राज ठाकरेंचे कोणते शिलेदार लोकसभेच्या मैदानात उतरणार?

    17-Nov-2023
Total Views |
Raj Thackeray and Lok Sabha Election 2024


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु झालीय. दरम्यान मागच्या महिन्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली. आणि लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. मात्र मनसेवर नेहमीच आपल्या भूमिका बदलण्याचा आरोप होतो. टोलचा विषय असू दे, की पंतप्रधानांना आधी पाठिंबा मग केलेला विरोध असू दे, की मराठी माणसावरून थेट हिंदुत्वाचा विषय असू दे. राज ठाकरेंनी वेळोवेळी कालानुरुप भूमिका घेतली. यात अजून एका भूमिकेची भर पडली. ती म्हणजे 2014 साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली होती की, मनसे यापुढे कधीही लोकसभा निवडणूक लढवणार नाही. त्यावेळी राज ठाकरेंनी भूमिका मांडली होती की, राष्ट्रीय पक्षाने विधानसभेच्या निवडणुका लढवू नयेत आणि प्रादेशिक पक्षांनी लोकसभा लढून नयेत.

त्यानंतर 2019 साली मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुक लढवली. ज्यात राज ठाकरेंच्या कित्येक लोकसभेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. पण यासगळ्यानंतर २०२४ ला मनसे लोकसभा निवडणुक लढवणार का?आणि त्यानंतर मनसेला मतदारराजा साथ देणार का? असे प्रश्न विचारले जात असताना. लोकसभा निवडणुकीसाठी मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहिर झाली. त्यामुळे आज आपण मनसेच्या संभाव्य उमेदवारांबद्दल आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल तसेच त्यांना झुंज देणाऱ्या इतर पक्षांच्या उमेदवारांबद्दल जाणून घेणार आहोत.
 
सुरुवात आपण कल्याण लोकसभा मतदारसंघापासून करूया. मुळात मनसेची राजकीय कारकिर्द पाहिली तर २००९ ला १३ आमदार निवडून आलेल्या मनसेला २०१४ आणि २०१९ मध्ये फक्त एक आमदार निवडून आणता आला. ते म्हणजे राजू पाटील. मुळात राजू पाटील हे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे इतर पाच विधानसभा मतदारसंघात त्यांचा जम नाही.त्याउलट शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग दोन टर्म कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेत. २०१४ मध्ये १७ प्रतिस्पर्ध्यांना चितपट करत त्यांनी खासदारकी मिळवली. तर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबाजी बाळाराम पाटील यांचा ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी पराभव केला होता. बेकायदा बांधकामे, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, विकासकामे, असे प्रश्न इथल्या मतदारांपुढे आहेत.

त्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघात मनसेचे अभिजित पानसे आणि अविनाश जाधव संभाव्य उमेदवार असल्याचं सांगितले जात आहे. ठाण्यातून सध्या ठाकरे गटाचे राजन विचारे खासदार आहेत. राजन विचारे हे आनंद दिघेंचे कट्टर कार्यकर्ते राहिलेत. पण एकनाथ शिंदेंचा ठाणे हा बाल्लेकिल्ला आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६७ पैकी राजन विचारेंच्या पत्नी नंदिनी विचारे वगळता ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झालेत.एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ठाण्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना विचारेंना भारी पडणार आहे. त्यामुळे अभिजित पानसेंना आणि अविनाश जाधव यांना जर ठाण्याच्या राजकारणात स्थान मिळवायचं असेल तर आधी राजन विचारेंशी आणि नंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराशी टक्कर द्यावी लागेल. या जागेवरही वाहतूक कोंडी, बेकायदा बांधकामे, झोपडपट्टी पूर्नवसन, पाणी, वाहतूक पायाभूत सुविधा आदी प्रश्न कायम आहेत.

त्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे मनसेचे संभाव्य उमेदवार असल्याचं सांगितल जातय. पण पुणे लोकसभेवर १९९१ ते २०१९ पर्यत भाजपाची सत्ता होती. त्यामुळे वसंत मोरेंना पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे आव्हान आहे.मग उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शालिनीताई ठाकरे या मनसेच्या संभाव्य उमेदवार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या हा मतदार संघ महायुतीकडे आहे. या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर आहेत. जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. या मतदार संघात मनसे तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे शालिनीताई ठाकरेंपुढे काँग्रेस आणि महायुती, अशा दोन उमेदवारांचे तगडे आव्हान आहे. काँग्रेसचे संजय निरुपमदेखील २०१४ च्या निवडणुकीत रिंगणात होते. त्यांच्या पाठिशी या मतदार संघातील पारंपारीक काँग्रेसचा मतदार आहे. त्यामुळे या उमेदवारांसमोर तग धरून रहाण्यासाठी राज ठाकरेंना जोरदार बॅटींग करावी लागेल, तसेच नवे मुद्दे समोर आणावे लागतील.

तसचं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मनसेचे बाळा नांदगावकर संभाव्य उमेदवार आहेत. पण या मतदारसंघात अरविंद सावत खासदार आहेत. जे सध्या ठाकरे गटात आहेत. पण २०१९ च्या निवडणुकीचा आढावा घेतला तर २०१९ ला अरविंद सावंत यांच्याविरोधात काँग्रेसचे मिलिंद देवरा उभे होते. मिलिंद देवराचा या मतदारसंघात चांगलाच प्रभाव आहे. पण हा मतदारसंघ भाजपाचा बाल्लेकिल्ला राहिलेलाय. यामुळेच भाजपाच्या पाठिंब्याने अरविंद सावंत दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे आता जागेवर भाजपचं बलाबल अधिक आहे. त्यामुळए बाळा नांदगावकर यांना देखील जोरदार तयारी करावी लागेल.त्यानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर तिथे मनसेचे प्रकाश महाजन संभाव्य उमेदवार आहेत. संभाजीनगर हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय.पण आता सध्या तिथे एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार आहेत. अशात शिवसेना , एमआयएम अशी टक्कर अटळ असताना प्रकाश महाजनांसमोर दुहेरी आव्हान आहे.

मग चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी राजू उंबरकर हे मनसेचे संभाव्य उमेदवार आहेत. ह्या मतदार संघात ही भाजपाची तीन टर्म सत्ता होती. मात्र २०१९ मध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर चंद्रपूर मतदारसंघाचे खासदार झाले. त्यात राजू उंबरकरांना ही लोकसभा निवडणुक भारी जाणार असल्याचे चिन्ह आहेत.त्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघात मनसे वैभव खेडेकर यांना उमेदवारी देऊ शकते. तिथे २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रायगड जिल्ह्यामधील ४ आणि रत्‍नागिरी जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ह्या मतदारसंघात वैभव खेडेकर यांना भरपूर मेहनत करावी लागणार आहे. अशा सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती पाहता. जर मनसेला मतदारराजाने साथ दिली नाही. तर २०२४ च्या निवडणुकीत ही मनसेच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त होऊ शकते. मुळात मनसे हा राज ठाकरे यांच्या वैयक्तिक करिष्म्यावर अवलंबून असलेला पक्ष आहे. पण मनसेचं आज महाराष्ट्राच्या कोणत्याच जिल्हात पक्षाची मजबूत अशी पक्ष संघटना नाहिये. त्यामुळे लोकसभेच्या रिंगणात पक्षाची मजबूत बांधणी करणे हे मनसेसाठी फार गरजेचे आहे. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.