’शिवराज अष्टक’ हा सांस्कृतिक ठेवा : दिग्पाल लांजेकर

    18-Feb-2023   
Total Views |
Digpal Lanjekar Interview


शिवचरित्र रुपेरी पडद्यावर यावं, नव्या पिढीच्या भावविश्वात छत्रपती शिवाजी महाराज पोहोचावे, यासाठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवराज अष्टक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज हैं’, ‘पावनखिंड’ या चार यशस्वी चित्रपटांनंतर ‘सुभेदार’ हा ‘शिवराज अष्टका’तील त्यांचा पाचवासिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा, या ‘शिवराज अष्टाकां’मागचं प्रयोजन आणि आतापर्यंत या चित्रपटांना मिळालेला रसिकप्रेक्षकांचा प्रतिसाद, अशा विविध मुद्द्यांवर आज शिवजयंतीनिमित्त दिग्पाल लांजेकर यांच्याशी केलेली ही खास बातचित...

‘शिवराज अष्टक’ला रसिकप्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळालेला दिसतो. तेव्हा, एकूणच या प्रतिसादाविषयी आणि या चित्रपटांचा समाजमनावर काही परिणाम झाला आहे का, याविषयी काय सांगाल?

सर्वप्रथम आपण या चित्रपटांच्या मूळ उद्देशापर्यंत जाऊया. मुळात ‘शिवराज अष्टक’ सुरू करताना ‘फर्जंद’ जेव्हा करायला घेतला, तेव्हा थोडी साशंकता मनात होती. चित्रपटाच्या व्यावसायिक यशाचा मुद्दा डोक्यातच नव्हता तेव्हा. ही एक चळवळ व्हावी, हीच इच्छा होती. जे शिवचरित्र आपण लहानपणापासून वाचलंय, जे आपल्याला गेले ३५० वर्षं प्रेरणा देतंय, ते नवीन पिढीच्या समोर आणावे, हेच मनात होतं. आजच्या मुलांना पुस्तकांपेक्षा चित्रपट आणि ‘स्क्रीन’वरची माध्यमं जास्त भावतात. त्यांच्या भावविश्वात शिवाजी महाराजांचं स्थान निर्माण व्हावं, जेणेकरून पुढे जाऊन हीच मुले खोलात शिरतील, यासाठी हा प्रयत्न होता आणि सांगायला आनंद वाटतो की, या चित्रपटांना प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालासुद्धा. म्हणजे बघा, आपण लहान असताना ‘नाच रे मोरा’ आणि ‘चॉकलेटचा बंगला’ या गाण्यांवर स्नेहसंमेलनात नृत्य सादर करायचो. मध्यंतरी हिंदी चित्रपटांतील अश्लील गाणी या मुलांमध्ये रुजतायेत की काय, अशी आपल्या सगळ्यांनाच भीती वाटत होती. पण, आता चित्र पुन्हा बदललं, ‘युगत मांडली’ भारूडावर बरीच नृत्ये स्नेहसंमेलनांतून दिसून येतात. हा सकारात्मक बदल आहे. मुलांच्या भावविश्वात ‘शिवराज अष्टक’च्या गाण्यांनी यशस्वी प्रवेश केला, ही आमची जमेची बाजू!


आता प्रतिसादाविषयीचा एक किस्साच सांगायचा झाला, तर ठाण्याच्या कारागृहात या चित्रपटांना घेऊन आम्ही एक प्रयोग केला. तिथल्या आठ लहान मुलांना सातत्याने हे चित्रपट दाखवले. त्याचे व्हिडिओ बनवले. मुलांना रडू आलं, वाईट वाटलं. आपले पूर्वज इतकं करून गेले आणि आता आपण काय करतोय, ही बोचणी लागली. तोच एक क्षण. मुलं सुधारली. काहींनी पुढे शिकायला सुरुवात केली आणि दोघांनी ठाण्याच्या भाजी मंडईत दुकान थाटले. आता सन्मानाने मेहनत करून ही मुलं जगतात. तेव्हा, समाधान वाटतं. हे फक्त चित्रपट नाहीत, म्हणूनच याला थोडं आध्यात्मिक बैठक असलेलं ’शिवराज अष्टक’ असं नाव दिलं. अजून एक म्हणजे कोरोना काळात मला अनेक डॉक्टरांचे फोन आले. गाण्यांमुळे काम करण्याची लढण्याची स्फूर्ती मिळते, असेही त्यांनी सांगितले.

