न्यूयॉर्क टाईम्सकडून भारतास लोकशाही शिकण्याची गरज नाही

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर

    10-Mar-2023
Total Views |
Anurag Thakur

नवी दिल्ली: न्यूयॉर्क टाईम्स आणि अन्य काही परदेशी प्रसारमाध्यमे सातत्याने भारताविषयी द्वेष व्यक्त करत असतात. त्यामुळे अशा प्रसारमाध्यमांकडून भारतास लोकशाही शिकण्याची गरज नाही, असा सणसणीत टोला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतविरोधी परदेशी प्रसारमाध्यमांना शुक्रवारी लगाविला आहे.
 
न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकी वृत्तपत्राने “मोदीज फायनल असॉल्ट ऑन इंडियाज प्रेस फ्रिडम हॅज बिगन” या नावाचा एक लेख ८ मार्च, २०२२ रोजा प्रकाशित केला होता. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशभरात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

त्याविषयी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, भारताविषयी काहीही प्रकाशित करताना न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने तटस्थता कधीच सोडली आहे. जम्मू – काश्मीरमधील वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयी प्रकाशित लेखात करण्यात आलेला दावा हा पूर्णपणे काल्पनिक आहे. भारत आणि भारताच्या लोकशाही संस्थांवर हल्ला करून त्यांच्याविषयी अपप्रचार करण्याचा एकनेल हेतू त्यामागे असल्याचे ठाकूर म्हणाले.
 
भारत आणि भारतात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपप्रचार होत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी केला. ते पुढे म्हणाले, न्यूयॉर्क टाईम्स आणि अन्य परदेशी प्रसारमाध्यमे हा प्रकार वारंवार करत असतात. अर्थात, हा खोटेपणे फारक काळ टिकू शकत नाही. भारतात अन्य मुलभूत अधिकारांप्रमाणेच प्रसारमाध्यमांचे स्वांतत्र्यही पवित्र मानले जाते. भारतीय लोकशाही अतिशय परिपक्व असून अजेंडाधारित प्रसारमाध्यमांकडून भारतास लोकशाही शिकण्याची गरज नसून हा अजेंडा भारत हाणून पाडेल, असाही विश्वास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.