन्नाथाचा रथ ओढण्याकरिता अनेक सेवाभावी सहयोगी येऊ लागले.आजपर्यंत २३ पूर्णवेळ डॉक्टर्स. त्यांना सोबत करण्यासाठी काही अर्धवेळ आणि शहरातील काही मानवसेवी डॉक्टर्स यांच्या माध्यमातून हा सेवायज्ञ सुरू आहे. आजपर्यंत समाजाने या ध्येयवेड्या डॉक्टरांवर दाखविलेला विश्वास आणि दातृत्व यांच्या जोरावर रुग्णालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. अनेक नवनवीन सदस्य या कार्यात सहभागी होत आहेत.समाजाचीदेखील श्रीगुरूजी रुग्णालयाकडून अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे स्वाभाविकच रुग्णालयाचा विस्तार आणि नवीन सुविधांची सुरुवात ही काळाची गरज झाली आहे.भविष्यात २५० खाटापर्यंत कार्याचा विस्तार करणे, हृदयरोग विभाग, ट्रॉमा विभाग सुरू करणे, अशा योजना आहेतच. समाजाच्या सहयोगाने व संघशक्तीच्या पाठबळावर हे कार्य उत्तरोत्तर वाढीस लागेल आणि समाजाच्या उपयोगी पडू शकेल, असा दृढ विश्वास सर्वांच्याच मनात आहे.

अखंड सेवाकार्याची ज्योत


अविरत ‘सेवायज्ञा’तून डॉ. म. वि. गोविलकर रुग्ण सेवा सदन साकारले आहे. कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा तर मिळालीच मात्र त्यांना रुग्णालयात नाममात्र दरात राहण्याचीदेखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्ण सेवा सदनात आठ खाटांचा सामान्य कक्ष, १६ सेमी स्पेशल खोल्यांचा विभाग, आठ स्पेशल खोल्यांचा विभाग असून एका परिपूर्ण उपाहरगृहाचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. सामाजिक संस्था आणि अनेक दानशूर व्यक्तींच्या भरीव सहयोगामुळे ११ महिन्यांच्या कालावधीत ही इमारत पूर्णत्वास आली आहे.-मकरंद धर्माधिकारी

(लेखक श्रीगुरुजी रुग्णलायाचे मुख्य कार्यपालन अधिकारी आहेत.)


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.