भारत-रशिया व्यापाराचा डॉलरला तडाखा

    14-Mar-2023
Total Views |
Impact of India-Russia trade on the US dollar


भारत-रशिया दरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत होत असून, रुपया-रुबल अशा स्थानिक चलनात होणार्‍या या व्यापाराचा थेट फटका अमेरिकी डॉलरला बसला आहे. गेल्या तीन महिन्यांत ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय पेमेंट प्रणालीत तब्बल ४० टक्के इतके कमी डॉलरचे व्यवहार नोंद झाले आहेत. त्याविषयी...
 
गेली कित्येक दशके आंतरराष्ट्रीय व्यापारावर अमेरिकी डॉलरचे वर्चस्व कायम आहे. भारताची सर्वाधिक विदेशी गंगाजळी ही तेलखरेदीसाठी लागणार्‍या डॉलरसाठी खर्ची पडत होती. तथापि, गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्ध भडकल्यानंतर रशियावर अमेरिकेने निर्बंध लादल्याने, रशियाने त्यांच्या कच्च्या तेलासाठी भारताला सवलत देऊ केली. भारतानेही मिळालेल्या संधीचा फायदा घेत रशियाबरोबरचा तेलव्यापार वाढवत नेला आहे. गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये भारताने सर्वकालीन उच्चांकी तेल आयात केली. फेब्रुवारी महिन्यात रशियाकडून भारताने १.६ दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतकी कच्च्या तेलाची विक्रमी आयात केली. भारताचे पारंपरिक तेल पुरवठादार देश इराक तसेच सौदी अरेबिया यांच्याकडून होणार्‍या एकत्रित आयातीपेक्षाही रशियाकडून झालेली आयात ही सर्वाधिक ठरली.

सलग पाचव्या महिन्यात रशिया भारताचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार राहिला आहे. क्रूड ऑईलच्या किमतीपेक्षा भारत सुमारे दहा ते १२ डॉलर प्रतिबॅरल कमी किंमत मोजत आहे, असा अंदाज आहे. त्याचवेळी रशियाची आर्थिककोंडी करण्यासाठी रशियन तेलाच्या किमतीवर युरोपीय महासंघ तसेच अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. प्रतिबॅरल ६५ डॉलर इतक्या किमतीत रशियाने तेल विकावे, असे युरोपीय महासंघाचे म्हणणे आहे. मात्र, भारताला या किमतीपेक्षाही कमी दरात तेल मिळते, असा विश्लेषकांचा दावा आहे. रशियाला भारतासारखा मोठा ग्राहक मिळाल्याने ही सवलत येत्या काळातही कायम राहील, असे आजचे चित्र आहे. तसेच हे व्यवहार रुपया-रुबलमध्ये होत असून, त्यासाठी विशेष व्हेस्ट्रो खाती उभय देशांनी उघडली आहेत. या खात्यांमार्फत स्थानिक चलनातून व्यवहार होत आहेत. त्याचा थेट फटका अमेरिका डॉलरला बसतो आहे. गेल्या तीन महिन्यांत भारताने रशियाबरोबर जो व्यापार केला, तो १०० दशलक्ष डॉलर इतक्या रकमेचा असल्याचा दावा विश्लेषकांनी केला आहे. म्हणूनच डॉलरचे होणारे अवमूल्यन ऐरणीवर आले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरमध्ये होणारे व्यवहार हा सर्वच देशांसाठी अडचणीचे ठरत होते. त्याला पर्याय म्हणून युरो हे चलन आणले गेले. मात्र, सर्वच आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलर हेच चलन कायम राहिले. व्यापक पातळीवर ते सर्वत्र स्वीकारले जात असल्याने, त्याला पर्याय येऊ शकला नाही. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर मात्र डॉलरला पर्याय म्हणून भारतीय रुपया वापरात येऊ लागला.भारत हा जगातील सर्वात मोठा तिसरा तेलाचा आयातदार देश आहे. स्वाभाविकच अमेरिकी निर्बंधांनंतर रशियाने आपला मोर्चा भारताकडे वळवला. त्याचवेळी रशियाला आंतरराष्ट्रीय पेमेंट प्रणालीतून बाहेर करण्यात आले. म्हणूनच रुपया-रुबल या चलनांचा वापर उभय देशांनी करण्यास सुरुवात केली. अमेरिकी निर्बंधांना झुगारून देत भारताने रशियाशी व्यापार सुरू ठेवला. तो केवळ तेलापुरता मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात व्यापक प्रमाणात होत आहे.

