फडणवीसांनी केले मविआचे वस्त्रहरण!

राज्यपाल अभिभाषणावरून उपमुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी

    11-Mar-2023
Total Views |
Devendra Fadnavis


मुंबई
: राज्यपाल रमेश बैस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या अभिभाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांचे अभिनंदन केले. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर बोलतानाफडणवीसांनी विविध मुद्द्यांना हात घालत महाविकास आघाडी (मविआ) आणि आघाडीच्या नेत्यांना निशाण्यावर घेत जोरदार फटकेबाजी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौर्‍यावरून झालेली टीका, शेतकर्‍यांना देण्यात आलेली मदत आणि यासह विविध मुद्द्यांवर फडणवीसांनी मविआचे जणू वस्रहरणच केले आहे.

 
शेतकरी मदतीवरून मविआ लक्ष्य!


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आमच्या सरकारने पहिल्या दिवसापासूनच शेतकर्‍यांचे हित केंद्रस्थानी ठेवून काम करायला सुरुवात केली आहे. आमच्या सरकारच्या आठ महिन्यांच्या कार्यकाळात आम्ही शेतकर्‍यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शेतकर्‍यांना आम्ही योग्य काळात आणि योग्य प्रमाणात मदत जाहीर केली आणि प्रत्यक्षात मदत पोहोचवली आहे.मविआने अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेतकर्‍यांना अवघी सात हजार कोटी रुपयांची मदत केली होती. परंतु, आम्ही केवळ आठ महिन्यांत बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी तब्बल १२ हजार कोटींची भरघोस मदत देण्याचे काम केले आहे,” असे म्हणत फडणवीसांनी शेतकर्‍यांप्रति मविआने दाखवलेल्या उदासीनतेवर बोट ठेवले आहे.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा


फडणवीस म्हणाले की, ”कांदा प्रश्नावर राज्य सरकारने अभ्यास आणि इतर बाबींचा उलगडा होण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. त्या समितीचा अहवाल असून असून मुख्यमंत्री या संदर्भात लवकरच घोषणा करत मदत जाहीर करतील.कांदा निर्यात करण्यावर केंद्र सरकारने कुठलीही बंदी लावलेली नाही. काहीही झाले तरी, आमचे सरकार कांदा उत्पादक शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिली आहे.
 
दिल्लीचे तख्त महाराष्ट्र राखतो आहे!

 
”महाराष्ट्रात गुंतवणूक येत आहे. त्यामुळे केवळ गुंतवणूक बाहेर जात आहे, अशाप्रकारचे आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न तुम्ही करू नका. महाराष्ट्राचा देशभरात डंका असून दिल्लीचेही तख्त महाराष्ट्र राखतो आहे आणि हे सांगायला आम्हाला कसलाही संकोच वाटत नाही,” अशी गर्जनाही फडणवीसांनी केली आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.