शिलास्मारकाचे शिल्पकार : एकनाथजी रानडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2020
Total Views |

shilasmarak_1  


सार्‍या भारताला गौरवास्पद असलेलं स्वामी विवेकानंदांचं एक अद्वितीय स्मारक भारताच्या दक्षिणेला असलेल्या कन्याकुमारी येथील सागरात उभं राहिलं, त्याला २ सप्टेंबर रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या शिलास्मारकाचे शिल्पकार मा. एकनाथजी रानडे यांच्या महान कार्याचे स्मरण करणारा हा लेख...


ज्या शिलेवर स्वामी विवेकानंदांना ध्यानावस्थेत आपलं जीवनकार्य गवसलं, त्या शिलेवरील स्मारकाचे खरेखुरे शिल्पकार म्हणजे कर्मयोगी मा. एकनाथजी रानडे! कारण, फक्त स्मारक निर्माण करून ते थांबले नाहीत, तर स्वामीजींचे विचार पुढे नेणारे त्यांच्या कार्याचे कृतीतून स्मरण करणारे जीवंत स्मारक म्हणजे ‘विवेकानंद केंद्र’ हे त्यांच्यासाठी जास्तं महत्त्वाचे होते. स्वामीजींच्या विचारांवर आधारलेली सेवाभावी संघटना जी ईशान्य भारतातील दुर्गम, पहाडी भागात जाऊन आरोग्यसेवा ते शिक्षणापासून वंचित राहणार्‍यांना उत्तम शिक्षण देऊ शकेल, तीसुद्धा सेवा आणि त्याग या भावनेने, अशी त्यांना अपेक्षित होती. शिलास्मारकापाठोपाठ ७ जानेवारी, १९७२ला या आध्यात्मिक पायावरील सेवा संघटनेची स्थापना मा. एकनाथजींनीच केली.योजनेनुसार स्मारक तयार झाले. एकनाथजींनी याकरिता अथक परिश्रम घेतले, इतरांनाही घ्यायला लावले. ते झपाटलेले जादुई दिवस होते. त्या काळात अनेक सामान्य माणसांनी असामान्य कामे करून दाखवली, तो त्यांच्या जीवनातील संस्मरणीय काळ ठरला. म्हणूनच ‘विवेकानंद केंद्र’ सामान्य माणसांची असामान्य संघटना म्हणून ओळखली जाते.



या स्मारकाच्या अनेक गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत, कशा ते बघूया.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, एकनाथजींची काम करण्याची शैली! अडचणी आणि संकटे यांना ते यशाच्या मार्गाकडे नेणार्‍या संधी समजून आणि याच भावनेने त्यांनी संकटाचे, अडचणींचे संधीत रूपांतर करून शिलास्मारक त्यांना हवे होते तसेच उभारले, म्हणून ते वैशिष्ट्यपूर्ण आहे.शिलास्मारक बांधणे, ही एकनाथजींची परीक्षाच होती. त्यांना हे सिद्ध करायचे होते की, जर राजकारणापासून दूर राहून, लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले, तर लोक पक्षभेद, पंथभेद बाजूला ठेवून मदतीसाठी पुढे येतील. त्यांनी दिल्लीत तळच ठोकला. सर्व पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना स्मारकाबद्दलची योजना समजावून सांगितली आणि दोन दिवसांत तब्बल ३२३ खासदारांच्या स्वाक्षर्‍या घेऊन सार्‍या देशाचा पाठिंबा स्मारकासाठी मिळवला, विरोधकांचा विरोध मोठ्या कौशल्याने दूर करून त्यांना आपलेसे केले, मित्र केले.दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची निधी संकलनाची योजना. देशातील सामान्यातील सामान्य माणसाला हे स्मारक आपले आहे असे वाटावे, याकरिता त्यांनी एक रुपयाची, दोन रुपयांची देणगीची कुपने काढली. त्यासाठी तयार करण्यात आलेले माहितीपत्रक इतके सुंदर होते की, अजूनही काही जणांनी ते आपल्या संग्रही जपून ठेवले आहे.




निधी गोळा करण्यात आलेल्या एक कोटी ३५ लाख रुपयांपैकी ८५ लाख रुपये देशातील १ टक्के प्रौढ जनतेकडून एक, दोन रुपयांच्या देणगीतून गोळा करण्यात आले होते. माहितीपत्रके देशातील सर्व भाषांमध्ये छापली होती. निधी संकलनाचे कामही कालबद्ध होते. सहा महिन्यांत निधी संकलन करून हिशोब पुरा केला जाई.यानंतर पुतळा कसा असावा याचा विचार सुरू झाला. रामकृष्ण मठातील काही स्वामीजींना पुतळा ध्यानस्थ असावा, असे वाटत होते. पण, एकनाथजी याबाबत ठाम होते. ते म्हणाले, “या शिलेवर स्वामीजींनी भारताच्या उत्थानासाठी ध्यान केले आहे, ध्यानातून उठून आत्मविश्वासपूर्वक कार्यासाठी पुढे निघाले आहेत, जगाला काही संदेश देण्यास निघाले आहेत, असा पुतळा असला पाहिजे.“ हे त्यांनी पटवून दिले. मग प्रसिद्ध चित्रकार एस. एम. पंडित यांच्याकडून प्रथम त्यांना हवे तसे चित्र काढून घेतले, त्याकरिता एस. एम. पंडितांनीही खूप मेहनत घेतली. त्यानंतर देशातील आठ मूर्तिकारांशी संपर्क साधून मूर्ती तयार करून घेतल्या व नंतर मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. सोनावडेकर यांची निवड करून त्यांनी पुतळा बनविला. त्याकरिता स्वतः सोनावडेकरांनीही विवेकानंदांच्या साहित्याचा अभ्यास केला, साधना केली. शिलास्मारकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे स्मारकाचे बांधकाम करणारे जवळजवळ ६५० कारागीर कामगार रोज काम करीत असत. काही वेळा त्यांची मजुरी देण्यासाठी पैसे नसत. पण, त्यांनीही साथ दिली. ते म्हणत, “आम्हाला रोजचे फक्त जेवण द्या, बाकी आमच्या घरचे लोक घर कसे चालवायचे ते बघून घेतील. पण, स्मारकाचे काम रेंगाळता काम नये.” या महान कामगारांच्या या बाण्याने एकनाथजी हेलावून जात, त्यांना गहिवरून येई.१९७०पूर्वी स्मारकाचे काम पूर्ण करायचे याबाबतही एकनाथजी ठाम होते. स्मारकाचा किती भाग केव्हा पूर्ण करायचा याचे अतिशय तपशीलवार वेळापत्रक तयार करण्यात आले होते. ते जेथे असतील तेथून प्रगतीचा अहवाल विचारीत व आपल्या वेळापत्रकाशी ताडून बघत. जेव्हा-जेव्हा ते दौर्‍याहून कन्याकुमारीला जात, तेव्हा-तेव्हा ते थेट शिलेवर जात. प्रवासाचा शीण, थकवा वगैरेचा प्रश्नच नसे.



