जालना : आत कुटुंब असतानाही जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला झाला. त्यांचं ऑफिस पेटवलं. आम्ही कुणाची घरं पेटवली नाहीत. जातनिहाय जनगनणा झाली पाहिजे. हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. जिल्ह्यात, तालुक्यात सभा घेतली पाहिजे. असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. जालन्यातील अंब़डमध्ये ओबासींची एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार उपस्थित होते. यावेळी सभेत बोलताना भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला.
छगन भुजबळ म्हणाले, "आज एक नेता आमच्यात नाही, ते म्हणजे गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे असते तर आज आमच्यामसोर संकटं नसती. आरक्षणाच्या मुद्द्यावर इंद्रा साहनी केस झाली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं प्रत्येक राज्याचा आयोग निर्माण करायचा आणि त्या माध्यमातून आरक्षण द्यायचं. १६ नोव्हेंबर १९९२ला हे अधिकार राज्य आणि केंद्राकडून काढून घेतले. त्यानंतर ते आयोगाकडे गेले. मराठा आरक्षणासाठी त्यावेळीही आंदोलने झाले. आयोगापासून अनेक आयोगांनी सांगितलं आरक्षण देता येणार नाही. आमचा दोष आहे. आम्ही काय केलं. आम्हाला तर घटनेनं दिलं. बाबासाहेबांनी दिलं. मंडल आयोगाने दिलं. नऊ न्यायाधीशांनी त्यावर शिक्का मारला. यांना काहीच माहीत नाही."
"हे आरक्षण गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. आज ७५ वर्ष झाली. दलित समाजाला संविधानाने आरक्षण दिलं. एसपी झाले, कलेक्टर झाले, आयएएस झाले. पण आजही या झोपडपट्ट्यातून आमचे गोरगरीब दलित बांधव राहतो. गरीबी दूर झाली नाही. ओबीसींचीही गरीबी दूर झाली नाही. हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. जे वर्षानुवर्ष पिचलेले आहेत. दबलेले आहेत. त्यांना वर आणण्यासाठी दिलेलं हे आरक्षण आहे. हे आरक्षण म्हणजे काय आहे हे तर समजून घ्या. सुरुवातीला २५० जाती होत्या. आता ३७५ हून अधिक जाती आहेत. आयोगाकडे गेले आणि आयोगाने म्हटलं घ्या. आम्ही घेतलं. नकार दिला नाही. तुम्ही या पण कायद्याने या. दादागिरी करू नका. मराठा समाजाला काही मिळत नाही असं आहे का? चंद्रकांत पाटील समिती आणि इतरांनी दिलेला रिपोर्ट पाहा. मराठ्यांच्या योजनांसाठी कोट्यवधी रुपये वाटण्यात आले.”
“मोदींनी दिलेलं १० टक्के आरक्षणात ८५ टक्के मराठा समाजाचे लोक आहेत. ६० टक्क्याच्यावर ४० टक्के आरक्षणात मराठा आहे. आमच्या २७ टक्क्यात कुणबीही आहे. तुम्हाला नाही असं नाही. मराठा विद्यार्थ्याला वस्तीगृह नसेल तर ६ हजार रुपये मिळतो. तो ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत नाही. १० ते ११ हजार कोटी वाटले आहेत. ओबीसी महामंडळ आधीपासून आहे. त्याला हजार कोटीही दिले नाही. द्या हिशोब. तुम्हाला हवंय घ्या. पण आमचं काय? द्या ना आम्हाला.”
"मराठा समजाला काही मिळत नाही असे नाही. अनेक योजनेतून कोट्यावढी रुपये निधी मिळतोय. आरक्षण कसे मिळाले हे यांना काहीच माहित नाही. सकाळी उठतो आणि आमची लेकरं बाळ... लेकरं बाळ... करतो. छगन भुजबळ पिठलं भाकर खाऊन आला. अरे होय मी पिठलं भाकरी खाऊन आलो आणि दिवाळीत पण मी घरी पिठलं भाकरी खातो. पण तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही. उपोषण केले, पोलिसांचा लाठीचार्ज झाला. तो लाठीचार्ज सगळयांनी पहिला. फक्त ७० पोलीस कर्मचारी होते तिथे तेव्हा दगडाचा मारा सुरु झाला. ७० पोलीस काय पाय घसरून पडले का? महिला आयोगाने त्या महिला पोलिसांना विचारा. शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सुनेला परत पाठवले पण यांनी काय केले तर महिला पोलिसांवर दगडफेक केली." अशी टीका भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.