रशियाच्या गरजाही तो भागवत आहे. हे सर्व व्यवहार १०० दशलक्ष डॉलर इतक्या रकमेचे समतुल्य आहेत. आता ना केवळ भारत त्याचबरोबर दुबईस्थित काही कंपन्याही रशियन ऊर्जा कंपनी ‘गॅझप्रॉम’ तसेच ‘रॉसनेफ्ट’सोबत डॉलरऐवजी अन्य चलनात व्यवहार करत आहेत. डॉलरवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. भारतातील तीन प्रमुख बँकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिकी निर्बंधांनंतर रशियाची सुमारे ६५० अब्ज डॉलर मूल्याचे सोने तसेच विदेशी चलन साठी गोठवला गेल्याने, रशियाला समर्थ पर्याय शोधणे गरजेचे होते, ती निकड भारताने पूर्ण केली.भारत रुपयामध्ये तर आखाती देश दिरहममध्ये रशियासोबत व्यवहार करत आहेत. अमेरिकी निर्बंधांना टाळून व्यवहार करण्यासाठी रशियन बँका मार्ग शोधत आहेत. भारताने ’व्हेस्ट्रो’ खात्यांचा पर्याय दिला. जुन्या ‘बार्टर’ पद्धतीनेही तेलाच्या बदल्यात रशिया त्यांच्या गरजेच्या गोष्टी भारताकडून खरेदी करत आहे. त्यामुळे डॉलरला थेट तडाखा बसतो आहे. अनेक दशकांपासून केवळ डॉलरमध्येच व्यवहार करणारे आखाती देश आता स्थानिक चलनांचा स्वीकार करू लागले आहेत. त्यासाठी विशेष पेमेंट प्रणाली उभी केली जात आहे.

भारतानेही ‘युपीआय’ पेमेंट विदेशातही सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ‘रुपे’ हे भारतीय कार्ड विदेशात स्वीकारले जाऊ लागले आहे. ‘रुपे’मार्फत आंतरराष्ट्रीय व्यवहार हे लवकरच अनेक देशांत प्रत्यक्षात दिसू लागतील. ‘युपीआय’ प्रणाली इतक्या प्रभावीपणे काम करते की, अनेक पाश्चात्य देशांना तिने भुरळ घातली आहे. त्यामुळेच ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय पेमेंट प्रणालीत तब्बल ४० टक्के इतके कमी डॉलरचे व्यवहार गेल्या तीन महिन्यांत नोंद झाले. अमेरिकेतील तज्ज्ञांच्या मते, डॉलरची ताकद अमर्याद आहे. त्याला कोणताही धोका सध्या दिसून येत नाही. मात्र, जगभरातील विश्लेषक रुपयाने तसेच ‘रुपे’ने दिलेल्या आव्हानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत. १४० कोटी लोकसंख्या असलेली भारतासारखी भलीमोठी बाजारपेठ कोणालाही हातची जाऊ द्यायची नाही. त्यामुळेच ‘रुपे’कार्ड आंतरराष्ट्रीय बाजारात दिमाखात दाखल झाले आहे. तसेच ’युपीआय’ ही भारतातील प्रभावी पेमेंट प्रणाली जगभरात स्वीकारली जाऊ लागली आहे.

रशियासोबत ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’, ‘बँक ऑफ बडोदा’, ‘अ‍ॅक्सिस बँक’ सर्व व्यवहार पाहत आहेत. रशियन बँकाही ‘व्हेस्ट्रो’ खाती उघडून व्यवहारांची पूर्तता करत आहेत. रशियन व्यापारासाठी भारताने एक संरचना तयार केली असून, त्याअंतर्गतच कोणत्याही आंतरराष्ट्रीय निर्बंधांना सामोरे जावे लागू नये, याची पूर्ण काळजी घेऊन भारतीय तसेच रशियन बँका एकमेकांची देयके चुकती करत आहेत. सध्या तरी अमेरिका निश्चिंत असल्याचे भासवत असली, तरी येत्या काही काळात भारताने नेमकी किती विदेशी गंगाजळी वाचवली, हे स्पष्ट होईल. तसेच ‘रुपे’, ‘युपीआय’ ही किती देशात विस्तारली गेली, हे समजून येईल. एकंदरित भारताने ना केवळ सवलतीच्या दरात तेलखरेदी केली, तर ती रुपयांमध्ये केली आणि डॉलरवरचे अवलंबत्व कमी केले, हे निश्चितच म्हणता येईल.



-संजीव ओक




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.