मुंबई : बाल हक्कासाठी लढा देणाऱ्या 'क्राय' संस्थेकडून देशभरातील विविध राज्यांमध्ये इंटरनेट वापर संदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील लहान मुलांकडून सर्वात जास्त इंटरनेटचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्याचप्रमाणे चॅट सुविधेच्या माध्यमातून ६ ते १४ वर्षांमधील मुला-मुलींची फसवणूक झाली असल्याचे सर्वेक्षणात उघडकीस आले आहे. त्यामुळे पालकांनी आपला मुलगा किंवा मुलगी मोबाईलमध्ये काय बघतात, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बालहक्क आणि बालकांची सुरक्षितता यांच्याशी निगडित समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेली आघाडीची बालहक्क स्वयंसेवी संस्था 'क्राय'ने, लहान मुलांमध्ये सायबर सुरक्षितता जागरूकता निर्माण करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या आपल्या अभियानाचा भाग म्हणून, दि. १४ नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील २० हजार शालेय मुलांना यासंदर्भातील शिक्षण दिले आहे. हे देशव्यापी अभियान यंदाच्या जुलैत सुरू झाले असून , या अभियानाची सांगता जानेवारी २०२४ मध्ये होणार आहे.
'पॉक्सो अँड बियॉण्ड : अंडरस्टॅण्डिंग ऑनलाइन सेफ्टी ड्युरिंग कोविड, 2023’ या 'क्राय'द्वारे घेण्यात आलेल्या संशोधन अभ्यासानुसार, महाराष्ट्रात सर्व वयोगटांमधील इंटरनेट वापराचे सरासरी प्रमाण सर्वाधिक आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश आणि मग कर्नाटकाचा क्रमांक लागतो.
इंटरनेटचा सर्वाधिक वापर बघितल्यास, पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्ये (१४-१८ वर्षे वयोगट) इंटरनेट वापराचे प्रमाण सर्वाधिक आहे, त्यानंतर प्रौढ स्त्री-पुरुष (१८ वर्षांवरील) आणि त्यानंतर लहान मुले-मुली (६-१४ वर्षे वयोगट) असा क्रम आहे.
महाराष्ट्रात मात्र लहान मुला-मुलींमध्ये सरासरी इंटरनेट वापराचे प्रमाण अधिक आहे. एकंदर इंटरनेट वापराचे सरासरी प्रमाण सर्व वयोगटांमध्ये लिंगानुसार किंचित बदलते, पण महाराष्ट्र याला अपवाद आहे. सायबर छळाला सामोरे गेल्याचे तसेच अज्ञात व्यक्तींकडून ऑनलाईन, विशेषत: स्नॅपचॅट ॲपवर, फ्रेंडशिप रिक्वेस्ट्स येत असल्याचे मुलांनी सदर कार्यशाळांदरम्यान नमूद केले. स्नॅपचॅट ॲप हे इन्स्टाग्राम किंवा फेसबुकहून अधिक लोकप्रिय असल्याचेही आढळले.
बालहक्क आणि बालकांची सुरक्षितता यांच्याशी निगडित समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. हे अभियान आजवर १२ राज्यांतील २३ शहरांमध्ये राबवण्यात आले असून, ७८८ स्वयंसेवक या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. शालेय मुलांना आभासी/सायबर विश्वात माहितीच्या सुरक्षित व जबाबदार वापरास उत्तेजन देण्याचे तसेच त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ह्या अभियानापुढे आहे.
तंत्रज्ञान हा लहान मुलांच्या आयुष्यांचा अविभाज्य भाग होत आहे. लहान मुले ऑनलाइन असतात, तेव्हा त्यांचे हानीकारक किंवा अयोग्य काँटेण्टपासून, अवांच्छित लोकांपासून किंवा कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांपासून संरक्षण करणे अत्यावश्यक असते. क्राय गेल्या अनेक वर्षांपासून बालसंरक्षणाच्या क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे देशभरात घेतल्या जाणाऱ्या सायबर-सुरक्षितता कार्यशाळाही लहान मुलांना सुरक्षित राखण्याच्या आमच्या प्रयत्नांचाच एक भाग आहेत.
क्रीॲन रबाडी संचालिका, क्राय, पश्चिम प्रदेश
कोविड आधीच्या काळापर्यंत शाळेत जे शिकवले जायचे तो गृहपाठ असायचा.परंतु,कोविड काळात नाईलाजाने मुलांच्या हातात मोबाईल आला. एकप्रकारे नवीन तंत्रज्ञानाचा फायदाच झाला पण अभ्यासासोबत मोबाईलवर इतर नको त्या गोष्टीही मुलांच्या सहज नजरेत आल्या. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल पहाण्याचे प्रमाण वाढले आणि पालकांची चिंताही वाढली. मुलांच्या हातून मोबाईल कसा काढावा हा त्यांचा मुख्य प्रश्न आहे. एकंदर पालकांनी जबाबदारी घेऊन मुले काय पाहात आहेत, याकडे लक्ष द्यावे. मोबाईलसाठी वेळेची मर्यादा घालावी. काही संकेतस्थळे बंद करावीत. शाळेतूनही शिक्षकांनी मुलांना समुपदेशन करणे गरजेचे आहे.
- भानुदास येवलेकर, प्रकल्प अधिकारी, चाईल्ड हेल्पलाईन, केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव