कथे-व्यथेची भीषणता ठळक करणारं पारदर्शी आवरण

    14-Dec-2022   
Total Views |

aavaran
 
 
आवरण म्हणजे काय? आतली गोष्ट लपवण्यासाठी बाहेरून लपेटलेलं सुंदर वेष्टन. पुस्तक उघडल्यानंतर लक्षात येत की हे फक्त एकच आवरण नाही, जशी जशी पानं उलटत जातो तसा या समाजव्यवस्थेचा एक एक पदर उलगडत जातो. जेवढे पदर भैरप्पा उलगडून दाखवतात तेवढे खोल आत आपण गुरफटत जातो. भैरप्पांची ही खासियत आहे, त्यांच्या कादंबऱ्या सामाजिक विषयांवर भाष्य करतात. सामाजिक विषय हाताळताना येणारा तोचतोचपणा मात्र त्यांच्या लेखनात आढळत नाही. विषय खुलवून, रंगवून सांगण्याची कला त्यांना अवगत आहे. आणि म्हणूनच सामाजिक गुंत्यात गुरफटलेल्या व्यक्तिरेखा आपल्या नात्यांच्या विणीतून उसवत आपला असा धागा घेऊन आपलं आपलं स्थान ठळक करत जातात.
 
आवरण ही कादंबरी एस. एल भैरप्पांनी २००७ मध्ये लिहिली. ती छापून पूर्ण व्हायच्या आधीच प्रकाशनापूर्वी तिच्या कित्येक प्रति विकल्या गेल्या. लेखकाच्या लेखनशैलीचे वाचकांनी केलेले हे कौतुकच! या पुस्तकाला कादंबरी पेक्षा शोध प्रबंध म्हणणे उचित ठरेल इतके संदर्भ त्यांनी पुस्तकाच्या शेवटाला दिले आहेत. १३६ विश्वासार्ह संदर्भ ग्रंथांच्या प्रकाशकापासून पृष्ठक्रमांकापर्यंत माहिती जोडलेली आहे. या सर्व आधारांना बांधून ठेवण्यासाठी २ कथांची सुयोग्य गुंफण यात करण्यात आलीय. फक्त माहितीपूर्ण पुस्तकं असल्यास ती वाचणारा एक वर्ग आहे. परंतु समाजातल्या मोठ्या वाचक गटाची नजर वळवून घ्यायची असल्यास त्यात एखादी खुसखुशीत कथा असायला हवीच. म्हणून कदाचित भैरप्पांना कादंबरी प्रकार जवळचा वाटत असावा.
 
कथानक मुख्य तीन भूमिकांच्या भोवती फिरत राहतं. लक्ष्मी गौडा उर्फ रझिया बेगम, प्रोफेसर शास्त्री आणि आमिर. कर्नाटकातल्या एका गावात, काळीनहळ्ळी जवळ जन्माला आलेली लक्ष्मी ही एकुलती एक हिंदू मुलगी. महाविद्यालयांत शिकताना एका मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्न करते. त्यात तिच्याच गावातील पुरोगामी विचारसरणीचे प्राध्यापक तिला मदत करतात. हे एक कथानक. दुसरी कथा ऐतिहासिक पात्रांवर आधारित आहे. राजपुतान्यांतील देवगढ संस्थानातील एक राजपुत्र मुघल आक्रमणाच्यावेळी शत्रुपक्षातील सेनेच्या ताब्यात सापडतो. त्यानंतर त्याची होणारी फरफट आणि फरफटीचा प्रवास दिसतो. त्याला अचानक सापडलेलं प्रेरणास्थान मिळाल्यानंतर मात्र त्याच्यात होत जाणारे सर्व बदल लेखकाने विस्ताराने मांडले आहेत. कालखंड कोणताही असो, माणसाची मानसिकता कशी बदलत जाते, त्या त्या काळच्या सामाजिक राजकारणाला तो कसा तोंड देतो, आपल्या आतली ऊर्जा कोणत्या कारणांमुळे प्रदीप्त होते, यात किती साम्य आहे हे वाचताना आपण त्या पात्रांशी काळवेळा पलीकडे जाऊन सतत तुलना करत असतो. या दोन्ही कथांचं वैशिष्ट्य हे की यात खलनायक नाही. मानवी भाव भावनांचं चित्रण इतक्या तरलतेने केलं आहे की त्यांच्या वागण्या बोलण्यामागची परिस्थिती आपल्याला न सांगता दिसते. जेव्हा आपण तटस्थपणे पात्रांकडे पाहतो तेव्हा आपली वैचारिक क्षमता उंचावलेली जाणवते. वाचकांना विचारसक्षम बनवणं हे भैरप्पांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे असे मला वाटते.
 
