चला करूया - सफर कान्हेरीची

    25-Dec-2022
Total Views | 188
 Kanheri Caves


सोपारा, कल्याण, ठाणे आणि वसई या प्राचीन बंदर शहरांच्या सान्निध्यात असल्यामुळे कान्हेरीची भरभराट झाली. यातील बहुतेक लेण्यांना तारीख नाही. परंतु, दानधर्म करणारे आणि विशिष्ट राजाच्या नावांचा उल्लेख असलेल्या शिलालेखांमुळे त्यांची ओळख पटण्यास मदत होते. कान्हेरी लेणी हे ‘रॉक कट’ संरचना आहे. सरत्या वर्षाला निरोप म्हणून चला करूया सफर कान्हेरीची...


जगभरातील विविध पर्यटनस्थळांपैकी विशेष नावारूपाला आलेले एक स्थळ म्हणजे डोंगर खडकांच्या कुशीत वसलेल्या लेण्या. वाचकांनी कधी न कधी तरी या लेण्यांचा अनुभव नक्की घेतला असेल. भौगोलिकदृष्ट्या लेण्यांचे दोन प्रकार असतात, नैसर्गिक लेणी आणि मानवनिर्मित (खडक कोरून तयार केलेली) लेणी. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुंफा या जमिनीतील पोकळी निर्माण झाल्यामुळे तयार होतात. पाच मीटरपर्यंत लांबी असलेल्या आणि माणूस जाऊ शकेल, अशा पोकळ्यांना गुफा म्हटले जाते. या गुंफा प्रामुख्याने चुनखडी, डोलोमाईट आणि इतर धातूंनी युक्त असतात. बहुतेकदा हवामानामुळे खडकावर होणार्‍या परिणामांमुळे या गुहा तयार होतात आणि बर्‍याचदा खोल भूगर्भात पसरतात. तसेच, नैसर्गिकरीत्या आढळणार्‍या खडकाचे उत्खनन करून संरचना, इमारती आणि शिल्पांचे बांधकाम करून तयार केलेल्या गुंफांना ‘रॉक कट’ संरचना म्हटले जाते.


 Kanheri Caves


भारतात १०० पेक्षा जास्त ‘रॉक कट’ गुहा आहेत. संरचनांचे तीन मुख्य उपयोग असतात. यामध्ये मंदिरे, थडगी आणि निवासस्थान यांचा समावेश आहे. बिहारमध्ये साधारणतः मौर्य साम्राज्यादरम्यान सुमारे तिसर्‍या शतकाच्या आसपास सर्वात जुनी ‘रॉक कट’ लेणी म्हणजेच बराबार लेणी बांधण्यात आली होती. तसेच पश्चिम दख्खन पठार प्रदेशात अनेक दगडी गुंफा आहेत. त्यापैकी काही गुहा मंदिरे आहेत, जी इ. स. पूर्व १०० आणि इ. स. १७० च्या दरम्यानची आहेत. यातील बहुतेक गुहा मंदिरे बौद्ध मठ आणि देवस्थान म्हणून उभी आहेत. बहुधा या लेण्यांमध्ये लाकडी संरचना होत्या. ज्या कालांतराने नष्ट झाल्या. महाराष्ट्रातील भाजा गुंफा, औरंगाबादमधील अजिंठा आणि एलोरा लेणी आणि कान्हेरी लेणी इ. स. पूर्व १ शतक ते १०व्या शतक या दरम्यानच्या काळातील ‘रॉक कट’ संरचना आहेत. कान्हेरीत १२९ लेण्या आहेत जिथे बौद्ध भिक्खू गौतम बुद्धांच्या शिकवणींचा प्रसार करण्यासाठी राहत होते, अभ्यास करत होते, ध्यान करत होते. पावसाळ्यात या गुहांचा निवारा म्हणूनही वापर केला जात असे.

सर्वसाधारणपणे लेण्यांमध्ये एक अद्वितीय परिसंस्था असते. लेणी आणि ‘कार्स्ट’ हे पृथ्वीवरील वैविध्यपूर्ण, महत्त्वाच्या आणि दुर्मीळ परिसंस्थांचे घर आहे. या गुंफा जमिनीच्या वर आणि खाली जैवविविधतेला प्रोत्साहन देतात. तथापि, नैसर्गिक गुहांच्या तुलनेत, ‘रॉक कट’ लेण्यांना त्यांच्या पर्यावरणाच्या ऐवजी त्यांच्या सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय महत्त्वासाठी भेट दिली जाते. या ‘रॉक कट’ गुहा अद्वितीय वास्तुकला, पर्यावरणशास्त्र आणि भूगर्भशास्त्र सादर करतात, तथा अनेक अर्थव्यवस्थांना महत्त्वपूर्ण आधारदेखील देतात. एकट्या भारतातच १०० हून अधिक ’रॉक कट’ गुहा पर्यटनासाठी खुल्या आहेत.


 Kanheri Caves


शोधा, समजून घ्या आणि संरक्षित करा हे लेणी आणि कार्स्टच्या आंतरराष्ट्रीय वर्षाचे मुख्य लक्ष्य आहे. म्हणूनच, लेणी आणि कार्स्ट आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करण्याचा एक भाग म्हणून ‘स्पेलोलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया’च्या सहकार्याने सोलफुल जर्नीज कान्हेरी लेणी इकोलॉजी वॉक दि. २८, २९, आणि ३० डिसेंबर रोजी. आयोजित करण्यात आला आहे. या टूरच्या माध्यमातून लेणी कशा महत्त्वाच्या आहेत याबद्दल लोकांची समज वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या ’इव्हेंट’द्वारे ‘स्पेलोलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया’कडून तुम्हा सर्वांना ‘रॉक कट’ गुहांच्या अनोख्या अधिवासाची ओळख करून दिली जाणार आहे. ‘रॉक कट’ लेण्यांबद्दल अधिक माहिती देण्यासाठी कृपया या कार्यक्रमात सामील व्हा. ‘कान्हेरी इकोलॉजी टूर’साठी नोंदणी शुल्क ५०० रुपये आहे (उद्यान आणि कान्हेरी लेणी तिकीट वगळता) आणि तुम्ही दि. २८ ते ३० डिसेंबरपर्यंत कोणत्याही दिवसासाठी नोंदणी करू शकता.


 Kanheri Caves


कान्हेरी लेण्याबद्दल थोडक्यात...


कान्हेरी लेणी समुद्रसपाटीपासून १५०० फूट उंचीवर आहे.प्राचीन शिलालेखात कृष्णगिरी किंवा कान्हेगिरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कान्हेरीचा शाब्दिक अर्थ काळा पर्वत (कृष्ण म्हणजे काळा आणि गिरी म्हणजे पर्वत) असा होतो. बुद्धाची ३० हून अधिक अपूर्ण चित्रे आहेत.१२ महिने पाणी राहील, अशी पाणी साठवण्याची आधुनिक कार्य प्रणाली या संरचनेमध्ये समाविष्ट आहे.



-धनुशा कावलकर
(अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला soulfulljourneesgmail.com
किंवा speleoindiagmail.com वर लिहा. नोंदणीसाठी कृपया लिंकचे अनुसरण करा https://forms.gle/gZPrV८८TSwQKo९T५७)




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121