सूत्रसंचालनाच्या विश्वातील रवींद्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2021
Total Views |

manse new_1  H


सूत्रसंचालन हीच त्यांची ओळख आणि आयुष्य. नाशिकमधील सुपरिचित सूत्रसंचालकांमध्ये ज्यांची गणना होतेे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे रवींद्र मालुंजकर. त्यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा मागोवा...
रवींद्र मालुंजकर यांचा जन्म नाशिकरोड येथे, तर बालपण देवळाली गावात आणि प्राथमिक शिक्षण जयरामभाई हायस्कूलमध्ये झाले. लहानपणी शेजारी चिखले बाबांच्या घरी नवनाथांची आणि गुळवे परिवाराच्या घरी ज्ञानेश्वरीची पोथी वाचली जायची. त्यामुळे मालुंजकर हे अगदी चौथीला असताना त्यांच्या घरी पोथी ऐकायला जायचे. पोथीचे शब्द, स्वर, लय, ताल सातत्याने कानावर पडत असल्याने त्यांना वाचनाची गोडी लागली. वडील शाळेत शिपाई असल्यामुळे ते वाचनालयातून पुस्तके घेऊन ती वाचत. तसेच शाळेत सांस्कृतिक समितीतर्फे ‘लग्नाची बेडी’, ‘संशयकल्लोळ’, ‘दुरितांचे तिमिर जावो’ या संगीत नाटकांचे आयोजन केले जायचे. नाटकातील स्वगत ऐकून मालुंजकर यांना काव्यलेखनाची आवड जडली. दरम्यान, देवळाली गावात ‘नवरंग’, ‘जयशंकर मेळा’ आयोजित केला जायचा. या मेळ्यातील निवेदक वेगळ्या शैलीत सूत्रसंचालनकरत असे. मेळ्यात ‘नांदी’, ‘गण’, ‘गवळण’, ‘वगनाट्य’ या प्रकारांचा समावेश असायचा. या मेळ्यांना मालुंजकर आणि त्यांची मित्रमंडळी सर्वात पुढे बसत. नंतर या सर्वांनी मिळून एका केळे विकणार्‍या व्यक्तीच्या हातगाड्यालाच व्यासपीठ समजून त्यावर मेळा आयोजित केला. यावेळी मालुंजकर यांनी पहिल्यांदा सूत्रसंचालकाची जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांना स्वतःमधील सूत्रसंचालक सापडला. महाविद्यालयातील प्रा. दिलीप फडके यांच्या निवेदनाने मालुंजकर प्रेरित झाले. त्यानंतर ते ज्या-ज्या ठिकाणी कार्यक्रमांना हजेरी लावत, त्या ठिकाणी ते सूत्रसंचालकाचे दुवे हेरत आणि त्याची नोंद ठेवत. या नोंदीचा वापर ते आपल्या सूत्रसंचालनामध्ये करू लागले. कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, विठ्ठल वाघ, फ. मु. शिंदे यांच्या कार्यक्रमांनाही त्यांनी हजेरी लावली. जेमतेम परिस्थिती असल्यामुळे त्यांनी काही काळ ‘सीए’कडे टंकलेखक म्हणूनही काम केले.

नंतर मुंबईत ‘बी.एड’ केल्यानंतर १९९४ साली नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून मालुंजकर रुजू झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण अंजनगावकर यांनी कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची संधी त्यांना दिली. त्याकाळी नाशिकमध्ये सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध असलेल संजय चौधरी, संदीप देशपांडे, प्रा. शंकर बोर्‍हाडे यांच्यासोबत मालुंजकर कार्यक्रमांना जाऊ लागले. १९९३ साली ओझरला ‘द्राक्ष भवन’ येथे त्यांनी पहिल्या खुल्या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले.मालुंजकर यांना शालेय वयापासूनच रोज जे ऐकलं, वाचलं त्याच्या नोंदी लिहिण्याची सवय. यामध्ये ते सूत्रसंचालनासाठी आवश्यक बाबींची नोंद करत. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी सर्व नोंदींचा वापर करून, ‘सूत्रसंचालनासाठी’ हे पुस्तक लिहिले. आतापर्यंत त्या पुस्तकाच्या तीन आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्राबरोबरच परदेशातही हे पुस्तक पोहोचले, हे विशेष!सूत्रसंचालन कसे करावे, यावर अनेक पुस्तके आहेत. मात्र, सूत्रसंचालन करताना कोणत्या गोष्टींचा वापर करावा, याविषयी त्यांनी या पुस्तकात माहिती दिली आहे. सूत्रसंचालन म्हणजे नुसतं कवितेच्या ओळी नाही, तर त्यात विचारांचा समावेशही तितकाच महत्त्वाचा आहे. मालुंजकर यांच्या जीवनप्रवासात पत्नी जया आणि मुली कावेरी व निशा यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे.मनोहर पर्रिकर, शरद पवार, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, आर. आर. पाटील, विश्वास नांगरे-पाटील, उज्ज्वल निकम यांसारख्या दिग्गजांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली आहे. राजकीय कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ते प्रकर्षाने नाकारतात. मात्र, सामाजिक कार्यक्रमाला जर राजकीय व्यक्ती असतील तर ते सूत्रसंचालनासाठी होकार देतात.“सूत्रसंचालक हा उत्तम आणि मोजके बोलणारा असावा. तो उपस्थितांसाठी डोकेदुखी न ठरता कार्यक्रमाचा दुवा झाला पाहिजे,” असे मालुंजकर सांगतात. ज्या ठिकाणी आम्ही राहायचो, त्या ठिकाणी दारूची दुकानं असल्याने तिथे सकाळीच शिव्याशाप ऐकायला मिळत. मात्र, बालपणी आध्यात्मिक संस्कार मिळाल्यामुळे स्वतःला बदलता आल्याचे ते सांगतात. वाचन आणि विचार ऐकावेत. ‘अभ्यासोनी प्रगटावे’ या उक्तीप्रमाणे अभ्यास करून सूत्रसंचालन करण्याचा सल्ला ते नवीन सूत्रसंचालकांना देतात. सूत्रसंचालकाने कुठे आणि किती बोलावे, याचे भान पाळणे आवश्यक असल्याचेही ते सांगतात.
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव आयुष्यावर झाल्याचे ते आवर्जून सांगतात. सावरकरांचे जन्मगाव अर्थात भगूर गावाशी मालुंजकर यांचा जवळचा संबंध. दि. २६ जानेवारी, १९९२ मध्ये भगूरमध्ये ‘प्रेस कामगार युवक मंडळा’ची स्थापना झाली. त्यानिमित्ताने या मंडळाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त ‘एक सायंकाळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत’ हा काव्यसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. जो आजही निरंतर सुरू आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन मालुंजकर यांच्याकडेच असते.सावरकरांची उक्ती आणि कृती एकच होती. सावरकरलिखित ‘कमला काव्य सुगंध’ या काव्यसंग्रहाचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांचे साहित्य आणि भाषाशुद्धीच्या विविध प्रयोगांमुळे मराठी साहित्याचा अभ्यासक म्हणून त्यांचा आदर असल्याचे मालुंजकर सांगतात. एका केळे विकणार्‍याच्या हातगाडीलाच व्यासपीठ समजून पहिल्यांदा सूत्रसंचालनाचे धाडस करणार्‍या मालुंजकरांनी आतापर्यंत कित्येक मोठमोठ्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. सूत्रसंचालनासाठी स्वतःला वाहून घेणार्‍या या व्यक्तिमत्त्वाला दै.‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.

पवन बोरस्ते






@@AUTHORINFO_V1@@