केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक एन९५ मास्क, किट, गोळ्या आणि व्हेंटिलेटर!

    दिनांक  24-Jul-2020 16:38:07
|

PPE_1  H x W: 0


एकूण मदतीपैकी सर्वाधिक मदत महाराष्ट्राला!


नवी दिल्ली : जगात वेगाने पसरणार्‍या कोरोनाने आपले पायही भारतात पसरविले. केंद्र सरकारने राज्य पातळीवर कोरोनाशी लढण्यासाठी सर्व उपकरणे पुरविली. यापैकी सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक एन९५ मास्क, पीपीई किट, टॅब्लेट आणि व्हेंटिलेटर वाटप केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत देशभरात एकूण २.१८ कोटी एन९५ मास्क, १.२१ कोटी पीपीई किट, ६.१२ कोटी एचसीक्यू टॅब्लेट आणि ९१५० व्हेंटिलेटरचे वाटप केले आहे.


आरटीआय अंतर्गत माहिती देताना, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे उपसचिव जीके पिल्लई यांनी १० जुलै २०२० पर्यंत राज्य व केंद्रशासित प्रदेशांना वाटप केलेल्या उपकरणांची यादी अनिल गलगली यांना दिली आहे. या यादीनुसार, एकूण मदतीपैकी महाराष्ट्र सरकारला २१.८४ लाख एन९५ मास्क, ११.७८ लाख पीपीई किट, ७७.२० लाख एचसीक्यू टॅब्लेट आणि १८०५ व्हेंटिलेटरची मदत सुपूर्द करण्यात आली आहे.


देशात १७९३८ व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे. त्यापैकी केवळ ९१५० लोकांना व्हेंटिलेटरचे वाटप करण्यात आले आहे. फक्त छत्तीसगड, उत्तराखंड, चंदीगड, पुडुचेरी आणि ओडिशाला मागणीनुसार १०० टक्के व्हेंटिलेटर देण्यात आले. सिक्कीम, लक्षद्वीप, लडाख अजूनही व्हेंटिलेटरपासून वंचित आहेत. महाराष्ट्राला १७७०, कर्नाटकाला १०२०, आंध्र प्रदेशला ९१४, उत्तर प्रदेशला ८११, राजस्थानला ७०६, तामिळनाडूला ५२९ व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे.


या महामारीत सरकारचे योगदान काय आहे हे जनतेला कळावे म्हणून सरकारने अशा सार्वजनिक कल्याण प्रकरणांची माहिती आरटीआय कायद्याच्या कलम ४ अंतर्गत वेबसाइटवर अपलोड केली पाहिजे, असे मत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी व्यक्त केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.