शेती गहाण ठेवून उद्योग उभारणारा ‘विठ्ठल’

    दिनांक  16-Jul-2020 21:39:20   
|

arthvrutant_1  बांधकाम उद्योगामुळे विठ्ठल सरप पाटील अकोलासारख्या ठिकाणी शंभरहून अधिक लोकांना रोजगार देऊ शकला. अल्पावधीतच ही कंपनी काही कोटी रुपयांची उलाढाल करु लागली. अकोला जिल्ह्यामधील सर्वांत मोठी नागरी वसाहत बांधण्याचे विठ्ठलरावांचे स्वप्न आहे.अकोला. विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा. अनेक ऐतिहासिक- सामाजिक-राजकीय घडामोडींचा साक्षीदार असणारा जिल्हा. अन्य जिल्ह्यांप्रमाणे येथेही उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन म्हणजे शेतीच. येथील एका शेतकर्‍याने आपली शेती गहाण ठेवली आणि स्वत:चा उद्योग उभारला. हा उद्योग उभारुन शंभरच्यावर लोकांना रोजगार दिला. सेंद्रिय शेताची आवड असलेला, पण व्यावहारिकतेचंसुद्धा तेवढंच ज्ञान असलेल्या त्या तरुणाने अचूक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने त्यास एक उद्योजक म्हणून घडविले. शेती शेतकर्‍याला फक्त जगवते असं नव्हे, तर ती त्याला ‘उद्योजक’ म्हणून सुद्धा घडवते. हा उद्योजक म्हणजे ‘राजवी इन्फ्रास्ट्रक्चर’चे संचालक विठ्ठल सरप पाटील. शेतीला आज वेगवेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. निव्वळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी विविध उद्योगसुद्धा करु लागले आहेत. काहीजण नोकर्‍यासुद्धा करु लागले. पुरुषोत्तम अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील वाडेगावचे शेतकरी. त्यांनी शेतीवर अवलंबून न राहता शिक्षकी पेशा पत्करला. प्रभावती या सुस्वरुप पत्नीच्या मदतीने आणि मेहनतीने त्यांनी स्वत:चा संसार फुलविला. पाच मुली आणि दोन मुलगे अशी सात अपत्ये या दाम्पत्यांना झाली. त्यातलाच एक विठ्ठल हा मुलगा. लहानपणापासून हुशार. वाडेगावच्या जिल्हा परिषद शाळेत त्याने प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले. पुढे बारावीपर्यंत श्री जागेश्वर विद्यालयात बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. कला व वाणिज्य महाविद्यालय, बाळापूर येथे त्याने बीए पूर्ण केलं. उद्योजकीय व्यवस्थापनेचे धडे मिळावेत म्हणून विठ्ठलने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून एमबीएची पदवी प्राप्त केली.बारावी झाल्यानंतर त्याने एका शाळेत प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर काही काळ सेंद्रिय शेतीचा प्रयोगदेखील केला. मात्र, आपला पिंड हा उद्योजकतेचा आहे हे विठ्ठलला उमगले होते. नेमका काय व्यवसाय करायचे, हे मात्र सुचत नव्हते. २००५चा तो काळ. दुचाकीचं प्रस्थ खूपच वाढत होतं. आपण हाच व्यवसाय करायचा हे विठ्ठलने ठरवलं. पण, दुचाकीच्या एजन्सीचा व्यवसाय करायचा तर पैसे लागणारच. घरच्यांनी दिलेले एक लाख रुपये आणि इतरांकडून घेतलेले उधारीचे पैसे अशा पद्धतीने विठ्ठलने भांडवल जमा केले. त्यातून आकारास आले ‘शिवानी मोटर बाईक्स’ ही हिरो होंडाची एजन्सी. संपूर्ण बाळापूर तालुक्याचे अधिकृत डिलर म्हणून ‘हिरो होंडा’ने विठ्ठलच्या एजन्सीला अधिकार दिले होते. खरंतर एका शेतकर्‍याच्या मुलाने असं धाडस करणंच मोठी गोष्ट होती. दरम्यान विठ्ठलला समाजकार्याची आवड होती. या आवडीतूनच तो बुलढाणा अर्बन बँकेचा वाडेगावचा संचालक म्हणून निवडला गेला. २०१०मध्ये काही सहकार्‍यांना एकत्र करुन विठ्ठल याने इमारत बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकले. या व्यवसायासाठी फार मोठ्या भांडवलाची गरज होती. ही गरज भागविण्यासाठी विठ्ठलने घरच्या संमतीने शेती गहाण ठेवली आणि ३०लाख उभारले. या व्यवसायात जम बसला. अनेक बांधकामांची कामे विठ्ठलच्या कंपनीला मिळू लागली. दर्जाशी बिलकूल तडजोड न करण्याच्या भूमिकेमुळे ही बांधकाम संस्था पंचक्रोशीत नावारुपास आली. या संस्थेने नऊ इमारती उभारल्या. या उद्योगामुळे विठ्ठल सरप पाटील अकोलासारख्या ठिकाणी शंभरहून अधिक लोकांना रोजगार देऊ शकला. अल्पावधीतच ही कंपनी काही कोटी रुपयांची उलाढाल करु लागली. अकोला जिल्ह्यामधील सर्वांत मोठी नागरी वसाहत बांधण्याचे विठ्ठलरावांचे स्वप्न आहे.


विठ्ठलरावांनी आपली ही उद्योजकता आपल्या भावामध्ये पण रुजवली. ते ऑटोपार्ट्सचे दुकान चालवतात. २०१४ मध्ये विठ्ठल यांचा विवाह मीनल या सुविद्य मुलीसोबत झाला. मीनल यांनी एमएस्सी, बीएड पूर्ण केले आहे. एका कृषी महाविद्यालयात त्या व्याख्यात्या म्हणून कार्यरत होत्या. २०१५ रोजी या दाम्पत्यास एक गोंडस कन्या झाली. ‘राजवी’ असं तिचं नामकरण झालं. या राजवीचे नाव त्यांनी आपल्या बांधकाम संस्थेला दिले. बाळापूर तालुक्यातील आणि अकोला जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थेसोबत त्याचा उत्तम समन्वय आहे. त्याचं सामाजिक कार्य उल्लेखनीय समजलं जातं. या सामाजिक कार्याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने त्यांची अकोला जिल्ह्याच्या खादी ग्रामोद्योग मंडळाचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. अकोलासारख्या विदर्भामधल्या एका भागातला तरुण, उद्योजक होण्याचं धाडस करतो, हेच खर्‍या अर्थाने मराठी तरुण उद्योजकतेकडे वळत आहेत, याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक शेतकर्‍याच्या मुलाने असं धाडस केलं तर उद्योजकता बहरेल. शेतकर्‍याच्या हाती पैसा येईल आणि कदाचित शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी होईल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.