काव्यसावित्री!

    03-Jan-2021   
Total Views |

savitribai phule_1 &
 
 
 
 
आज ३ जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. सावित्रीबाईंचे जीवनचरित्र सर्वज्ञात आहेच. परंतु, कला शाखेची विद्यार्थिनी म्हणून मला त्यांच्या काव्यप्रतिभेला जाणून घ्यावेसे वाटते. त्यांच्या काव्यसंपदेचा घेतलेला हा आढावा...
 
स्त्रीशिक्षण, सामाजिक उत्थानाचे कार्य करत असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी क्रांतिकारी कवितांची मुहूर्तमेढ रोवली. खरंतर कवितालेखन हे त्यांच्या जीवितकार्याचे उद्दिष्ट नाही. अंधारात खितपत पडलेल्या समाजाला जागे करण्याचे काम त्यांनी केले. पण, हे कार्य करत असताना त्यांनी काव्यलेखनही केले. काव्यलेखनाचा उद्देश आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करणे नसून, तर समाजप्रबोधन करणे हा होता. त्यामुळे त्यांच्या कविता आजही तितक्याच समर्पक वाटतात. सावित्रीबाईंच्या आधी महदंबा, मुक्ताई, जनाबाई, वेण्णा अक्का यांसारख्या संत स्त्रियांनी अभंग लेखन केलेले आहे. गवळणी, विहरणी, ओव्या इ. रचनाही त्यांनी केल्या. नंतरच्या काळात स्त्रीचे अस्तित्व सामाजिक बंधनांमध्ये जखडले गेले. या काळात खंडित झालेली काव्यपरंपरा सावित्रीबाईंनी पुनरुज्जीवित केली. अर्थात, स्त्री जाणिवा, प्रबोधन, भक्ती यांचा समावेश त्यांच्या काव्यात झालेला दिसतो.
 
सावित्रीबाईंचे ‘काव्यफुले’ आणि ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ असे दोन कवितासंग्रह. पहिला काव्यसंग्रह ‘काव्यफुले’ हा १८५४ मध्ये, तर दुसरा काव्यसंग्रह ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हा १८८२ साली प्रसिद्ध झाला. सावित्रीबाईंनी आपल्या काव्यात अनेक विषय हाताळले आहेत. त्यांच्या काव्यात प्रेम, करुणा, सामाजिक जाणिवा आणि बंधुतेचे सूत्र आपल्याला आढळून येते. त्यांचे काव्य सत्याचा शोध घेऊन सत्याची कायमच पाठराखण करताना आपणास दिसते. सामाजिक जाणिवेच्या कवितेबरोबर, आत्मपर कविता, निसर्गविषयक कविता, स्वातंत्र्यविषयक कविता, प्रार्थनापर आणि बोधपर कविता अशा अनेक विषयांनी त्यांची काव्यसृष्टी बहरली आहे. अशा प्रकारच्या कविता त्यांच्या काळात दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने लिहिलेल्या नाहीत.
 
‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह ‘शिलाप्रेस’ने प्रकाशित केलेला असून मुखपृष्ठावर शंकर-पार्वतीचे चित्र आहे. या काव्यसंग्रहाची छपाई मिशनरी छापखान्यात झाल्याचे नमूद केलेले आहे. या काव्यसंग्रहातील १२ कवितांचे सावित्रीबाईंनी मोडी लिपीत केलेले कच्चे टाचण उपलब्ध झाले आहे, जी अभ्यासकांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. या काव्यसंग्रहात एकूण ४१ कविता आहेत. सावित्रीबाईंच्या लेखाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अनेक कविता या वृत्तबद्ध आहेत. अर्थात, त्यात मुक्तता दिसून येते. ‘वसंततिलका’, ‘दिंडी’ ही वृत्त, तर ‘अक्षरच्छंद’, ‘ओवी’, ‘अभंग’, ‘अनुष्टुप’ अशा विविध छंदांचा प्रयोग त्यांनी आपल्या साहित्यामध्ये केलेला आहे. मुळात ‘छंद’ आणि ‘वृत्त’ या संकल्पना संस्कृत साहित्यातील आहे. परंतु, संस्कृत साहित्यामध्ये ‘छंद’ व ‘वृत्त’ या संकल्पना खूप काटेकोर आहेत, तेवढी मराठीमध्ये नाही.
 
