पर्यावरणस्नेही शिल्पकार

    24-Jan-2023
Total Views |
sculptor Piyush Urkude


शिल्पकार जर पर्यावरणस्नेही असेल, तर असे शिल्पकाम निसर्गाचे दोहण करणारे ठरते. पियूष उरकुडे असाच एक प्रयोगशील अन् पर्यावरणवादी, निसर्गप्रेमी शिल्पकार. त्याच्याविषयी...


पियूष उरकुडे मूळचा यवतमाळचा. त्याच्या आईला कलेची विलक्षण आवड. आईचे चित्र पाहून पियूषही बालपणापासून सुरेख चित्र रंगवत. पियूषला एकदा बालपणी आईने गणपतीची मूर्ती तयार करण्याचे शिकवले आणि त्याच्या बाळबोटांनी मातीपासून सुरेख गणेशमूर्ती तयार केली. हे पियूषच्या आयुष्यातील पहिले शिल्प. आपला मुलगा शिल्पकलेमध्ये करिअर करेल असे तेव्हा पियूषच्या आईलाही वाटले नव्हते. शालांत परीक्षा उत्तीर्ण होताच पियूषच्या पालकांनी तो ‘इंजिनिअर’ व्हावा आणि कला ‘साईड बिझनेस’ म्हणून करावा, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे पियूषने शालांत परीक्षा उत्तीर्ण होताच यवतमाळमधील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकीच्या ‘डिप्लोमा’ला प्रवेश घेतला. त्यावेळीही पियूषच्या मनातील कलावंताला कलेचे धुमारे स्वस्थ बसू देत नसत.


मुलगा कलावंत झाला, तर उदारनिर्वाहाचा संघर्ष तीव्र होईल आणि कलेतून अर्थार्जन करताना अर्धे अधिक आयुष्य जाईल, असे त्यांच्या पालकांना वाटे. मात्र, पियूषला कला क्षेत्र खुणावत राहिले. दरम्यान, महाविद्यालयात जाताना पियूषने रस्त्यावरील एका तंबूत कोलकात्याचे मूर्तिकार बंगाली कलेतून दुर्गेची मूर्ती तयार करताना पाहिले. कलाप्रेमी पियूषचे पाय तिकडे न वळाले तर नवल. या बंगाली शिल्पकारांना पियूषने ”मूर्तीकलेत मलाही आवड आहे मला शिल्पकाम शिकवणार का,” असा प्रश्न किशोरवयात विचारला. ’‘ही गुरू-शिष्य परंपरा असून तुला शास्त्रोक्त शिक्षण देता येणार नाही. मात्र, तुला शिल्पकाम शिकायचे असल्यास तू अवलोकन करत, प्रयोग करत शिकायचे तर आमची हरकत नाही,” असे त्या शिल्पकारांनी सांगितले. पियूषचा हट्ट, कलेची आस्था पाहून शिल्पकार सुभाष राय यांच्या एका साहाय्यक कलावंताने पियूषला अगदी पहाटेच परीक्षा घ्यायची म्हणून बोलवले.


 दुसर्‍या दिवशी पहाटे पियूष तंबूत हजर झाला. नंतर त्याच्यातील कलाप्रेम बघून सुभाष राय यांनी श्रीफळ, दक्षिणा देऊन पियूषचे शिष्यत्व स्वीकारले. पियूषला यानिमित्ताने शिल्पकलेतील पहिले गुरू मिळाले. शिल्पकार राय यांनी पीयूषला माती मळण्यापासून, मूर्तीसाठी गवताचा सांगडा (तनस), मूर्तीनुसार शिल्पाचे ‘आर्मीएचर(सांगडा)’ कसे तयार करावे याचे शिक्षण दिले. त्यावेळी पीयूषने बंगालच्या गुरूकडून गणेशमूर्ती तयार करून शिल्पकेतील ’श्रीगणेशा’ केला. अल्पावधीतच पियूषने सुबक, सुरेख आणि कलात्मक गणेशमूर्ती तयार केल्या. त्या पाहून दस्तरखुद्द गुरू राय यांनाही आश्चर्य वाटले. पीयूषने तयार केलेल्या मूर्ती त्यांच्या परिवारातील नातेवाईकांनी विकत घेतल्या आणि १७व्या वर्षी हीच पीयूषची पहिली कमाई ठरली. सुभाष राय तेव्हा यवतमाळमध्ये केवळ काही महिनेच राहत म्हणून त्यांनी पियूषला मूर्तीकलेचे पुढील शिक्षण देण्यासाठी किशोर केणे यांच्याकडे पाठवले. तिथे पियूषने छोट्या मूर्तीतील कला, नजाकत आत्मसात केली.


