मशिदींवरील अनधिकृत भोंगे न उतरवल्यास आम्ही थांबणार नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
RT
संभाजीनगर: “उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही,” असा सवाल करत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याचे आवाहन केले. तसेच, “दि. 3 मेपर्यंत मशिदींवरील अनधिकृत भोंगे न उतरवल्यास दि. 4 मेनंतर आम्ही थांबणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. ते संभाजीनगरमध्ये रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्ताने आयोजित सभेत बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? सगळेच्या सगळे भोंगे अनधिकृत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, स्थानिक पोलीस ठाण्यात विचारल्याशिवाय भोंगे लावू शकत नाही. किती मशिदींकडे परवानगी आहे? संभाजीनगरमध्ये 600 मशिदी असल्याचे मला काल सांगितले. असे फक्त संभाजीनगरमध्ये नाही, तर देशभरात आहे. संपूर्ण देशातले भोंगे खाली आले पाहिजेत. प्रत्येक वेळा आम्हीच का भोगायचे?”
ते पुढे म्हणाले की, “भोंग्यांचा विषय अचानक काढलेला नाही. हा विषय काढायचाच नाही का? भोंग्यांचा विषय यापूर्वी अनेकांनी काढला आहे. मी फक्त त्याला पर्याय दिला आहे. भोंगे लावून गोंगाट करणार असाल, तर मशिदीबाहेर मोठ्याने दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणार,” असा पुनरुच्चारही राज ठाकरे यांनी केला. “भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. तो विषय धार्मिक करणार असाल, तर आम्ही धार्मिक पद्धतीने उत्तर देऊ,” असे ते म्हणाले. तसेच “आम्हाला कुठेही दंगली घडवायच्या नाहीत. मुस्लीम समाजाने ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे,” असे राज ठाकरेंनी सांगितले.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “शरद पवारांना ‘हिंदू’ शब्दाचीच ‘अ‍ॅलर्जी’ आहे. ते स्वत: नास्तिक आहेत. तेच मी सभेत सांगितले. मात्र, शरद पवारांना ते झोंबले. त्यानंतर लगेचच पवारांचे मंदिरातले फोटो येऊ लागले,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी पवारांवर तोफ डागली. पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी स्वत: लोकसभेत सांगितले होते की, ‘माझे वडील नास्तिक आहेत,’ (पान 6 वर)मशिदींवरील अनधिकृत भोंगे न उतरवल्यास आम्ही थांबणार नाही, असे राज म्हणाले.
 
 
 
शरद पवार भाषणाच्या सुरुवातीला कधीच शिवरायांचा उल्लेख करत नाहीत
“शरद पवार कधीच त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला शिवरायांचा उल्लेख करत नाहीत. ते नेहमी शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात. महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, याबद्दल वादच नाही. पण त्याआधी तो शिवरायांचा आहे. कारण, शिवराय हेच शाहू, फुले, आंबेडकरांसाठी प्रेरणा आहे,” असे राज ठाकरे म्हणाले. “ ‘आमच्या राज्यातील अनेकांच्या अंगात देवी येते, भूते येतात. ज्यावेळी लोकांच्या अंगात शिवाजी नावाचे भूत येईल, त्यावेळी आम्ही सारे जग पादाक्रांत करू,’ हे आंबेडकरांचे वाक्य आपल्या आवडीचे आहे,” असे राज ठाकरे यांनी सांगितले.
 
  
पवारांनी फक्त सोयीचे वाचू नये
“शरद पवार मला माझ्या आजोबांची पुस्तके वाचण्याचा सल्ला देतात. ती पुस्तके मी आधीच वाचली आहेत. तुम्ही केवळ तुम्हाला हवे तितकेच आणि सोयीचे वाचू नका. मी लेखकांची जात पाहून पुस्तके वाचत नाही. मी मुळात जातच मानत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले. तसेच राज ठाकरे म्हणाले की, “मी माझ्या आजोबांच्या पुस्तकांतील काही संदर्भ शरद पवारांसाठी आणले आहेत. माझ्या आजोबांचे चरित्र आहे ‘माझी जीवनगाथा.’ त्यातील पान क्र. 101 वर हिंदू धर्माच्या प्रचाराबाबत केलेले काम आणि ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून ‘हिंदू मिशनरी’ चळवळ स्थापन करणारे माझे आजोबा असल्याचे लिहिले आहे. सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करणारे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे होते. त्यांचे एक पुस्तक आहे ‘उठ मराठ्या उठ.’ या पुस्तकात हिंदू धर्मीयांवरील अत्याचाराची माहिती आहे. शरद पवार यांनी ते जरूर वाचावे. ’प्रबोधन’मधील ‘प्रबोधन’ याच्या खंड क्र. 1 मध्ये ’प्रतापगडाच्या भवानीवरील संकट’ हे वाचा, ’रायगडचे रामण्य’ वाचा, ’राष्ट्रसेवा हिंदूचे राजधर्म’ वाचा.”
 
 
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात सभा
“गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकजण बडबडायला लागले. त्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी ठाण्यात ’उत्तर’सभा घेतली. मी दोनच सभा घेतल्या, पण या दोन सभांवर किती बोलतात. ठाण्याच्या सभेनंतर दिलीप धोत्रेंनी मला फोन केला. त्यांनी सांगितले की, संभाजीनगरला एक सभा घेऊयात. संभाजीनगर तर महाराष्ट्राचा मध्य आहे. यापुढे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात माझ्या सभा होणार आहेत. विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. त्यामुळे सभांना आडकाठी आणून उपयोग नाही. मी कुठेही सभा घेतली तरी ती पाहिली जाणार आहे. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर समाजात तेढ
“माझ्या भाषणांमुळे समाजात दुही माजतेय. राज्यासाठी, देशासाठी हे चांगले नाही, असे शरद पवार म्हणतात. राज्यात असे भेदाभेद कोणी निर्माण केले? राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर समाजात तेढ निर्माण झाली, हे मी आधीही म्हटलेय आणि आताही म्हणतोय. जेम्स लेन प्रकरण पवारांनी तापविण्याचा प्रयत्न केला. जर त्याच्याविरोधात एवढाच जर रोष होता, तर केंद्रात तुमचे सरकार सत्तेत होते, त्यावेळी त्याला खेचून का आणले नाही,” असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला. तसेच,“ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर भारताच्या घराघरात पोहोचवले, त्या आमच्या बाबासाहेब पुरंदरेंना शरद पवारांनी त्यांच्या वृद्धापकाळात त्रास दिला,” असा आरोप राज ठाकरे यांनी केला. “बाबासाहेब पुरंदरे केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना पवारांनी त्रास दिला,” अशी टिप्पणीही राज ठाकरे यांनी केली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@