एकदा असेच दौर्‍यावरून ते थेट कन्याकुमारीला शिलेवर गेले. अपेक्षित काम पूर्ण झालेले नव्हते, त्यांनी सार्‍या कामगारांना बोलवून घेऊन रातोरात काम पूर्ण करून घेतले. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र पंडित वर्णेकरही होते. त्यांनी एकनाथजींना विचारले, “एवढा हट्ट का? बांधकामात थोडं असं व्हायचंच!” त्यावर एकनाथजी म्हणाले, “राष्ट्रहिताच्या दृष्टीने एका दिवसाचा विलंबही चालायचा नाही. कारण, विवेकानंदांचे जितेजागते स्मारक उभारण्याचे यापेक्षाही मोठे काम हाती घ्यायचे आहे.” अर्थात, त्या रात्री एकनाथजी व वर्णेकरही रात्रभर कारागिरांच्या बरोबर तेथेच होते. स्मारक तयार झालं! कन्याकुमारी... छोटं गाव... जेमतेम सात हजार लोकवस्तीचं! या राष्ट्रकार्यात सगळ्या देशाचा सहभाग असल्याने उद्घाटनाला खूप मोठ्या संख्येने लोकं येणार हे गृहीत धरून एकनाथजींनी येथेही आपले कौशल्य सिद्ध केले. उद्घाटनाला तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी आले होते. बेलूर येथील ‘रामकृष्ण मठ आणि मिशन’चे अध्यक्ष स्वामी विरेश्वरानंदांच्या हस्ते स्मारक राष्ट्राला अर्पण करण्यात आले. तो दिवस होता २ सप्टेंबर, १९७०. तिथीनुसार भाद्रपद शुद्ध द्वितीया, स्वामी विवेकानंदांचा सर्वधर्म परिषदेतील पहिला दिवस! हा उद्घाटन सोहळा दोन महिने चालला होता. देशातील विविध भागातील जनतेसाठी विशिष्ट तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. कोणत्याही दिवशी कन्याकुमारीत येणार्‍या यात्रेकरूंची संख्या पाच हजारांवर जाणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली होती. या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी, उपराष्ट्रपती गोपाळस्वरूप पाठक, मा. गोळवलकर गुरुजी आदी मान्यवरांनी शिलास्मारकाला भेट दिली.


अजून एक वैशिष्ट्य असे आहे की, एवढं प्रचंड काम करणार्‍या एकनाथजींचे नाव निमंत्रण पत्रिकेत काय किंवा शिलास्मारकावर कोठेही नाही. ‘मी हे केले’ असा भाव त्यांच्या कामात कधीही नसे. या कार्यात परमेश्वराने आपल्याला एक साधन, उपकरण बनविले आहे, याचे त्यांना कधीही विस्मरण झाले नाही.स्मारक बघण्यासाठी देशातून व विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात, रोज साधारणपणे पाच ते सहा हजार! पण, तरीसुद्धा स्मारकाचा संपूर्ण परिसर अत्यंत स्वच्छ आणि प्रसन्न राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. सकाळी ८ ते संध्याकाळी ५पर्यंत कन्याकुमारी गावातील जेट्टीपासून स्मारकावर जाण्यासाठी शासनाची बोटसेवा उपलब्ध आहे. स्मारकावर पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, चाकाची खुर्ची अशा सुविधाही उपलब्ध आहेत. स्मारक पाहायला आलेले सारेच तेथील वातावरणाने भारावून जातात. ‘श्रीपाद मंडपम’मध्ये देवी कन्याकुमारीच्या पदाचे दर्शन घेतात, ‘विवेकानंद मंडपम’मध्ये स्वामीजींपुढे नतमस्तक होतात आणि ‘ध्यान मंडपम’मध्ये थोडावेळ तरी ध्यान करीत बसतात. चारही बाजूंनी उसळणार्‍या लाटांच्या गर्जनेमध्ये स्वामीजींनी तीन दिवस, तीन रात्र ध्यान कसे केले असेल, या विचाराने विस्मयचकित होऊन!


 - अश्विनी कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@