"मी स्पष्ट बोलते. स्पष्ट लिहीते. टीकेला भीत नाही!" शेफाली वैद्य यांची जळजळीत 'पोस्ट'

    05-Aug-2022
Total Views |

shefali vaidya

पुणे
: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लेखिका शेफाली वैद्य यांच्याबद्दल अश्लील कमेंट करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचा सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष असलेल्या मिलिंद मारूती गोरे याला सोलापूर शहर पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकारानंतर शेफाली वैद्य यांनी एका जळजळीत फेसबूक पोस्टद्वारे ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे. "माझी भूमिका स्पष्ट आहे. टीकेला कधीही घाबरत नाही.", असे म्हणत त्यांनी अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शेफाली वैद्य म्हणातात, "मी स्पष्ट बोलते. स्पष्ट लिहीते. टीकेला कधीच घाबरत नाही. सभ्य शब्दात प्रतिवाद करणाऱ्या कुणालाही मी आजवर ब्लॉक केलेलं नाही की अश्या कॉमेंट डिलीट केलेल्या नाहीत हे माझी वॉल फॉलो करणारी कुणीही व्यक्ती सांगेल. स्वतःला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पाईक समजणाऱ्या काही तथाकथित विचारजंत लोकांसारखे मी कॉमेंटसही कधी ऑफ करून बंद दाराआड तलवारी फिरवत नाही. ही विचारांची लढाई मी जाणीवपूर्वक लढतेय आणि लढाई म्हटली की दोन घाव देणे आले, घेणे आले, त्याला कधीच माझी ना नव्हती.

माझ्या वैचारिक स्पष्टतेची मी जबर किंमत मोजलेली आहे. ह्या आधी दोनदा मला पोलिसात तक्रार करावी लागलेली आहे. माझ्या कुटुंबाला धमक्या आलेल्या आहेत, माझ्या नवऱ्यावर, त्याचा कशाशीही काहीही संबंध नसताना, चिखल उडवला गेलाय, मला स्वतःला तर ‘मोदींबरोबर झोपायचे किती पैसे मिळतात तुला’ इथपासून ते ‘तुला भर चौकात मुस्काटीत मारून धिंड काढली पाहिजे’ अश्या कॉमेंट्सचा सामना अनेक वेळा करावा लागलायं.

डाव्या विचारांच्या लोकांकडून किंवा मुल्ला-मौलवींच्या अनुयायांकडून मला असले घाण, विकृत हल्ले अपेक्षितच असतात, पण दुःख होतं ते छत्रपती शिवरायांचा फोटो डीपी म्हणून ठेवून, दोन भिवयांच्या मध्ये शेंदूर लावणारे, स्वतःला ‘स्वराज्याचा पाईक’ म्हणवून घेणारे तरुण अशी भाषा एका स्त्रीच्या बाबतीत वापरतात तेव्हा.

दोष त्यांचा नाही, आपण काय करतोय, काय बोलतोय हे कळण्याइतपत अक्कल यायच्या आधीच त्यांची डोकी जातीयवादाच्या घाणीने बरबटवली गेली आहेत. स्वतःच्या क्षुद्र राजकीय स्वार्थापोटी एका प्रादेशिक राजकारण्याने जातीयवादाच्या ह्या विषवल्लीला जोपासून मोठं केलंय. ज्या भगव्याखाली सर्व हिंदू एका हिंदवी स्वराज्यासाठी एकवटले त्या भगव्याला एका जातीच्या कुंपणात बांधायचं दुष्टकर्म गेली कित्येक दशकं प्रयत्नपूर्वक केलं जातंय आणि सध्या फेसबुकवर मोकाट सुटलेल्या ह्या नेत्याच्या पिल्लावळीला माहीतही नाहीये की आपला फक्त आणि फक्त वापर केला जातोय. ज्या नेत्यांची लाळ पुसण्यासाठी इतकी अहमहिका आहे ते नेते ह्या भाडोत्री सैन्याला उष्टा केक आणि फाटकी सतरंजी उचलायचं काम सोडून काहीच देणार नाहीयेत.

ज्या छत्रपतींनी स्त्रीचा सन्मान हे व्रत आयुष्यभर स्वीकारलं, एका मुलीवर बलात्कार केला म्हणून रांझ्याचा पाटलाचे हात-पाय तोडून त्याचा चौरंग केला. कधीही कुठल्याच स्त्रीच्या इभ्रतीला धक्का लागू दिला नाही, विरोधात लढणाऱ्या रायबागीनचाही यथोचित आदर दाखवून सन्मानच केला, त्यांचं नाव घेता, स्वतःला ‘मर्द मराठा’ म्हणवून घेता आणि फेसबुकवर येऊन भ्याडासारखं स्वतःचं प्रोफाईल लॉक करून एका स्त्रीच्या प्रोफाईल वरून कॉमेंट काय करता? ‘तुझी धिंड काढू’ ‘तुझ्या मुस्काटीत मारू’ ‘नवरा खूष ठेवत नाही का तुला, बलात्कारी सेंगरला भेट’, ‘तुझी केतकी चितळे करू', ‘तुला फटके देऊ’? अरे, स्वतःची नाही तरी ज्या थोर छत्रपतींचं नाव तुम्ही उठता बसता घेताय त्यांच्या विचारांची तरी थोडी चाड ठेवा. तुमच्याही घरात आई आहे, बहीण आहे, बायको आहे, मुलगी असेल, तिच्याशी कुणी असं बोललं तर कसं वाटेल तुम्हाला?

माझ्यावर टीका करायची आहे? जरूर करा, मी भ्याड नाही. प्रोफाईल लॉक करून मी इतरांच्या वॉल वर जाऊन कॉमेंटच्या फुसकुल्या सोडत नाही, माझं फेक अकाउंट नाही, मी कॉमेंट बंद ठेवत नाही आणि सभ्य भाषेत टीका केली तर कुणाला ब्लॉकही करत नाही. पण परत माझ्या वॉलवर येऊन घाणेरडे शब्द वापरले, धमक्या दिल्या, माझी जात काढली, माझ्या कुटुंबाला मध्ये आणलं, माझ्यावर अश्लील मीम शेर केले, मला मारायची, माझा आवाज बंद करायची धमकी दिली तर याद राखा, आता ऐकून घेणार नाही. एकाला अटक झालेली आहे, दुसरा अटक होण्याच्या मार्गावर आहे, आणि इतर अनेक रांगेत आहेत. कॉमेंट डिलीट करून व प्रोफाईल डीऍक्टिव्हेट करून काही होत नाही. तेव्हा शब्द जपून वापरा. ज्या नेत्यासाठी तुम्ही इतकं भांडताय त्याच्या लेखी त्याचा पक्ष फक्त त्याच्या कुटुंबासाठी आहे. तुमच्यासाठी आहे फक्त उष्टा केक, फाटकी सतरंजी आणि कोर्ट केसेस!"

- शेफाली वैद्य, लेखिका


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.