भारताचे नंदनवन महाराष्ट्राच्या भेटीला...

    16-Mar-2023
Total Views |
Athwas


मुंबई : २०१९ हे वर्ष खर्‍या अर्थाने जम्मू-काश्मीरसह लेह लडाख प्रांताचे वर्तमान आणि भविष्य बदलणारे ठरले. ’कलम ३७०’ आणि ‘३५अ’ रद्द झाल्यानंतर विकासाच्या नव्या वाटा या प्रांतात राहणार्‍या लोकांना खुणावू लागल्या. यानंतर इतर राज्यांशी सुरु झालेल्या परस्पर संवादातून प्रगतीचे अनेक नवे मार्ग स्थानिकांसाठी खुले होऊ लागले. याच प्रयत्नातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ’अथवास’ हा मुंबईत होऊ घातलेला एक आगळावेगळा कार्यक्रम. हा कार्यक्रम ’वर्ल्ड ट्रेड सेंटर’ येथे दि. १७ ते २२ मार्च दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सहकार्‍याने ‘गुलशन फाऊंडेशन’तर्फे आयोजित करण्यात आला असून ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर अर्थात ‘पार्क’ही यामध्ये सहभागी होणार आहे.
 
जम्मू-काश्मीर तसेच लेह-लडाख प्रांत हा आपल्या देशाचा संवेदनशील सीमाभाग असल्याने आजपर्यंत बहुतांश वेळा तो अत्यंत नकारात्मक आणि स्फोटक अशा बातम्यांसाठी चर्चेत राहिला. पण, याच प्रदेशाला निसर्गाने भरभरून दान दिलेले आहे. अनेक नव्या उद्योगधंद्यांचे जाळेही यानिमित्ताने तिथे उभे राहत आहे. अशा अनेक सकारात्मक शक्यता तेव्हा दृष्टिक्षेपात येऊ लागल्या जेव्हा २०१९ साली ’कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ रद्द करून जम्मू-काश्मीर प्रांताला दिला गेलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्यात आला. या एका धाडसी निर्णयामुळे जम्मू-काश्मीर आणि नजीकचा प्रांत हा देशातील इतर राज्यांप्रमाणे एका कक्षेत आला. आजपर्यंत केवळ पर्यटन या एकाच उद्योगावर अवलंबून असलेला जम्मू-काश्मीर प्रांत उपजीवीकेसोबत उत्कर्षाच्या नव्या संधी यानिमित्ताने शोधत आहे. इतर राज्यातील उद्योजकही या प्रक्रियेत हिरीरीने पुढे येऊ लागले आहेत आणि यातूनच परस्पर संवाद सुरु झालेला आहे.

याच परस्पर संवादाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ’अथवास’ या विशेष कार्यक्रमाकडे पाहिले पाहिजे. या कार्यक्रमाचे आयोजन ‘गुलशन फाऊंडेशन’ महाराष्ट्र शासनाच्या सहकार्‍याने करीत आहे. सदर कार्यक्रमाच्या नियोजनात ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’, ‘फाऊंडेशन फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट’ अर्थात ‘एफएचडी’, ‘एस. आर. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट’, ‘सॅटर्डे क्लब’, ‘ग्लोबल ट्रस्ट’, ’चेंबर फॉर स्मॉल अ‍ॅण्ड मीडियम बिझनेस’, ‘पनाश फाउंडेशन’, ‘उद्योग मित्र’ आणि ‘सहकार भारती’ या सर्व संस्थांचा मोठा वाटा आहे.

मुंबई येथील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ येथे दि. १७ ते २२ मार्च दरम्यान याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखसह नजीकच्या प्रांतातील अनेक उदयोन्मुख नवे उद्योजक सहभागी होत आहेत. तेथील उद्योजकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या संधींची माहिती तर होईलच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील लोकांनाही काश्मीर प्रांतात सुरु असलेल्या अनेक नव्या उद्योगांविषयी, योजनांविषयी सविस्तर माहिती मिळू शकेल.

दि. १७ मार्च रोजी सायंकाळी या सहा दिवसीय कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दि. १८ मार्च रोजी नवउद्योजकांसाठी एक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नव्या होतकरू तरुण उद्योजकांना तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील आणि लडाखमधील उद्योजकांना इतर राज्यातील विशेष करून महाराष्ट्रातील उद्योजकांशी संवाद साधता यावा, नव्या विचार आणि संकल्पनांची देवाणघेवाण व्हावी, यादृष्टीने ‘बिझनेस मिट’चे आयोजन करण्यात आलेले आहे. दि. १९ मार्चला रविवारी सकाळी याच कार्यक्रमाच्या शृंखलेतील एक भाग म्हणून ‘इंटीग्रिटी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच दिवशी म्हणजे रविवारी सायंकाळी जम्मू-काश्मीर प्रांतातील ’सुफी संगीता’च्या सादरीकरणातून तेथील सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सोमवार, दि. २० मार्च रोजी जम्मू-काश्मीर आणि लडाख प्रांतातील शैक्षणिक धोरणे, तेथील त्याबाबतच्या सोईसुविधा आणि त्याचा दर्जा याबाबत विस्तृतपणे मंथन होण्याच्या दृष्टीने चर्चासत्रं आयोजित केली जाणार आहेत. दि. २१ मार्च रोजी जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमधील संस्कृती दर्शवणारा एक ‘फॅशन शो’सुद्धा आयोजित केला जाणार आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख प्रांतातील स्थानिक लोक सहभागी होतील. याच कार्यक्रमादरम्यान मुंबईतील काही निवडक बॉलिवूडमधील प्रथितयश लोकांशी संवाद साधायची संधी उपस्थित काश्मिरी कलाकार आणि संबंधित अधिकार्‍यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदर सहा दिवसीय कार्यक्रमाची सांगता २२ तारखेला गुढीपाडव्याला अर्थात ’नवरेह’ या सणाच्या दिवशी होणार असून यानिमित्ताने भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष ७५ फुटी गुढी उभारून साजरे केले जाणार आहे.

’अथवास’सारख्या अशा उपक्रमातून येत्या नजीकच्या भविष्यात काश्मीरसह लडाखचा भाग सर्वच स्तरावर भारतातील इतर राज्यांशी सर्वार्थाने जोडला जाईल आणि यातून परस्पर विकासाचा कार्यक्रम अधिक वेगाने पुढे जाईल, अशी आशा यानिमित्ताने निर्माण होणार आहे हे निश्चित!आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.