कळवा खाडी पुलावरील पाचवी मार्गिकाही सुरू

साकेत मार्गावर होणारी वाहतूककोंडी टळणार

    11-Mar-2023
Total Views |
the-fifth-lane-on-kalwa-bridge-is-also-open
(२.४० किमी पुलाची एकूण लांबी)
(८.५० मीटर मार्गिकांची सरासरी रुंदी)

ठाणे : कळवा येथील जुन्या पुलावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कळवा खाडी पुलावर उभारण्यात आलेल्या नवीन खाडी पुलाची साकेतच्या दिशेकडील मार्गिका शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. ही पाचवी मार्गिका सुरू झाल्याने साकेत मार्गावर होणारी वाहतूककोंडी टळणार असून जुन्या पुलावरील वाहतुकीचा भारही कमी होणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील कळवा पूल हा अरुंद असल्याने दररोज या मार्गावर वाहतूककोंडी होत होती. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ठाणे मनपाने जुन्या पुलालगत नवा खाडी पूल निर्माण केला आहे. या पुलावरील ‘सिडको’ येथून कळव्याच्या दिशेने जाणारी आणि कोर्टनाका येथून कळव्याच्या दिशेने वाहतूक करणारी पुलाची मार्गिका सुरू करण्यात आली होती. परंतु, साकेत पुलाचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे पूल पूर्ण क्षमतेने सुरू नव्हता. साकेत मार्गिका सुरू नसल्याने साकेतहून कळव्याच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने जुन्या कळवा पुलावरूनच वाहतूक करत होते.

त्यामुळे बाळकूम मार्गे येणार्‍या वाहनांना कळवा येथे वाहतूककोंडीत अडकावे लागत होते. साकेत पुलाची मार्गिकाही सुरू करण्यात यावी, अशी मागणी ठाणेकरांकडून सुरू होती. अखेर ही मार्गिका आता सुरू झाल्याने जुन्या कळवा पुलावरील वाहनांचा भार कमी होईल. पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने ठाणे शहरातून कळवा, नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक संपूर्णत: नवीन पुलावरून करणे शक्य होईल.

कळवा पुलाप्रमाणेच शहरातील सुरू असलेले इतर प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे काम हाती घेतले असून, वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी महापालिका, इतर शासकीय यंत्रणांमार्फत प्रयत्न सुरू असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले. नवीन कळवा पुलाची एकूण लांबी २.४० किलोमीटर असून पुलावरील मार्गिकांची सरासरी रुंदी ८.५० मीटर इतकी आहे. पुलाच्या सर्व मार्गिका वाहतुकीस उपलब्ध झाल्यामुळे आता पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला आहे.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.