गुवाहाटीत होणार 'लोकमंथन २०२२'

    20-Sep-2022
Total Views |

Lokmanthan
 
गुवाहाटी (Lokmanthan 2022) : ईशान्य बौद्धिक मंच (IFNE) आणि आसाम पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र, गुवाहाटी येथे लोकमंथन २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१, २२, २३ आणि २४ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. लोकमंथनाचे हे तिसरे पुष्प असून 'लोक परंपरा' ही यंदाची थीम आहे. यावेळी लोकपरंपरेतील आपले सांस्कृतिक भान जपण्यात आणि राष्ट्रवादाची भावना दृढ करण्यात त्याचा कसा वाटा आहे, यासंबंधित प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच चर्चा, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध प्रदर्शनेही आयोजित केली जातील, ज्यात राष्ट्राच्या समृद्ध विविधतेची झलक पाहायला मिळेल.
 
कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. शंकरदेव कलाक्षेत्र येथे होणार आहे. उपाध्यक्ष जगदीप धनखर हे उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे असतील. याशिवाय आसाम आणि नागालँडचे राज्यपाल प्रा. जगदीश मुखी हेही कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री डॉ. हिमंता विश्व शर्मा यासुध्दा उपस्थित राहून अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. सांस्कृतिक संध्याचे औपचारिक उद्घाटन २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा. होणार आहे. संध्याकाळी, सांस्कृतिक कार्य मंत्री बिमल बोरा, मणिपूरचे खा. जंजा ओबा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आसाम प्रदेशचे बौद्धिक प्रमुख दास कलिता हेसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
 
लोकमंथन कार्यक्रमादरम्यान काही बौद्धिक सत्रांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. ज्यात त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा, राज्याचे शिक्षण मंत्री डॉ. रनोज पेगू आणि देशातील काही प्रतिष्ठित व्यक्ती संबोधित करतील. २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या समारोपाच्या सत्रात केरळचे राज्यपाल आरिफ मुहम्मद खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रा. स्व. संघाचे सरकार्यवारक दत्तात्रेय होसाबळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
या दौऱ्यात मेघालयचे वांगला नृत्य, मिझोरामचे चेरव नृत्य, सत्तरिया नृत्य, बिहू नृत्य, त्रिपुराचे होजागिरी नृत्य, नागालँडचे आओ योद्धा नृत्य, याक नृत्य आणि अरुणाचल मणिपूरचे चिंगी चाम नृत्य यांसारख्या ईशान्येकडील रंगीबेरंगी लोकनृत्य प्रकारांचा समावेश आहे. के ढोल चालम आणि थंगाटा नृत्यासह इतर अनेक नृत्य प्रकार ईशान्य भारतातील प्रसिद्ध कलाकार सादर करतील. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.