कहाणी खवल्या मांजराची

    30-Jan-2023
Total Views | 1213

Pangolin



शेतकरी आणि सामान्य जनतेची मदत करणारे खवले मांजर हे मोठ्या प्रमाणात वाळवी, मुंग्या, डोंगळे फस्त करतात. हा प्राणी एक प्रकारे नैसर्गिक ‘पेस्ट कंट्रोल’चे काम करतो. ते ही अगदी विनामूल्य. निसर्ग साखळीतील हा महत्त्वाचा घटक आज धोक्यात आहे, मोठ्या प्रमाणात चोरटी शिकार, बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि त्यातून मिळणार्‍या पैश्यांमुळे हा प्राणी जगात तसेच कोकणात संकटात सापडला आहे. जाणून घेऊया याच भारतीय खवले मांजराबद्दल... 

१९९०च्या दशकाच्या सुरुवातीला, एका रात्री, दिल्लीजवळच्या एका गावात, एका शेतकर्‍याच्या घराच्या बाहेर काही आवाज झाला. शेतकरी चोर आला असेल असे समजून पहायला बाहेर पडला. पण, त्याने पाहिले, की वाळवीच्या वारुळाजवळ एक विलक्षण प्राणी जमीन खोदत होता. या प्राण्याच्या पाठीवर खवले होते. परंतु, हा कुठला प्राणी आहे हे कुटुंबातील कोणालाही माहीत नव्हते. जेव्हा शेतकर्‍याने त्या प्राण्याला मारायचा प्रयत्न केला, तेव्हा त्या प्राण्याने शरीराचा गोलाकार आकार केला. नंतर, शेतकर्‍याने त्या प्राण्याला काठीने आणि कुर्‍हाडीने मारायचा प्रयत्न केला. पण तो प्राणी अजूनही शरीर गोल करून बसलेला होता. शेतकर्‍याने ठरवले, की सकाळी प्राणिसंग्रहालयाच्या अधिकार्‍यांना हा प्राणी देऊ. तो प्राणी कुठेही जाऊ नये म्हणून त्यावर एक बॅरल झाकून ठेवले. प्राणी पळून जाऊ नये म्हणून बॅरलवर जड दगडं देखील ठेवली. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा मालकाने दुसर्‍या दिवशी बॅरल तपासले, तेव्हा तो प्राणी जमीन खोदून, बॅरल वाकवून, पसार झालेला होता. हा विलक्षण प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून ‘इंडियन खवले मांजर ’ अर्थात भारतीय खवल्यामांजर होता. बर्‍याच वर्षांपूर्वी, ही घटना ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या जर्नलमध्ये प्रकाशित झाली होती. त्या रात्री, खवले मांजर भाग्यवान ठरला. परंतु अनेक असे खवले मांजर पळून जाण्यास यशस्वी ठरत नाहीत. तर वाचकांनो, सांगा, तुमच्यापैकी किती जणांना हा प्राणी माहीत आहे? आणि तुमच्यापैकी किती जणांनी खवले मांजर पाहिला आहे?


दुर्दैवाने, खवले मांजराबद्दल भारतीयांना फारच तुटपुंजी माहिती आहे. बहुतेक लोकांनी खवले मांजराबद्दल पहिल्यांदाच आज वाचले असण्याची शक्यता आहे. कोरोनाकाळात व्हायरससाठी संभाव्य मध्यवर्ती होस्ट म्हणून मीडियाचे खवले मांजरची चुकीच्या पद्धतीने माहिती दिली. खवले मांजरमध्ये विषाणू पसरल्याचा कोणताही निर्णायक पुरावा सापडला नसला तरी, या शक्यतेने खवले मांजराचे मानवाशी असलेले नाते आणि भारतातील त्याच्या स्थितीचे विश्लेषण केले गेले. कोरोना व्हायरसनंतर, अनेकजण खवले मांजराला ’चिनी’ सस्तन प्राणी म्हणून ओळखू लागले. पण, आज मी तुम्हाला चुकीच्या समजुती असलेल्या या अज्ञात प्राण्याबद्दलचे सत्य सांगणार आहे. 