इतिहासाचं दस्तावेजीकरण करताना काही प्रमाणात लेखकाचं, दिग्दर्शकाचं अंतरंगही त्यात उतरतं आणि चित्रपटनिर्मिती करताना ते गरजेचेही आहे. यादृष्टीने तुमच्या चित्रपटांकडे तुम्ही कसे पाहता?

कुठलाही चित्रपट काही ऐतिहासिक ‘डॉक्युमेंटेशन’ असू शकत नाहीत. त्यात काही प्रमाणात लेखकाला स्वातंत्र्य घ्यावंच लागतं. पण असं घडलं होतं का, या विचाराने मुलं भूतकाळात डोकावतील, अशी आशा करतो, हा माझा प्रयत्न आहे. इतिहासाचं सांस्कृतिक स्वरूपात जतन करून ठेवणं मला महत्त्वाचं वाटलं. मी सुरुवात केली. माझ्या एकट्याने ते होणार नाही. त्यात सातत्याने प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक पिढीत हे व्हायला हवे. हे चित्रपट म्हणजे इतिहास नाही, तर सांस्कृतिक ठेवा आहे. आपण भालजींचे चित्रपट जसे ७० वर्षं पाहतो, तसे हे १०० वर्षे पाहिले जाणार आहेत. त्यामुळे इतिहास नाही, निदान संस्कृती तरी यातून टिकायला हवी. हे चित्रपट करताना त्या काळातील बोली भाषा, जीवनमान, खाद्यसंस्कृती, विविध पद्धती अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला. आज तू पाहिलं असशील, तर माझ्या प्रत्येक चित्रपटात एक लोकगीत आहे, युगत भारूड, त्यानंतर गोंधळ घेतला, पोवाडा, वाघ्या मुरळी, धनगर गीत आणि आता ‘सुभेदार’मध्ये मरीआई आहे. ही आपली संस्कृती संगीताशी जोडली गेलीये. संगीत वारसा आपल्याला फार पूर्वीपासून लाभला आहे. ही जनजागृती करणारी आपली संस्कृती आज अंधश्रद्धेकडे झुकली तरी ती पुनर्जीवित आपणच करायला हवी.

आज अनेक अनुभवी आणि नवोदित अभिनेते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक दिसतात. तसेच शिवकाळातील अनेक चित्रपटही हल्ली प्रदर्शित होताना दिसतात. तेव्हा, या चित्रपटांकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता?

मी एका अर्थाने या शिवकालीन चित्रपटांकडे निश्चितच सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. पण, यासंदर्भात मला काही मुद्दे मांडावेसे वाटतात. मी जेव्हा ‘फर्जंद’पासून सुरुवात केली, तेव्हापासूनच मी म्हणतोय की, एकट्या दिगपाल लांजेकरला संपूर्ण शिवचरित्र सांगणं शक्य नाही. फक्त ३२ वर्षांची त्यांची कारकिर्द आहे, तरी त्यावर हजारो ‘पीएच.डी’ झाल्या. लाखो लोक त्यावर अजूनही अभ्यास करीत आहेत. पण, या विषयावर काही तरी करु इच्छिणार्‍या अनेक दिग्दर्शक, लेखक, साहित्यिकांनी पुढे यायला हवे. सर्वांनी साकल्याने हे चरित्र उलगडून दाखवायला हवे. पण, शिवचरित्र कालातीत आहे. प्रत्येक काळात मार्गदर्शक ठरावं असं आहे, म्हणूनच ते तितक्याच डोळसपणे मांडले गेले पाहिजे. आमची टीम ते करायचा पूबर्ण प्रयत्न करते. हे करताना त्रुटी सगळ्यांकडून राहतात, पण मग पुढच्या चित्रपटांतून त्या वगळायलाही हव्यात. फक्त लोकांना आवडतंय आणि व्यावसायिक फायदा मिळतो, म्हणून यामागे लागू नये. महाराजांची मांडणी जबाबदारीने व्हायला हवी. मग त्यात वेषभूषेपासून ते त्यांच्या संवादांपर्यंत सगळ्याचे पुरेपूर भान ठेवायलाचं हवं.

