'ऑनलाईन' वर्गांमुळे पाठ्यपुस्तकांकडे पाठ : विक्रेत्यांपुढे संकट

    दिनांक  16-Sep-2020 18:52:27
|
Book Seller _1  
 
 

मुंबई : राज्यात ऑनलाईन शाळा महाविद्यालये सुरू झाली. कित्येक महिने खोळंबलेला विद्यार्थ्यांचा अभ्यासही पुन्हा सुरळीत सुरू झाला. मात्र, दरवर्षी नव्या शैक्षणिक वर्षाला गजबजणारी पाठ्यपुस्तके आणि शालेय साहित्याची दुकाने कोरोनाच्या संकटामुळे ओस पडून आहेत. शाळा-महाविद्यालये ऑनलाईन सुरू असल्याचा सर्वात जास्त फटका आम्हाला बसत असल्याची तक्रार या विक्रेत्यांनी केली आहे.
 
 
 
ऑनलाईन वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांना आता पूर्वीप्रमाणे पाठ्यपुस्तकांची फारशी गरज भासत नसल्याचे चित्र आहे. शाळा बंद असल्याने पालकवर्गानेही नव्या वस्तूंची खरेदी केलीच नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमही ऑनलाईन पीडीएफ आणि नोंदी स्वरुपात मिळत असल्याने पाठ्य पुस्तके विकत घ्यावीत का, असा प्रश्न अद्याप पडलेला नाही. मात्र, वर्षानुवर्षे या व्यवसायात असलेल्या विक्रेते आणि दुकानमालकांना आता करायचे काय, अशी चिंता सतावते आहे.
 
 
 
आधीच लॉकडाऊनमुळे तीन ते चार महिने दुकाने बंद, मालाचा पुरवठाही ठप्प, शालेय साहित्याची विक्री खोळंबली. अशातच शाळा सुरू होतील तेव्हा आपण या संकटातून सावरू अशी अपेक्षा दुकानदारांना होती. मात्र, शाळा सुरू झाल्या त्या लॅपटॉप्स, मोबाईल आणि टॅबवर त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळांतर्फे अभ्यासाचे साहित्यही पीडीएफ किंवा पीपीटी स्वरुपात मिळू लागले. नव्या पाठ्यपुस्तकांची खरेदी अनेकांनी केलीच नाही. आधीच शुल्क आकारणीचा घोळ, त्यात शाळा सुरू होण्याबद्दलची चिंता आणि आता पाठ्यपुस्तक विक्रेत्यांचा बंद झालेला रोजगार यातून सावरणार कसे, असा प्रश्न आता विक्रेते विचारत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.