इथे त्याने शिल्पकलेतील ‘कास्टिंग’ मोल्डिंग’ या गोष्टी आत्मसात केल्या. आता त्याच्यातील कलेला नवे धुमारे फुटत गेले. ‘बीई’चे शिक्षण घेत असताना पियूषचे कलेकडे दुर्लक्ष झाले. तेव्हा तेथील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापकांनी पियूषमधील कलेला पुन्हा चेतना दिली. महाविद्यालयीन जीवनात व्यंगचित्रकार सतीश उपाध्ये हे पियूषला ‘मेंटॉर’ म्हणून लाभले. पियूषची खंडित कला पुन्हा बहरली. आंतरमहाविद्यालयीन आणि आंतरविद्यापीठ आणि राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर पियूषने विविध पारितोषिकांवर नाव कोरले. आता मातीशी पियूषचे घट्ट नाते जमले, शिल्पकार होण्याची बिजे अधिकच खोलवर रुजत गेली. नंतर अभियांत्रिकीत पदवी पूर्ण करताच पियूषसमोर गलेलठ्ठ पगार देणारी अभियांत्रिकी नोकरी की कलेत करिअर अशा दोन वाटा समोर ठाकल्या. तेव्हा अभियांत्रिकी सोडून शिल्पकार म्हणून करिअर करण्याची खुणगाठ त्याने मनाशी बांधली. नंतर भद्रावतीत जाऊन त्याने ’पॉटरी’ (कुंभार कले)चेही शिक्षण घेतले.


कलेतील ’फाऊंडेशन कोर्स’ पूर्ण केला. शिल्पकलेतील शास्त्रोक्त शिक्षण घेण्यासाठी पियूषने छ. संभाजी नगर येथे शिल्पकलेत ‘जीडीआर्ट’चे शिक्षण पूर्ण केले. देवी देवतांच्या ’पीओपी’च्या मूर्तीची विसर्जनानंतर अवस्था पाहून पियूष अस्वस्थ होत असे.म्हणूनच पर्यावरणपूरक गणेश आणि दुर्गा देवी कालिकामाता निर्माण करायची आणि त्याचाच प्रसार-प्रचार करण्याचे व्रत अंगीकारले. शाळा, महाविद्यालयात पर्यावरणपूरक शाडूमाती मूर्ती तयार करण्यासाठी अनेक कार्यशाळाही घेतल्या. आज हिंदू सण-उत्सवासाठी लागणार्‍या कलात्मक मूर्तीच्या ’ऑर्डर’ पियूष घेत आहे. लोकांना कलेविषयी साक्षरता नाही, याबद्दल पियूषला अत्यंत वाईट वाटते. ‘शिल्पकार-कलावंतांना लोक कारागिर ठरवतात अन् कारागिरांना कलावंत म्हणतात, हे थांबले पाहिजे असे तो सांगतो.


“ ‘कला’ अविरत आणि अखंड तपस्या असून कलावंत त्याच्या कलेला मेहनत, सर्जन आणि कलात्मक दृष्टीने सजवत असतो. सामान्य लोकांनी ती कला समजून घ्यावी आणि कलावंताचा आदर करावा,” अशी अपेक्षा तो व्यक्त करतो. “कला शिकणार्‍यांना ती तत्काळ आत्मसात करता यावी, असे वाटते. मात्र, ही एक साधना असून त्याला आयुष्याची पाच ते दहा वर्षं खर्ची घाललवी लागतात,” असेही तो सांगतो. पर्यावरणपूरक, निसर्गतत्व जपणारे उत्सव व्हावे, यासाठी शिल्पकार म्हणून तशाच मूर्ती, स्थापत्त्य निर्माण, सेटस् देण्यासाठी त्याचा प्रयत्न आहे आणि तीच जागृती लोकांमध्ये निर्माण करण्याचे पियूषचे स्वप्न आहे. या स्वप्नासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पियूषला अनेक शुभेच्छा...!



-निल कुलकर्णी
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.