 



खवले मांजर हा जगातील सर्वात जास्त तस्करी केला जाणार सस्तन प्राणी आहे. जगात खवले मांजराच्या आठ प्रजाती आढळतात. त्यातील चार प्रजाती आफ्रिकेत, तर चार आशिया खंडात आढळतात. भारतात चिनी खवले मांजर व भारतीय खवले मांजर या दोन प्रजातींचा अधिवास आहे. पूर्वोत्तर व हिमालय वगळता सर्वत्र भारतीय खवले मांजर आढळते. भारतीय खवले मांजर सर्व प्रकारच्या अधिवासामध्ये आढळते. सुमारे पाच फूट लांब संपूर्ण शरीरावर खवले असलेल्या या प्राण्याला दात नसतात. पण त्याच्या सुमारे एक फूट लांबीच्या चिकट जिभेच्या साहाय्याने तो हजारोंच्या संख्येने वाळवी, मुंग्या खातो. धोका वाटताच अंगाचे वेटोळे करतो ते कोणालाही सोडवता येत नाही. त्याचे खवले खूप मजबूत असतात. त्यामुळे त्याला निसर्गात फार कमी शत्रू आहेत. माणूस त्यांच्या बिळांचा शोध घेऊन ती बिळे खणून त्यातून खवले मांजर काढून त्याला उकळत्या पाण्यात घालून मारतात. ‘आययुसीएन‘च्या लाल यादीत भारतीय खवले मांजर धोक्यात असलेला प्राणी आहे. ‘भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२’ अन्वये खवले मांजराला प्रथम श्रेणीत समाविष्ट करण्यात आले. बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका येथेही ही प्रजाती सापडते. इतर आशियाई पँगोलिनपेक्षा भारतीय पँगोलिनच्या खवल्यांचा आकार वेगळा असून, चिनी, सुंडा आणि फिलिपिन्स खवले मांजराच्या खवल्यानपेक्षा मोठा असतो. भारतीय पँगोलिनची पुढची नखं, सुंडा आणि फिलिपिन्स खवले मांजर पेक्षा लक्षणीय प्रमाणात मोठी असतात. त्याची शरीरापेक्षा लांब असलेली चिकट जीभ, खोलवर कीटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी विशेष अनुकूल असते. मुंग्या आणि वाळवीची वारुळे फाडण्यासाठी, खवल्या मांजरपुढच्या शक्तिशाली पायांच्या वापर करते. याउलट, मागच्या पायांना कडक तळवे असतात आणि पाच बोटांवर लहान, बोथट नखे असतात.जरी सामान्यतः लाजाळू असले, तरीभारतीय पँगोलिन खेड्यापाड्यात आणि घरांमध्ये खोदण्यासाठी ओळखले जातात. भारतीय खवले मांजरला सामान्यतः एकच आपत्य होते जे ६५-७० दिवसांच्या गर्भधारणेनंतर होते.

इतका छान असा हा प्राणी, परंतु, सध्याच्या स्थितीत,भारतीय खवले मांजर अस्तित्वाच्या गंभीर तणावाखाली आहे. भारतातील खवले मांजरासाठी प्रमुख धोके म्हणजे बेकायदेशीर शिकार आणि अवैध व्यापार. खवले मांजरचे मांस हे प्रथिनांनी समृद्ध आहे असे मानले जाते आणि ते पारंपरिक, लोकऔषधी आणि काळ्या जादूमध्ये देखील वापरले जाते. खवले मांजरच्या लोकसंख्येला असलेला दुसरा मोठा धोका म्हणजे, पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये, विशेषत: चीन आणि व्हिएतनाममध्ये त्याच्या मांस आणि खवल्यांसाठी केला जाणारा आंतरराष्ट्रीय अवैध व्यापार. बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय व्यापार विशेषत: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतून, म्यानमार आणि चीनमध्ये होत असल्याचे पुरावे आहेत. २००९ ते २०१३ या कालावधीत तीन हजारांहून अधिक खवले मांजरांची शिकार करण्यात आल्याचे देशातील जप्ती अहवाल (Seizure Reports) सूचित करते. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की या कालावधीत, २५ जप्तींमध्ये अंदाजे पाच हजार किलो खवले मांजर खवले जप्त करण्यात आले आहेत. लोकसंख्या आणि वितरणाबाबतची अपुरी माहिती, शिकार आणि शिकारीपासून निर्माण होणार्‍या धोक्यांवर अधिक जोर देते.