शिवचरित्रासंबंधीच्या प्रत्येक चित्रपटात त्या त्या किल्ल्यावर जाऊन चित्रीकरण करायचा अट्टाहास का?

दुर्दैवाने आपण स्वतःच करंटे आहोत. हा मिळालेला वारसा आपल्यालाच सांभाळता येत नाही. नाहीतर त्या त्या घटनेची हकिकत दाखवणारा तो किल्ला मला प्रत्येक चित्रपटात दाखवायचा होता. पण, आज तेवढ्या चांगल्या अवस्थेत ते सगळे किल्ले आहेत का? आज कित्येक तरुण, संस्था पदरमोड करून किल्ले स्वच्छ करीत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अपुर्‍या सोयी. किल्ल्यांवर व्हॅनिटी किंवा मोठ्या ताफा घेऊन जाऊ शकत नाही. शूटिंग म्हंटल म्हणजे थोडंफार नुकसान होऊ शकतं गडाचं, ते होऊ नये म्हणून मोजके सीनच आम्ही किल्ल्यांवर चित्रित करतो.

या शिवकार्यासाठी तुम्हाला नुकताच ‘गुरूकुल’ पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत?

सगळ्या माध्यमांत एका विशिष्ट दृष्टिकोनातून जे काम करतात, त्यांना तो पुरस्कार जाहीर केला जातो. मला मिळाला तो दुसरा ‘गुरूकुल’ पुरस्कार. गिरीश खेमकर महान रंगकर्मी आहेत. पुण्यात अमृता धारकर आणि केतकी गद्रे यांनी सेटवरच मला काहीही कल्पना नसताना तो अर्पण केला. सर्व कुटुंबीयांना बोलावून अशा अनोख्या पद्धतीने दिला.

 
बरेचदा अशा चरित्रात्मक चित्रपटांत तेच तेच कलाकार विविध चित्रपटांतून पुन्हा पुन्हा दिसून येतात. प्रत्येक चित्रपटासाठी सारखी टीम ठेवण्यामागे काही खास कारण?

‘ट्युनिंग’ हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. पण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची शिवभक्ती! म्हणजे अर्थातच महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात शिवाजी महाराज रक्ताच्या थेंबाथेंबात आहेतच, पण अभिनय करताना त्या तोडीचा अभिनय सर्वच करू शकतील का, हेदेखील पाहणं महत्त्वाचं ठरतं. दुसरं म्हणजे, मराठी चित्रपटात तुम्ही काम करता, तेव्हा ज्या दर्जाचं तुम्ही काम करता, ज्या व्यस्त वातावरणात काम करता तेवढे पैसे मिळतीलच असे नाही. गेले चार चित्रपट जे कलाकार माझ्यासोबत आहेत, त्यांनी अमाप कष्ट उपसले. म्हणजे किल्ल्यांवर राहून सोयी उपलब्ध नसताना शूटिंग पूर्ण केले, अशी कलाकार मंडळी मला मिळाली. त्यामुळे ती मला नक्कीच सोडायची नाहीत. त्यातही मृणालताई आणि चिन्मयला आऊसाहेब आणि शिवाजी महाराज ही भूमिका मी देऊन टाकलीय. आऊसाहेब आणि शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आराध्य दैवतं आहेत. त्यांच्यावर सर्व डोलारा उभा आहे. ही दोन पात्र सोडली, तर ज्याच्या त्याच्या अभिनयानुसार, वकुबानुसार आणि भूमिकांच्या गरजेनुसार कलाकारांना भूमिका देतो.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.