
ताडोबामध्ये मटका आणि बजरंग या दोन वाघांची झुंज होऊन नुकतंच एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना चर्चेत होती. या लढाईमध्ये मृत्यूशयी पडलेल्या बजरंग वाघाची ही हृदयद्रावक कहाणी...
रक्तरंजित लढाया या कायम राज्य स्थापनेसाठी, विस्तारासाठी आणि स्त्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, वर्चस्व गाजवण्यासाठी लढल्या जातात. निसर्गामध्ये होणारी ही लढाई शस्त्रांनी कधीच लढली जात नाही, तर ती लढली जाते मुठीतल्या हिमतीवर आणि पंजातल्या पकडीवर.
ताडोबा, मध्य भारतातील एक समृद्ध जंगल. इथे उपलब्ध असणारी मुबलक शिकार आणि बारामाही पाणी एका वाघाला दुसर्याशी लढायला प्रवृत्त करतात. सामान्यतः एखादा प्रबळ नर वाघ साधारण एक दशक सहज राज्य करतो. पण, इथे इतकी टोकाची स्पर्धा आहे, एक वाघ चार-पाच वर्षांपेक्षा जास्त राज्य करू शकत नाही. काटेरी झुडूपाच्या सिंहासनावर सत्ता चालविणार्या या प्रत्येकाला मानाचा मुजरा.
‘The Lion King’ चित्रपटामधलं एक वाक्य आहे ‘King's time as ruler rises & falls like the sun.’ ही गोष्ट आहे ताडोबाच्या अतिशय धीट आणि कर्तृत्ववान बजरंग आणि छोटा मटका नावाच्या दोन नर वाघांची. बजरंग, त्याला ना वाघडोह इतकं कधी प्रेम मिळालं, ना मटकासुर सारखी प्रसिद्धी. त्याने ना दोन दोन किलोमीटर चालत रोडशो केला, ना कधी तो खूप आक्रमक झाला. पण, त्यामुळेच त्याचं दिसणं हीच मोठी पर्वणी असायची. तो कधीतरीच दिसायचा रस्ता ओलांडताना आणि क्षणात दिसेनासा व्हायचा. खूपवेळा तर त्यांचे पायाचे ठसे बघूनच समाधान मानावे लागायचे.
गेल्या दशकाच्या सुरुवातीला वाघडोह येडाअण्णाला हरवून ताडोबाच्या मोहर्ली रेंजवर त्याची सहचारिणी माधुरीसह राज्य करत होता. त्यांच्या लाडल्या सोनम, मोना, लारा आणि गीता मोठ्या झाल्या आणि सोनमने तेलियाच्या आसपासचा परिसर आपल्या आईकडून ताब्यात घेतला. माधुरी बफर क्षेत्रात ढकलली गेली. त्यावेळी वाघडोह आपल्या सिंहासनाचा त्याग करून तिच्या सोबत निघून गेला. रिकामी झालेली गादी बजरंगने चालवायला घेतली. त्याला काय आयते राज्य मिळाले अशी निर्भत्सनाही त्याच्या वाट्याला आली. पण, मग मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. ताडोबाच्या मोहर्ली भागात त्याने आपली एकहाती सत्ता चालवली. एक काळ असा होता की त्याला आव्हान देऊ शकेल असा दुसरा नर वाघ ताडोबात नव्हता. सगळी मोहर्ली श्रेणी त्याच्या पंज्याखाली होती. 2019 मध्ये कोळसा श्रेणीतील दोन तरुण नर वाघ ताला आणि रूद्र सर्वप्रथम मोहर्ली श्रेणीत घुसले पण अनुभवी बजरंग समोर त्यांचा निभाव लागला नाही आणि त्यांना ताडोबा श्रेणीत सरकावे लागले. त्याच्या भागात एकावेळी सोनमसह सहा-सात वाघिणी होत्या. आज तो जवळपास 25 पेक्षा जास्त शावकांचा पिता आहे. ताडोबाला समृद्ध करण्यात जितका वाटा वाघडोहचा आहे, तितकाच बजरंगचा आहे. राज्य मिळवणे हे जरी कठीण असले तरी मिळालेले राज्य टिकवणे आणि वाढवणे, हे त्यापेक्षा कठीण काम होते हे बजरंगने केले त्यामुळे लढाई न लढता जरी राज्य मिळाले असले तरी बजरंगने आपले सामर्थ्य आणि कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केलं आहे.
