मुंबई : भांडवल उभारणीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील अक्षय ऊर्जा संबंधित कंपनी इरेडाचा (भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था - आयआरईडीए) आयपीओ पुढील आठवड्यात बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने गुरुवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. कंपनीचा आयपीओ २१ नोव्हेंबरला उघडेल आणि गुंतवणूकदार २३ नोव्हेंबरपर्यंत आयपीओसाठी अर्ज करू शकतात.
इरेडा आयपीओमध्ये रु. १० चे दर्शनी मूल्य असलेले ७0 कोटी शेअर बाजारात आणणार आहे. ज्यात ४० कोटी ३१ लाख ६४ हजार ७०६ हे नव्याने बाजारात आणले जातील तर तर २६ कोटी ८७ लाख ७६ हजार ४७१ शेअर 'ऑफर फॉर सेल' अंतर्गत जारी केले जातील. या शेअर विक्रीद्वारे सरकार कंपनीतील आपला हिस्सा बाजारात विक्रीसाठी आणणार आहे. दोन्ही प्रकारचे शेअर मिळून कंपनीचा आयपीओ हा ६७ कोटी १९ लाख४१ हजार १७७ इतक्या शेअरचा आहे.
इरेडाच्या एका शेअरची किंमत ३० ते ३२ रुपये इतकी असणार आहे. आयपीओसाठी अर्ज करताना किमान ४६० शेअर्सचा एक लॉट खरेदी करणे आवश्यक असेल. आयआरडीएच्या आयपीओ मधील काही शेअर कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. तर ५० टक्के शेअर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.
कंपनी आयपीओद्वारे उभारलेली रक्कम तिचा भांडवली आधार वाढवण्यासाठी आणि भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करेल. इरेडा ही देशातील सर्वात मोठी ग्रीन फायनान्स नॉन-बँकिंग कंपनी आहे. कंपनीच्या आर्थिक निकालांवर नजर टाकल्यास, २०२३-२४ या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान कंपनीचा महसूल ४७ टक्क्यांनी वाढून २३२० कोटी रुपये झाला आहे. तर नफा ४१ टक्क्यांनी वाढून ५७८ कोटी रुपये झाला आहे. ही माहिती पत्रकार परिषदेत इरेडाचे चेअरमन आणि एमडी प्रमोद कुमार दास यांनी दिली.
त्यासोबतच त्यांनी कंपनीच्या पुढील योजनांविषयी सुद्धा माहिती दिली. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत आयडीबीआय कॅपिटलचे एमडी आणि सीईओ कमल कांत उपाध्याय, बँक ऑफ बडोदा कॅपिटलचे एमडी संजीव सराफ हे देखील उपस्थित होते. आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स, बीओबी कॅपिटल मार्केट्स आणि एसबीआय कॅपिटल हे आयपीओचे प्रमुख व्यवस्थापक आहेत. आयपीओ बीएसई-एनएसई वर सूचिबद्ध होईल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.