मदत अन् दानतीतून फुलणारी चैतन्यशक्ती

    दिनांक  22-Feb-2021 22:42:30
|

help  _1  H x Wमाणसाची चैतन्यशक्ती ही निसर्गाच्या सात्त्विक व शुद्ध शक्तीचेच एक छोटे रुप असते. ही ऊर्जा जर शुद्ध राहिली तरच त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला मिळतात. परंतु, जर ही ऊर्जा दूषित झाली, तर मात्र शरीरात नकारात्मक पोकळी निर्माण होऊन माणूस आजारी पडतो म्हणूनच रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी आपल्याला निसर्गाचेच गुण आत्मसात करावे लागतात.
 
 
संपूर्ण जग हे निसर्गाच्याच नियमानुसार चालत असते. त्यामुळे निसर्गाचे गुणधर्म जर आपण अंगी बाळगले, तर निसर्ग आपले रक्षण करतो. परंतु, ज्या ज्या वेळी माणसाने निसर्गाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा माणसाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. निसर्गातीलच पंचमहाभूतांपासून बनलेल्या शरीराचेही काही नियम असतात. या नियमांचा जर आपण मान राखला नाही, तर मानवी शरीर कमजोर होते व रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे मग माणूस आजारी पडतो. जसे आपण पाहिले की, स्वाभिमान असणे हे फार महत्त्वाचे असते.
 
 
तसे काही अजूनही गुण जे सात्त्विक आहेत, ते जर आपण अंगी बाळगले, तर सकारात्मकता वाढते. निसर्गाचाच एक अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे दान करणे, देणे. निसर्ग हा स्वत: सर्व प्रकारे इतरांना देतच असतो. स्वत:चे नियम काटेकोरपणाने पाळतो. निसर्ग हा संपूर्ण जीवसृष्टीवर उपकार करत असतो. यातून निसर्गाचे गुण दिसतात, ते म्हणजे नि:स्वार्थीपणा व दानत. हे दोन गुण पूर्णपणे नैसर्गिक आहेत व म्हणूनच पूर्ण शुद्ध आहेत.या गुणांच्या अंगीकारणे मनही शुद्ध होते व शुद्धमनाने सर्व शरीराच्या पेशीसुद्धा शुद्ध होऊ लागतात व जेथे शुद्धता आहे, तेथे चैतन्यशक्ती फार शक्तिशाली होत जाते व पर्यायाने माणसाला प्रबळ बनवते. जे लोक स्वार्थी असतात व जे लोक दानत दाखवत नाहीत, त्यांच्या शरीरातील चैतन्यशक्तीही शुद्ध राहत नाही व हे लोक मनाने प्रथम आजारी होतात. पर्यायाने मग शरीराने आजारी पडतात. इतरांना मदत करणे, सर्वांचे कल्याण व्हावे, या भावनेने केलेली कामे नेहमीच तडीला जातात. या कामांमुळे इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण होतो, प्रेम निर्माण होते, इतरांना मदत केल्यामुळे निर्माण होणारे प्रेम व आनंद हे स्वार्थासाठी नसल्यामुळे संपत नाही, तर वाढत जाते व त्यामुळे मन निरोगी राहते.
 
 
होमियोपॅथीला निसर्गाची जोड देण्याचा हाच विचार डॉ. हॅनेमान यांचा होता. होमियोपॅथीच्या तत्त्वांनुसार जी तत्त्वे संपूर्णपणे निसर्गाच्याच तत्त्वांवर अवलंबून आहेत, अशा तत्त्वांना निसर्गातील औषधे न्याय देऊ शकतात म्हणूनच डॉ. हॅनेमान यांनी निसर्गातील सर्व घटकांपासून औषधे बनवण्यास सुरुवात केली. निसर्गात असणार्‍या वनस्पती, प्राणी व खनिजे (Plants, Animals and Minerals) या सर्वांपासून होमियोपॅथीची औषधे बनतात व ही पूर्णपणे नैसर्गिक व शुद्ध असल्यामुळे पर्यायाने मानवी शरीराची व मनाची शुद्धता वाढवतात. म्हणूनच होमियोपॅथीची औषधे ही प्रत्येकाने घेतल्यास त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम शरीरावर दिसतो. परंतु, ही औषधे घेताना जे डॉ. हॅनेमान यांनी आखून दिलेल्या व निसर्गाच्या नियमांना धरून औषधे देतात, अशाच डॉक्टरांकडून घ्यावीत. मन व शरीर शुद्ध करण्यासाठी अजूनही काही गुणधर्म आहेत ते आपण पुढे पाहूया.
 
 
डॉ. मंदार पाटकर
 
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
 
9869062276
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.