गेले दीड वर्ष छोटा दाढीयल नावाचा तरुण रक्ताचा नर वाघ मोहर्ली भागात आल्यावर बजरंगला आपले राज्य सोडावे लागले होते. पण तो हरला नाही, वाढत्या वयासोबत मनाने थकला नाही. तो नवीन प्रदेशाच्या शोधत वणवण फिरत राहिला. कधी ताडोबा परिसरात तर नंतर निमडेला भागात गाई गुरांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत राहिला.
इकडे ताडोबाची युद्धभूमी 2019 नंतर वेगाने बदलली. सतत तीन -चार वर्ष ताडोबाच्या जमिनीवर निर्विवाद राज्य केल्यानंतर मटकासुरने कमावलेल्या स्थिर साम्राज्याच्या गादीवर मटकासुरचे आणि छोटी ताराचे दोन राजकुमार ताराचंद आणि छोटा मटका बसतील असे वाटत होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. आपल्या भावाच्या ताराचंदच्या अकस्मात मृत्यूने एकटा पडलेला छोटा मटका कित्येक महिने नुसता वणवण फिरत राहिला. अधूनमधून माया आणि इतर वाघांना टक्कर देत त्याचा राज्याचा शोध सुरू झाला. त्याचवेळी मोगली आणि दोघे भाऊ रुद्र आणि ताला मोहर्ली श्रेणीतील बजरंग समोर निभाव न लागल्याने ताडोबाच्या हद्दीत घुसले. मटकासुरचे वय बघता नव्या दमाच्या तीन नर वाघांना तो एकच वेळी टक्कर देऊ शकला नाही आणि बाहेर फेकला गेला.
छोटा मटकाची तारुण्यातील वर्षे रक्तरंजित होती. त्याला आता वास्तविक जगात लढण्याची सवय करून घ्यायची होती. दिसायला देखणा, निळे डोळे, रूंद जबडा, भेदक नजर आणि लढाऊ वृत्ती हे सगळे गुण त्याच्याकडे अगदी भरभरून होते. 2021 च्या पावसाळ्यात, छोटा मटका मोगलीकडून वाईट रीतीने मारला गेला त्यावेळी मोगली ताडोबाच्या ईशान्य भागाच्या अलिझंजा भागात राज्य करत होता. एप्रिल 2022 मध्ये अलिझंजा नवेगाव निमडेला भागावर छोटा मटकाने आपला वरचश्मा निर्माण केला आणि मोगलीला हद्दपार केले. छोटा मटका अलिझंजा, नवेगाव रामदेगी ते अगदी कोअरमध्ये काळाआंबापर्यंत राज्य करत आहे. त्याने बबली, भानुसखिंडी आणि झरनी या त्याच्या भागातील तीनही राण्यांना जिंकले आहे. त्याच्या समकालीन नर वाघांच्या तुलनेत सगळ्यात मोठा प्रदेश आज त्याच्याकडे आहे. योद्धयाच्या अंगावरील घाव त्याचे सामर्थ्य आणि पराक्रम दाखवतात. छोटा मटका आज तेच घाव अभिमानाने मिरवत आहे.
काल ताडोबाच्या सरहद्दी घनघोर युद्ध झाले. स्थिर राज्याच्या शोधत फिरणारा बजरंग नवेगाव- निमडेला भागात छोटा मटकाच्या राज्यात पोहोचला. आपले राज्य वाचवण्यासाठी छोटा मटका आणि आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी बजरंग एकमेकांवर तुटून पडले. या लढाईत बजरंगला स्वतःचे प्राण गमवावे लागले, तर छोटा मटका जबर जखमी झाला.
बजरंग कायम राजासारखा जगला. शेवटपर्यंत जगण्याचा संघर्ष करत राहिला आणि एका योध्याला जे मरण अपेक्षित आहे तेच त्याने स्वीकारले. ताडोबाच्या इतिहासात जशी वाघडोह, नामदेव, गब्बर, मटकासुर यांची नाव घेतली जातील, त्यातलं एक नाव बजरंगचं पण असेल. आठवणींच्या आकाशात तो कायम चमकत राहील. येणार्या काळात कोण कुठे स्थिरावतो आणि कोण कोणावर भारी होतो हे तो काळच ठरवेल, पण ताडोबाची युद्धभूमी मात्र सदा धगधगत राहील.