जप्तीच्या डेटावर आधारित अलीकडील अंदाज हे देखील सूचित करतो की २००० ते २०१९ दरम्यान, जागतिक स्तरावर ८.९५ लाखांपेक्षा जास्त खवल्या मांजरांची तस्करी झाली होती. पारंपारिक आशियाई औषधांमध्ये, विशेषतः चीन आणि व्हिएतनाममध्ये खवले मांजर खवल्यांचा वापर केला जातो. खवले हृदयविकारापासून कर्करोगापर्यंत आजारांवर इलाज आहेत आणि स्तनपान देणार्‍या महिलांना दूध तयार करण्यास मदत करतात असे मानले जाते. या सगळ्या गोष्टींबद्दल वैज्ञानिक पुरावा नाही. ही महत्त्वाची गोष्ट. गेंड्याचे शिंग आणि मानवी नखांप्रमाणे, खवले मांजर स्केल (खवले) केराटिनपासून बनलेले असतात आणि त्याचा औषधी प्रभाव असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पारंपरिक आफ्रिकन औषधांमध्ये देखील, विशेषत: पश्चिम आणि मध्य-आफ्रिकेत, या खवल्यांचा वापर केला जातो.



मानवी इतिहासात, अक्षरशः प्रत्येक श्रेणीच्या देशात प्रथिनांचा स्रोत म्हणून खवले मांजराचे सेवन केले जाते. खवल्या मांजराचा आशियामध्ये असला, तरी भारत आणि इतर काही देशांमध्ये स्थानिक खप कमी आहे. जास्त भर बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय विक्रीवर असतो. कारण, किंमत जास्त मिळते. उच्च किंमत आणि दुर्मीळता बघता, ग्राहक स्वतःच्यासंपत्तीचा दिखावा करण्यासाठी आणि सामाजिक स्थिती दाखविण्यासाठी लक्झरी उत्पादन म्हणून खवले मांजर खातात किंवा त्याच्या खवल्यांनी बनलेल्या वस्तू वापरतात आणि त्या दिमाखात प्रदर्शित केल्या जातात. आफ्रिकेत, पँगोलिन हे जंगली मांस म्हणून खाल्ले जाते. अंदाजे , प्रत्येक वर्षी मध्य-आफ्रिकेत किमान ४.० लाख पँगोलिन, स्थानिक पातळीवर मारले आणि खाल्ले जातात.



प्रजातींना आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदान करूनही खवले मांजर आणि त्याच्या अवयवांचा अवैध आंतरराष्ट्रीय व्यापार होतोच. वन्य जीवजंतू आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशनात (CITES) खवले मांजरची नोंद आहे. (CITES)चे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय व्यापारात वन्यप्रजाती नामशेष होणार नाहीत याची खात्री करणे हा आहे. १९९५ मध्ये (CITES)परिशिष्ट-ब मध्ये प्रत्येक खवले मांजर प्रजातीचा समावेश करण्यात आला होता, याचा अर्थ व्यापाराचे बारकाईने नियमन केले जाईल याची खात्री केली जात आहे. २००० नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्णपणे बंद केला गेला आहे. खवले मांजरच्या अतिशोषणाविषयी सतत चिंतेमुळे, २०१६ साली याच्या प्रत्येक प्रजातीचा (CITES) परिशिष्ट ख मध्ये उेझ१७ समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय कायद्यांतर्गत, बहुतेक देशांमध्ये खवले मांजर संरक्षित प्रजाती देखील आहे. परंतु, बेकायदेशीर कापणी आणि व्यापार अव्याहतपणे चालू आहे आणि हाच या प्राण्याला असलेला सगळ्यात महत्त्वाचा धोका आहे.