 
 
Savitri Poem 1_1 &nb
 
 
 
सावित्रीबाईंच्या कविता या सहजगत्या वृत्तबद्ध झालेल्या आहेत. त्यांच्या कवितांवरती समर्थ रामदासांचा प्रभाव असलेला दिसून येतो. सावित्रीबाईंनी ‘वसंततिलका’ या वृत्तात ‘काव्यफुले’मध्ये ‘अर्पणिका’ रचली आहे. ‘वसंततिलका’ हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १४ अक्षरे आणि ‘त भ ज ज ग ग’ हे गण येतात. या वृत्ताचा ‘यती’ हा आठव्या अक्षरावरती असतो आणि शेवटची दोन अक्षरे गुरू असतात. ‘वसंततिलका’ वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे की, ‘घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने’ (माझे मृत्युपत्र) ही सावरकरांची कविता होय. सावित्रीबाई याच सुंदर वृत्ताचा आधार घेऊन लिहितात -
 
मजवर सकळाची भावभक्ती विशाला
हृदय भरूनि येते वाटते हे कशाला
उपकर कृति आहे भार होई मनाला
सुजन हितकारांना अर्पिते ही सुमाला...
 
‘वसंततिलका’ या वृत्ताला ‘पुष्यगंध’ असेही म्हणतात. अत्यंत प्रसन्न आणि ऊर्जा असणारे हे वृत्त आहे.
 
 
या सुंदर वृत्तामध्ये सावित्रीबाईंनी ‘अर्पणिका’ रचली आहे. उदाहरणादाखल आपण ‘अर्पणिके’मधील एक ओळ पाहूया...
 
 
 
Savitri Poem 2_1 &nb
 
 
 
अर्थात, मराठीपेक्षा संस्कृतमध्ये हा छंद अधिक बांधीव आहे; मराठीत अनेकदा तो काहीसा सैल विणीत दिसतो. सावित्रीबाईंची कविता ‘दिंडी’ या मात्रावृत्तामध्येही दिसते. दिंडीला चार चरण असतात आणि चरणाच्या शेवटी अनुप्रास किंवा यमक असते. त्यात ती कुठे दोन-दोन चरणांची सारखी, कुठे चारही चरणांची सारखी अशी असतात. या छंदास अक्षरांचा नियम नाही. पण, मात्रांचा नियम आहे. कारण, हे मात्रावृत्त आहे. प्रत्येक चरणास १९ मात्रा असतात आणि नवव्या मात्रेवर ‘यती’ असतो. म्हणून नऊ मात्रांचा एक व दहा मात्रांचा एक, असे दोन भाग होतात. त्यांच्या मात्रांची रचना अशी असावी की, पहिल्या भागांत प्रथम तीन मात्रांचा एक गण, म्हणजे एक गुरू, एक लघु किंवा एक लघु, एक गुरू किंवा तिन्ही लघु असा असावा. त्यापुढे तीन गुरू किंवा सहा लघु; किंवा लघु-गुरू मिळून सहा मात्रांचा गण असावा. दुसऱ्या भागांत पहिल्याप्रमाणे प्रथम तीन मात्रांचा गण, मग पुन्हा तसाच आणखी तीन मात्रांचा गण व त्यांच्या पुढे म्हणजे शेवटी दोन गुरू असावे.
 
रघुनाथ पंडित यांचे काव्य यासाठी उदाहरण म्हणून पाहूया.
 
कथा बोलूं हे मधुर सुधाधारा।
होय शृंगारा करुणरसा थारा॥
निषधराजा नळनामधेय होता।
वीरसेनाचा तनय महाहोता॥
 
 
सावित्रीबाईंची ‘द्रष्टा कवी’ ही कविता ‘दिंडी’ वृत्तामध्ये आहे.
 
