मुंबई : शंकर महाराज म्हणजे अगदी अलीकडचे साधू. नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये असे म्हणतात, शंकर महाराजांसाठी हे अगदीच सार्थ आहे. त्यांच्या जन्माचा, आणि पुढच्या आयुष्याचंही थांग लागत आहि आज त्यांचा प्रकट दिन, तेव्हा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
इ.स. १७८५ च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे श्री नारायण अंतापूरकर पती-पत्नीस बालक सापडले. श्री. व सौ. नारायण अंतापूरकर यांना संतती नव्हती व ते शिवभक्त असल्याने त्यांनी या बालकाचे नाव शंकर ठेवले. पुढे हेच बालक शंकर हिमालयाकडे निघून गेले. भारत भ्रमणात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अवतारकार्याचे स्वरूप दर्शवून दिले. सातपुड्याच्या परिसरातील दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तेथे सुपड्याबाबा म्हणून मानू लागले, तर खान्देशात कुँवरस्वामी, गौरीशंकर, गुजरातमध्ये देवियाबाबा, इस्लाममध्ये रहिमबाबा, आफ्रिकेत टोबो, तर अरबस्थानात नूर महंमदखान, मध्य भारतात लहरीबाबा, दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानीत.
अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरू मानत. ते भक्तांना स्वामीसेवा जप करावयास लावत. सोलापूर येथील शुभराय मठ, त्र्यंबकेश्वर येथील रामभाऊ ऊर्फ रामचंद्र अकोलकर यांचे घर, अहमदनगर येथील डॉ. धनेश्वर, नारायणराव राजहंस (बालगंधर्व), प्रल्हाद केशव अत्रे, अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांचे भक्त होऊन गेले. त्या भक्तपरिवारातील अनेकांनी सद्गुरू शंकर महाराज यांच्याबद्दल आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. महाराजांच्या शब्दांत- माझी जात, धर्म, पंथ कोणता? हे शोधू नका. माझ्या बाह्यरूपाला पाहून तर्क-वितर्क करू नका. सर्वांशी प्रेमाने वागा. सिद्धींचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात, अशी शिकवण त्यांची भक्तांसाठी असे. महाराजांनी भक्तांचे गर्वहरण करण्यासाठी किंवा परीक्षा बघण्यासाठी चमत्कार केले. परंतु सगळ्यांनी त्याच्या नादी लागू नये, असेही स्पष्ट केले.
भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी २६ एप्रिल १९४७ रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. सदगुरू शंकर महाराजांनी भक्तांना त्या-त्या भागात दर्शन दिले तिथे आता मंदिरे आहेत व सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो. आजही भक्तांना दृष्टांत देणारे व हाकेस धावणारे श्री शंकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आज रोजी साजरा होतो. पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर असून, हे स्थान लाखो भक्तांचे श्रध्दा स्थान आहे.