'जिव्हाळा' चित्रपटाचा प्रीमियर सोहळा संपन्न

    दिनांक  17-Jun-2022 18:43:01
|

jivhala
 
 
 
 
 
नवी मुंबई : डी शंका फिल्म क्रिएशन प्रस्तुत दिलीप कांबळे निर्मित व लिखित “जिव्हाळा” या सत्य घटनेवर आधारीत मराठी लघुपटाचा प्रिमियर शो नुकताच वाशी येथे पार पडला. याप्रसंगी प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, अभिनेते कांचन पगारे, शिवसेना नगरसेविका सौ. समीक्षा सकरे, खारघर शिवसेना उप शहरप्रमुख सुहास नागोटकर, निर्माते दिलीप कांबळे, दिग्दर्शक प्रसाद कोलते, चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासहित चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
 
 
 
 
 
 
कोरोना महामारीनं जगभर भीतीचं वातावरण निर्माण केलं. कित्येक कुटुंब, कित्येक संसार उध्वस्त झाले. कित्येक कुटुंबातील, घरातील माणसं सोडून गेली. अचानक आलेल्या निर्बंधामुळे सगळे त्रस्त पण झाले आणि घाबरले सुद्धा. पण ती वेळ सुद्धा एक गोष्ट शिकवून गेली, ती म्हणजे आपुलकी, प्रेम, माणुसकी आणि आपल्या कुटुंबाचा एकमेकांबद्दलचा जिव्हाळा. ही कथा त्या कुटुंबाची आहे, जी त्रासलेली तरी त्यांनी एकमेकांची साथ नाही सोडली. त्यांनी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊन आपल्या कुटुंबाला सांभाळून ठेवलं. संकट खूप मोठं होतं, पण त्या संकटाला आपल्या प्रेमाने आणि जिव्हाळ्याने त्यांनी मात दिली. जिव्हाळा हा चित्रपट जगण्याचा मार्ग दाखवतो. संकट जरी आले तरी त्याला कसं समोर जावं आणि संकटावर मात कशी करावी हे या चित्रपटाद्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
 
 
jivhala
 
 
 
 
 
 
डी शंका प्रॉडक्शन, निर्माते दिलीप कांबळे यांचा “जिव्हळा” हा दूसरा लघुपट असून पहिला लघुपट “इमानी” ला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. डी शंका प्रॉडक्शनने हया दोन्ही चित्रपटातून होतकरू आणि प्रतिभावान कलाकारांना संधी दिली आहे. “जिव्हाळा” या सत्य घटनेवर आधारित चित्रपटाचे लेखन निर्माते दिलीप कांबळे यांनी केले असून दिग्दर्शन प्रसाद कोलते यांनी केले आहे. या चित्रपटातील हृदयस्पर्शी गीत आदर्श शिंदे यांनी गायिले असून संगीतकार विजय देसाई यांनी संगीतबद्ध केले आहे. गीतकार अशोकराज शिंदे यांनी यातील गाणी लिहिली असून सहनिर्माते मिलिंद कांबळे आहेत तर निर्मिती व्यवस्थापन सुहास नागोटकर यांनी केले आहे. यात संभाजी माने, अक्षता आचरेकर, चेतन मुदगल, मंजुषा करंजेकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. मनोरंजनाबरोबरच एक चांगला संदेश देणारा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.