 
पद्य : काव्य ज्ञानाचा भक्त असे मोठा
मात्रा : १९
अक्षरसंख्या : ११
 
 
पद्य : नवरसाचा तो भरलेला कोठा
मात्रा : १९
अक्षरसंख्या : १२
 
 
पद्य : ओघ काव्याचे वाहतात तोंडी
मात्रा : १९
अक्षरसंख्या : ११
 
 
पद्य : तया द्रष्टा वर देई नव-चंडी
मात्रा : १९
अक्षरसंख्या : १२
 
 
 
या पद्यातील प्रत्येक चरणातील अक्षरसंख्या वेगवेगळी आहे. मात्र, प्रत्येक चरणातील मात्रांची संख्या १९ आहे. या १९ मात्रांचे ९ आणि १० असे दोन भाग पडतात. हे दिंडी मात्रावृत्त आहे. दिंडी हे वृत्तात त्यांनी एकच रचना केलेली दिसते.
 
सावित्रीबाईंनी वृत्तबद्ध रचना केल्या तशाच त्यांनी छंदबद्धही रचना केल्या आहेत. सावित्रीबाईंनी शिव प्रार्थना आपल्या ‘काव्यफुले’ या स्फुट कविता संग्रहात लिहिली आहे. ही रचना ओवीबद्ध आहे. ‘ओवी’ या अभिजात छंदाचे चार प्रकार पडतात. दोन चरण, तीन चरण, साडेतीन चरण आणि चार चरण असे ओव्यांचे प्रकार आहेत. सावित्रीबाईंच्या ओव्या या चार चरणांमध्ये आहेत. यामध्ये ८-८-८-८ अक्षरे असतात. ओवी या छंदाबाबत सावित्रीबाईंनी स्वातंत्र्य घेतलेले आहे. ‘शिव प्रार्थना’ या काव्यात १०-१०-१०-८ अशी अक्षरे आहेत. तीन चरणातील शेवटचे अक्षर समान असते. त्यांचा यमक जुळवून शेवटच्या ओळीमध्ये समान अक्षर नसते.
 
त्रिलोचन त्रितिक्षु ललाट।
त्रिपुरान्तक त्रिभुवन त्रिपट।
स्कंधी सर्पनृत्याचा थयथयाट।
चाले कर्ता कर्म क्रियेचा॥
 
 
 
त्याचप्रमाणे सावित्रीबाईंनी ‘अभंग’ छंदामध्येही काव्यरचना केलेली आहे. अभंगामध्ये ६-६-६-४ अशी अक्षरे असतात. ‘मनू म्हणे’, ‘ब्रह्मवंती शेती’, ‘इंग्रजी माऊली’, ‘नवस’, ‘शूद्र शब्दाचा अर्थ’, ‘इंग्रजी शिका’ हे त्यांचे प्रसिद्ध अभंग आहेत.
 
सावित्रीबाईंनी ‘अनुष्टुप’ छंदामध्येही रचना केली आहे. ‘अनुष्टुप’ छंद म्हणजे अष्टाक्षरी चार चरणांचे काव्य. रामरक्षेतील बरेचसे काव्य याच छंदात लिहिले गेले आहे. या छंदाचे वर्णन संस्कृत श्लोकात खालीलप्रमाणे केले गेलेले आहे.
श्लोके षष्ठं गुरू ज्ञेयं सर्वत्र लघु पञ्चमम् ।
द्विचतुःपादयोर्र्र्हस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः॥
श्रुतबोध-१०२
 
 
 
(सहावे गुरू सर्वत्र, लघु सर्वत्र पाचवे । समांत सातवे र्‍हस्व, विषमी दीर्घ ते असे) त्यात असे म्हटले आहे की, श्लोकाच्या प्रत्येक चरणातील आठ अक्षरांमध्ये पाचवे र्‍हस्व (लघु), सहावे अक्षर दीर्घ (गुरू), सातवे अक्षर पहिल्या व तिसऱ्या चरणांत दीर्घ (गुरू) असते, तर दुसऱ्या व चौथ्या चरणांत र्‍हस्व (लघु) असते.
 
 
Savitri Poem 3_1 &nb
 
 
अनुष्टुपाची सर्वपरिचित उदाहरणे म्हणजे सार्थ श्रीरामरक्षा आणि मारुती स्तोत्र.
 
चरितं रघुनाथस्य । शतकोटिप्रविस्तरम्।
एकैकमक्षरं पुसां । महापातकनाशनम्॥
 
 
‘छत्रपती शिवाजी’, ‘ जोतिबांना नमस्कार’, ‘शूद्रांचे दुखणे’, ‘श्रेष्ठ धन’, ‘बाळास उपदेश’ या प्रसिद्ध अनुष्टुप छंदातील त्यांच्या रचना आहेत.
 
