सुमारांची माफी; पण कुमारांचे काय?

    दिनांक  03-Mar-2021 21:05:11
|


Rahul Gandhi_1  

 


राहुल गांधींनी आपल्या आजीने लादलेली आणीबाणी चुकीची असल्याचे म्हटले. मात्र, आणीबाणी अत्यावश्यक असल्याचे सांगण्यासाठी, आणीबाणीला योग्य ठरवण्यासाठी गांधी घराण्याची स्तुती करण्यात दंग झालेल्या, बौद्धिक कसरती केलेल्या राज्यसभा खासदार कुमार केतकरांचे काय? ते कधी आणीबाणीच्या चुकीची कबुली देणार नि त्याबद्दल माफी मागणार?
 
“कॉंग्रेसकडून आणीबाणी लागू करणे चुकीची कृती होती,” अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार आणि गांधी घराण्याचे युवराज राहुल गांधींनी आपल्या आजीने केलेल्या पापातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लोकशाहीची हत्या करून देशावर लादलेल्या आणीबाणीच्या पातकातून त्यांची स्वतःची किंवा त्यांच्या नातवाची अशी कबुली देऊन सुटका होणार नाही किंवा त्यांचे पापक्षालनही होणार नाही. कारण, आणीबाणी भातुकलीच्या खेळातली एखादी वस्तू अजाणतेपणे तोडून-मोडून गेली, तर लहानग्या बालकाने आपली चूक मान्य करण्याइतकी साधीसोपी घडामोड नव्हती, तर तो भारतीय संवैधानिक व्यवस्थेला वैयक्तिक स्वार्थासाठी जमीनदोस्त करण्याच्या हेतूने विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. तसेच आज राहुल गांधींची प्रतिमा कशी आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी कोणतेही विधान केले, कोणतीही कृती केली तरी बहुसंख्य देशवासीय त्याकडे गांभीर्याने न पाहता त्यांची चेष्टाच करताना दिसतात. त्यांच्या उक्ती आणि कृतीवर वेळोवेळी मिम्स, व्यंगचित्रेच तयार केली जातात. पण, त्यांनी आणीबाणी चुकीची असल्याचे म्हटले. मात्र, आणीबाणी अत्यावश्यक असल्याचे सांगण्यासाठी, आणीबाणीला योग्य ठरवण्यासाठी गांधी घराण्याची स्तुती करण्यात दंग झालेल्या, बौद्धिक कसरती केलेल्या राज्यसभा खासदार कुमार केतकरांचे काय? ते कधी आणीबाणीच्या चुकीची कबुली देणार नि त्याबद्दल माफी मागणार?
 
 
 
दरम्यान, राहुल गांधींनी “आणीबाणी चुकीची होती,” असे विधान प्रामाणिक पश्चातापबुद्धीने नव्हे, तर आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तोळामासा झालेल्या पक्षाला जनाधार मिळावा, म्हणून केलेले आहे. कारण, काँग्रेसने आपल्या ७० वर्षांच्या सत्ताकाळात आणि सत्तेत नसतानाही केलेल्या करतुती काळ्याकुट्टच आहेत नि त्यावर रंगसफेदी केली तर पक्ष सावरेल, असे राहुल गांधींना वाटते. म्हणून त्यांनी अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांना दिलेल्या मुलाखतीच्या होडक्यात बसून चुकीच्या कबुलीचा तराफा चालवण्याचा उद्योग केला. पण, त्यामुळे त्यांना वा त्यांच्या पक्षाला विरोधी जनमताच्या सागरात बुडण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, त्यांचा काहीही केले तरी बचाव होऊ शकत नाही. “काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही,” असेही राहुल गांधी मुलाखतीवेळी म्हणाले. पण, इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणीच मुळात संवैधानिक व्यवस्थेला वा चौकटीला उद्ध्वस्त करणारी घटना होती. आणीबाणीआधी इंदिरा गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा दुरुपयोग करून लोकसभा निवडणूक जिंकल्याचा खटला अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू होता व त्याचा निकाल त्यांच्याविरोधात गेला. यशपाल कपूर या सरकारी कर्मचाऱ्याने इंदिरा गांधींच्या प्रचार यंत्रणेत भाग घेतल्याच्या ठपक्यावरून न्यायालयाने त्यांची निवडणूकच रद्द केली, तसेच पुढची सहा वर्षे त्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी घातली. त्यानंतर जनसंघासह विरोधी पक्षांनी इंदिरा गांधींच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले. पण, स्वतःचे पंतप्रधानपद वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी विरोधकांचा आवाज दाबत थेट आणीबाणीच लावली. अर्थात, पंतप्रधान असूनही निवडणुकीत विजयी होण्यासाठी इंदिरा गांधींनी आपल्या मतदारसंघात गडबड घोटाळा केला, ते न्यायालयात सिद्धही झाले. पण, ते सहन न झाल्याने, विरोधकांच्या आंदोलनाला घाबरलेल्या, पराभूत व तथाकथित ‘आयर्न लेडी’ने लोकशाही व राज्यघटनेचा खून करत आणीबाणीचा निर्णय घेतला. त्यानंतरचा कालखंड तर इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीने जनसामान्यांसह विरोधकांवर केलेल्या अमानुष अत्याचाराने भरलेलाच राहिला. विरोधी पक्षातील हजारो जणांना तुरुंगात डांबले गेले नि तिथे महिला-पुरुषांसह प्रत्येकावर इंदिरा गांधींनी सत्तेचा दंडुका चालवला. इंदिरा गांधींच्या अन्यायी सत्तेमुळे तुरुंग नि रस्त्यावरील हजारोंचा जीव गेला, लाखोंच्या संसाराची राखरांगोळी झाली. इंदिरा गांधींचे, काँग्रेसचे ते पाप माफ करण्यासारखे अजिबात नाही. कारण, उद्या हिटलर वा मुसोलिनीचा वारसही आपल्या बापजाद्यांनी केलेली कुकृत्ये चुकीची होती, असे म्हणतील. पण, म्हणून त्यांना माफ करता येणार नाही. उलट काही गुन्हे माफीलायक नसतात आणि त्यात हिटलर वा मुसोलिनीच्याच नव्हे, तर इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीचाही समावेश होतो.
 
