मनोज जरांगेंच्या मागे कोण आहे हे लवकरच बाहेर येईल : राज ठाकरे
16-Nov-2023
Total Views | 83
मुंबई : मनोज जरांगेंना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जातीय तणाव निर्माण कोण करतंय? मनोज जरांगेंच्या मागे कोण आहे हे लवकरच बाहेर येईल. असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांवर ही टीकास्त्र डागले आहे.
राज ठाकरे म्हणाले, "जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणे हे होत होते महाराष्ट्रात, पण दुसऱ्याच्या जाती बद्दल द्वेष निर्माण करणे हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू झाले. यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय,माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा, मी जात पात मानत नाही, त्या माणसाला महत्त्व देतो." असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
हवा आणि ध्वनिप्रदूषणामुळे कोर्टाने दिवाळीत फटाके वाजण्यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. आता फटाके कधी वाजवायचे, सण कसे साजरे करायचे हे पण कोर्ट ठरवणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मराठी पाट्या संदर्भात आम्ही मुद्दा घेतला तेव्हा व्यापारी कोर्टात गेले, हे जातात कसे ? पण सरकारमधून काही हालचाली होत नाही. कदाचित आम्हालाच हात पाय हलवावे लागतील. असा सुचक इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे.