मुंबई : महावितरण कडून वीज बिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. मुलुंड पूर्व येथील साईनाथ नगर , महात्मा फुले रोड येथे राहणाऱ्या दोघा भावांवर शासकीय कामकाजात अडथला निर्माण करण्यासाठी तसेच महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील भाषेचा उपयोग करून जीवे मारण्याची धमकी देण्यासाठी भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५३, ५०९, ५०६(२) व कलम ३४ नुसार गुन्हा दाखल करून दोघे भाऊ सचिन मनोहर बोराडे व योगेश मनोहर बोराडे यांना नवघर मुलुंड पोलिसांनी अटक केले असून पोलीस कोठडीत ठेवले आहे. याबाबत, पुढील कारवाई करण्यात येथ आहे.
दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी ११ वाजताच्या सुमारास महिला वरिष्ठ तंत्रज्ञ या आपल्या विभागातील सहाय्यक अभियंता श्री. रहमुद्दीन शेख यांच्या आदेशानुसार ६० दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून प्रलंबित असलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी दिली होती व नमूद 20 ग्राहकांनी वीज बिल भरले नाही करिता वीज अधिनियम प्रमाणे त्यांचा वीज प्रवाह खंडित करण्याचे निर्देश त्यांना दिले होते. त्याप्रमाणे महिला वरिष्ठ तंत्रज्ञ व सोबत असलेली अप्रेंटिस महिला तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ विकास उमटोल आणि शांतवन लोखंडे वीज बिल थकविणाऱ्या ग्राहकांना संपर्क केला आणि त्यांचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर, तिसरे ग्राहक अंकुश तात्याबा बोराडे यांचे ८४ दिवसांपासून वीजदेयक थकीत असल्याने त्यांचे घरी गेले असता तेथे एक इसम नमूद घरात उभा होता. त्याने त्याचा नाव सचिन बोराडे असे सांगितले.
तेव्हा महिला तंत्रज्ञ यांनी त्यांना ग्राहक अंकुश बोराडे यांचे वीज मीटरचे बिल थकीत असून ते त्वरित भरण्याची विनंती केली अन्यथा मीटरचा वीज प्रवाह तात्पुरत्या स्वरूपात खंडित करावे लागेल असे सांगितले व तेथून पुढे दुसऱ्या ग्राहकांचे वीज थकबाकी बघण्यासाठी गेले. त्यानंतर पाऊण तासाने दुपारी साडेबारा सुमारास महावितरणचे कर्मचारी परत अंकुश बोराडे या ग्राहकाचा वीज मीटर जवळ आले व परत सचिन बोराडे यांना वीज देयक भरा अन्यथा वीज जोडणी तोडावी लागेल असे स्पष्ट केले त्यावेळी तो म्हणाला कि, “माझे वीज मिटरला हात लावून दाखव मी तुला जीवे ठार मारेन. वीज मीटर कनेक्शन खंडित करीत असताना सचिन बोराडे हा महिला तंत्रज्ञाच्या अंगावर धावून येत “माझे वीज मीटर ला तू हात कशी लावतेस?” तसेच अत्यंत अर्वाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ करून “मी कोण आहे माहित नाही काय?
माझे वीज मीटर ला तू हात कसा लावला” असे बोलत तेवढ्यात तेथे अजून एक अनोळखी इसम येऊन “तू कशी काय लाईट कट करतेस?” असे बोलून चप्पल हातात घेऊन महिला तंत्रज्ञाच्या अंगावर धावून आला त्यावेळी तेथे असलेल्या त्यांचे घरातील दोन महिलांनी त्याला हाताने धरून मागे ओढले. त्या इसमाने अर्वाच्य व अश्लील भाषेचा वापर करून महिला तंत्रज्ञाला जिवंत साईनाथ नगर मधून बाहेर जाऊ देणार नाही अशी धमकी दिली. शासकीय कामकाजात अडथळा करण्याकरिता महिला तंत्रज्ञांनी सहाय्यक अभियंता शेख यांच्या मदतीने पोलीस तक्रार केली. सदर घटनेबाबत, दोघे भाऊ सचिन मनोहर बोराडे व योगेश मनोहर बोराडे यांना नवघर मुलुंड पोलिसांनी अटक केली असून पोलीस कोठडीत ठेवले आहे. याबाबत, पुढील कारवाई करण्यात येत आहे.