 
 
दरम्यान, राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या सत्तेची तुलना आणीबाणीशी करण्याचा उद्योगही केला. पण, आज राहुल गांधींपासून ते प्रियांका गांधी आणि काँग्रेस किंवा विरोधकांतील गल्लीतल्या नेता-कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाला मोदींविरोधात बोलण्याचे, मत व्यक्त करण्याचे, लिहिण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य पूर्णपणे उपभोगता येते. इतकेच काय, तर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा वगळता मोदींना मनसोक्त शिव्याही देता येतात, कोणाहीविरोधात गुन्हा दाखल होत नाही वा खटलाही चालवला जात नाही. त्यामुळे राहुल गांधींनी आपल्या आजीच्या आणीबाणीची तुलना मोदी सरकारशी करू नये, उलट मोदी इंदिरा गांधींसारखे नाहीत, हे सत्य स्वीकारावे. सोबतच राहुल गांधींनी आणीबाणी चूक असल्याचे अगदी तातडीने आपल्या पक्षाचे राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांनाही सांगावे. कारण, त्यांनी ज्वालामुखीच्या तोंडावर यासारखे पुस्तक लिहून, तसेच विविध लेख, मुलाखती वा व्याख्यानांतून आणीबाणीचे समर्थनच केलेले आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आता जरा त्यांना समजावून सांगण्याचे काम हाती घ्यावे व त्यांनाही स्वतःप्रमाणे इंदिरा गांधींनी केलेल्या चुकीबद्दल माफी मागायला लावावी किंवा बुद्धिमंत-बुद्धिजीवी कुमार केतकरांनी स्वतःहून तसे करावे.
 
 
दुसऱ्या बाजूला राहुल गांधींच्या चूककबुलीने आनंद झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी नरेंद्र मोदी व भाजपने २००२ सालच्या गुजरात दंगलीबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र, नाना पटोले किंवा नवाब मलिक यांना वास्तवाची जाणीव नसावी, केवळ विरोधासाठी विरोध करणे एवढेच त्यांना ठाऊक असावे, म्हणूनच ते गुजरात दंगलीबद्दल पंतप्रधानांनी आणि भाजपने माफी मागावी, असे म्हणताहेत. पण, २००४ पासून २०१४ पर्यंत देशात सोनिया गांधींच्या ताब्यातले काँग्रेसचेच सरकार सत्तेवर होते आणि गुजरात दंगलीच्या आरोपावरून मोदी-शाहांना संपवण्याचे शर्थीचे प्रयत्न त्यांनी केलेही. तरीही तब्बल १२ वर्षे स्थानिक, राज्य आणि देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांना हाताशी धरून काँग्रेस वा इतरांना मोदींचा दंगलीतला हात सिद्ध करता आला नाही. सर्वोच्च न्यायालयानेदेखील मोदी-शाहांच्या निर्दोषत्वाचा निर्वाळा दिला. असे असतानाही न केलेल्या चुकीबद्दल मोदी, शाह वा भाजपने माफी का मागावी? पंतप्रधानपदासारख्या घटनात्मक पदावरील इंदिरा गांधींनी स्वतःहून आणीबाणी लादली होती, मोदींनी स्वतःहून दंगल घडवली नव्हती वा त्याला प्रोत्साहनही दिले नव्हते, तर ती दंगल गोधरा स्थानकातील रेल्वेडब्याला आग लावून ५९ कारसेवकांना जाळून मारणाऱ्या प्रवृत्तींविरोधातील उत्स्फूर्त लोकसंताप होता, म्हणूनच त्याबद्दल नरेंद्र मोदी किंवा भाजपने माफी मागण्याचे काहीही कारण नाही व पटोले किंवा मलिक यांनी तशी अपेक्षाही करू नये.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.