 
उदा. जोतिबांना नमस्कार । मनोभावे करितसे ।
ज्ञानामृत आम्हा देई । अशा जीवन देतेस ॥
 
 
 
Savitri Poem 4_1 &nb
 
 
 
मराठीमध्ये या छंदातील काही रचनांमध्ये एखाद-दुसऱ्या चरणांत कमी अक्षरे दिसतात. तथापि, तो मुक्तही नाही; असा जो तो ‘अनुष्टुप’ छंद होय. अनुष्टुप अष्टाक्षर-नियत आहे, तरी त्यातील अर्ध्या भागात लघुगुरुत्वाचा विचार करावा लागतो. पण, अर्ध्या भागात तो तसा करावा लागत नाही, तसेच त्याचे लक्षण, मात्रामापनानेही वर्णन करता येत नाही. चरणांती ‘यती’ येत असल्यामुळे आठवे अक्षर लघु असले तरी त्याचा उच्चार दीर्घच होतो. त्यामुळे आठवे अक्षर दीर्घ असावे, ही अट सांगितलेली नाही. भगवद्गीता आणि गीताई यांतील बहुतांशी श्लोक ‘अनुष्टुप’ छंदातच रचलेले आहेत.
 
 
‘कायफुले’मध्येच अनुष्टुप छंदातील एक श्लोक आहे.
 
 
शूद्रांना सांगण्याजोगा । शिक्षणमार्ग हा ।
शिक्षणाने मनुष्यत्व । पशुत्व हाटते पाहा ॥
 
 
यातील दुसऱ्या चरणामध्ये सहाच अक्षरे आहेत. यातील ‘शिक्षणमार्ग’ हा वृत्तदोष आहे. परंतु, तो अनुष्टुप छंदातीलच म्हणून गणला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सावित्रीबाईंना ज्यांना उपदेश करायचा आहे, तो पाहता वृत्त हा या कवितेत गौण मुद्दा ठरतो.
 
 
सावित्रीबाईंच्या कवितांवरती रामदासांचा प्रभाव आहेच, तसेच त्या रामदासांना उत्तर देण्याचा प्रयत्नही करतात. वानगीदाखल खालील कविता पाहू-
 
 
जगी सर्व सुखी असा एक आहे
विचारी मना तूच शोधून पाहे
मना त्वाचि रे ज्ञान संचित केले
तया सारखे भोगणे प्राप्त झाले
 
 
ही कविता रामदासांच्या मूळ कवितेत पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत एक-एक शब्द बदलवून केलेली आहे. रामदासांची कविता अशी -
 
 
जागी सर्व सुखी असा कोण आहे
विचारी मना तूच शोधून पाहे
मना त्वाचि रे ज्ञान पूर्व संचित केले
तया सारखे भोगणे प्राप्त झाले
 
 
सावित्रीबाई यांच्या कवितांचा वृत्त व छंद या दृष्टीने अभ्यास केला तर काही ठिकाणी वृत्तभेद दिसतो. त्यामुळे त्यांच्या काव्याचा अभ्यास करताना काव्याच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर विचारांच्या दृष्टीने केला पाहिजे. रामदासांनी ज्याप्रमाणे ‘गुणवंतां’च्या ऐवजी ‘गूणवंता’ असे लिहिले. ‘रघुनायका’ऐवजी ‘रघूनायका’ लिहिले. त्याचप्रमाणे सावित्रीबाईंनीही आपल्या काव्यात अनेक भेद केले आहेत. उपेक्षितांच्या जागरणाचा वसा घेऊन सावित्रीबाईंनी केलेली काव्यरचना पाहून आपले मन भरून येते. त्यांचे काव्य म्हणजे, मराठी भाषेतील क्रांतिकाव्यच होय. कारण असे काव्य त्या काळात अन्य कोणत्याही स्त्रीने लिहिलेले नाही. लोकशिक्षणासाठी कवितांचा एक माध्यम म्हणून त्यांनी उपयोग केला आणि मराठी साहित्यात एक अक्षरवाङ्मयाची भर पडली. त्यांच्या या कविता अनेक पिढ्यांच्या प्रतिभेला प्रबोधनाची प्रेरणा देत राहतील, यात शंका नाही.
 
 
- वसुमती करंदीकर