कथेची सुरुवात हंपीच्या उध्वस्त भग्न मंदिरापासून होते. रझियाला आपल्यातली लक्ष्मी हे भग्नावशेष पाहताना तिथल्या गारव्यासारखीच बोचत असते. इथून रझियाचं आत्मपरीक्षण सुरु होतं. आणि मग रझियापासून लक्ष्मीपर्यंतचा प्रवास होतो. हा प्रवास दाखवण्यासाठी लेखकानं लक्ष्मीची रझिया कशी झाली हे दाखवले आहे. हा विरोधाभास वाचताना डोळ्यांचं पारणं फिटतं. या संपूर्ण पुस्तकात लेखकाने कोणत्याच धर्माविषयी किंवा मान्यतांविषयी अनुचित उद्गार काढले नाहीत. परंतु हिंदू संस्कृती, मुस्लिम धर्म आणि पुरोगामी विचारसरणीची चिकित्सा सामाजिक, मानसिक, वैचारिक पातळीवर जाऊन केलेली आहे.
 
मूळ कन्नड भाषेतील हे पुस्तक उमा कुलकर्णी यांनी मराठीत भाषांतरित केले आहे. पुस्तकाचे भाषांतर करताना अनेक समस्या येतात. त्यातल्या काही समस्यांशी वाचकांना स्वतःला जोडून घ्यावेच लागते. जसे की संस्कृती बदलली,भौगोलिक संरचना बदलली की पुस्तकात नमूद केलेल्या काही घटना इर्रिलेवंट वाटू लागतात. परंतु याबाबतीत उमा कुलकर्णीची तुलना वि. स. खांडेकरांशी करावी वाटते. त्यांच्या कथेतील पात्रांशी आपण जितक्या आत्मीयतेने स्वतःला जोडून घेतो तेवढ्याच सुलभपणे या भाषांतरित पात्रांशी जोडले जातो.
 
पुस्तक परिचय म्हंटलं की तो असतो लेखकाच्या विचारांचा लेखाजोखा. भैरप्पांची ज्ञातीव्यवस्थेची आणि समाजव्यवस्थेची समज उत्तम. एखादा समाज आपल्यासमोर मांडताना ते त्या समाजातील लोक, त्यांची लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती, पारस्परांशी असलेले नातेसंबंध, चवीपुरते होणारे कौटुंबिक लटके वाद सगळं वाचकांच्या समोर ठेवतात. ज्यामुळे एक खरंखूरं चित्र उभं राहतं. उदा, लक्ष्मी बेंगळूरूत असताना काय खाते, कुणीगल ला हॉटेलात उतरल्यावर काय खाते, नाझिर गावी घरी आल्यावर त्याला काय खाऊ घालते, प्रोफेसर शास्त्रीच्या घरी काय न्याहारी असते किंवा जेवणाच्या वेळी आमिर, अमीना बानो आणि राझियाचे काय वाद होतात, प्रोफेसरांच्या ख्रिश्चन पत्नीसोबत जेवतानाच्या वेळा, गावाकडे अय्यप्पा आणि अव्वाने वाढलेल्या केळीच्या पानातील पदार्थ. घरांची रचना, मोहल्ल्यातलं आमिरच्या अम्मा अब्बूचं घर आणि त्यातली स्त्रियांची जागा, गावी मुसलमान घरी आल्यावर त्याला शुचीर्भूत होण्यासाठीची वेगळी व्यवस्था. जनजीवन अधोरेखित करणारं सगळंच.
 
पुरोगाम्यांच्या सभेत लक्ष्मी जेव्हा आपले प्रखर विचार मांडते तेव्हा त्या पुस्तकावरचा शब्दन् शब्द भारलेला वाटतो. एखादा चित्रपट पाहत असल्याप्रमाणे अनवधानाने पानंच्या पानं उलटली जातात.
 
आपल्या प्रत्येक माणसामध्ये लपलेला कट्टरतावाद लेखकाने उघडा पाडला आहे. त्याच्या मुळाना अवकाश दिलं आहे, विचाराचं शस्त्र परजून दिलंय. घाव घालायचा की त्या मुळाचं संवर्धन करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.