७ कोटी ४६ लाखांची फसवणूक! ठाकरेंच्या नेत्याला रात्रीच अटक
16-Nov-2023
Total Views |
मुंबई : ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींवर रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणी अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता. यावर्षी एप्रिल महिन्यात अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे ३२ कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन आयेशा नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता.
मालेगाव कोर्ट परिसरात हिरेंच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. मालेगाव कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. राजकीय दबावतंत्रातून अद्वय हिरेंना अटक करण्यात आल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. अद्वय हिरेंसंदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. अद्वय हिरे यांना १५ नोव्हें. रोजी मालेगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.