२००८ पासून, आफ्रिकन खवले मांजरच्या स्केलच्या तस्करीमध्ये स्पष्टवाढ झाली, प्रामुख्याने पश्चिम आणि मध्य-आफ्रिकेपासून आशियाई बाजारपेठांपर्यंत. बेकायदेशीर, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रभाव मोजणे आणि स्थानिक वापरापासून ते विलग करणे आव्हानात्मक आहे. उपलब्ध पुराव्याच्या आधारे, डिसेंबर 2019 मध्ये खवले मांजरसाठी अंतरराष्ट्रीय प्रकृति संरक्षण संघच्या (IUCN)रेड लिस्टचे मूल्यांकन अद्ययावत केले गेले. परिणामी, याप्रजातींचे वर्गीकरण ‘गंभीरपणे धोक्यात’ तसेच ‘धोक्यात आणि असुरक्षित’ असे करण्यात आले आहे.


इतर धोक्यांमध्ये, अधिवासाचे नुकसान आणि र्‍हास यांचा समावेश होतो. ज्यामुळे खवले मांजरच्या लोकसंख्येवर अतिरिक्त ताण येतो, असे सुचवण्यात आले आहे की, खवले मांजर सुधारित आणि कृत्रिम अधिवासांशी जुळवून घेऊ शकतात. परंतु,यासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे. प्रजातींचे कृत्रिम संवर्धन आणि त्यांच्या लोकसंख्येची पुनर्स्थापना कशी करता येईल, यावर संशोधन चालू आहे. अधिवासाच्या जमीनचे पुनर्व्यवस्थापन संवर्धन प्रयत्न जटिल करतात. उदाहरणार्थ, कीटकनाशकांच्या वापरामुळे मुंग्या आणि वळवीची लोकसंख्या कमी होते, खवले मांजराच्या अन्नाचा स्रोत कमी होतो. परंतु, खवले मांजराच्या लोकसंख्येवर याच्या प्रभावाची व्याप्ती माहीत नाही. पुढील धोक्यांमध्ये रोडकिल, सापळ्यांमुळे मृत्यू आणि इतर प्राण्यांसाठी लावलेले सापळे यांचा देखील समावेश होतो.
 


भारतात, १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची ख मध्ये खवले मांजरला सर्वोच्च कायदेशीर संरक्षण दिले गेले आहे. १९९२ च्या परदेशी व्यापार (विकास आणि नियमन) कायद्याच्या ‘कलम 5’अंतर्गत देखील खवले मांजरचे अवयव आणि खवल्यांच्या व्यापारावर पूर्ण बंदी आहे. इतके संरक्षणात्मक उपाय असूनही, या जीवाची कत्तल अव्याहतपणे सुरू आहे. जंगलात किती खवले मांजर शिल्लक आहेत याची अधिकृत नोंद देखील नाहीये. भारतातील खवले मांजरांची स्थिती तुम्हाला कळण्यासाठी हे पुरेसे आहे. एखादी प्रजाती इतकी लक्षवेधी असूनदेखील किती अज्ञात असू शकते हे तुम्हाला जाणवले असेलच. मला आशा आहे की, हा लेख तुम्हाला भारतातील आणखी एका अज्ञात नैसर्गिक आश्चर्याची ओळख करून देऊ शकला असेल आणि तुम्हाला प्राणी साम्राज्याच्या, अर्थातभारतीय खवले मांजरच्या भयानक स्थितीची जाणीव करून देणारा असेल.

-डॉ. मयूरेश जोशी


अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121