सुनावणी LIVE दाखविली जात आहे याचं न्यायमूर्तींनी भान ठेवावं : सरन्यायाधीश
"निकाल देताना शब्द जपून वापरावेत अन्यथा सोशल मीडियावर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो!", असेही ते म्हणाले.
16-Nov-2023
Total Views |
मुंबई : समाज माध्यमांद्वारे निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी न्यायमूर्तींनी स्वत:ला तयार केले पाहिजे, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. तसेच न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरु असताना न्यायमुर्तींनी आपण काय बोलत आहोत याचं भान ठेवावं, अन्यथा सोशल मीडियावर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, असेही ते म्हणाले आहेत.
मागील महिन्यात हार्वर्ड लॉ स्कूल सेंटरने एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी 'न्यायव्यवस्थेवर सोशल मीडियाचा प्रभाव' यावर बोलताना सरन्यायाधिशांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सोशल मीडिया येण्यापुर्वी न्यायालयात फार कमी पत्रकार असायचे. परंतू, आता असे लाखों पत्रकार आहेत जे न्यायालयीन कामकाजाचे थेट वार्तांकन करत आहेत.
त्यामुळे आता दिवसाच्या शेवटी नाही तर प्रत्येक मिनिटाला आपल्याला समोर काय घडत आहे याची माहिती मिळते, असेही ते म्हणाले. तसेच सोशल मीडिया न्यायाधीशांसाठी समस्या निर्माण करतो, असेही त्यांनी कबुल केले. ते पुढे म्हणाले की, "तंत्रज्ञानाला आता पर्याय राहिलेला नाही आणि त्यामुळे सोशल मीडियालाही पर्याय नाही. आम्ही अशा समाजात काम करत आहोत जिथे सोशल मीडियाचा विस्तार आहे," असेही ते म्हणाले आहेत.
ज्यावेळी सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले जाते त्यावेळी अनेकदा न्यायाधीश आणि वकील यांच्यातील संवादाचा सोशल मीडियावर चुकीचा अर्थ लावला जातो, असे ते म्हणाले. तसेच ते ट्विटर आणि फेसबुक वापरत नाहीत परंतू, वर्तमानपत्र वाचतात, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायाधीशांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले.
तसेच "आम्हाला पुन्हा नवीन कौशल्य प्राप्त करण्याची गरज आहे. न्यायालयातील कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण सुरु असताना आम्ही न्यायालयात काय बोलतो याबद्दल आम्हाला अधिक जागरूक असणे आवश्यक आहे. अन्यथा, गैरसमज होण्याची शक्यता आहे," असेही सरन्यायाधिश म्हणाले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.