सावध! ऐका पुढल्या हाका...

    दिनांक  01-Jun-2020 21:38:17
|

सावध! ऐका पुढल्या हाका...आपल्या या गगनव्यापी प्रेरणेमुळेच आपल्या अंगणात ठाकलेल्या प्रत्येक आव्हानांचा गड आपण लीलया पादाक्रांत करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण या प्रेरणेच्या पराक्रमाचं आभाळ किती भव्य असू शकतं, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे.आज वर्तमान परिस्थितीत आपल्याला एक सत्य निश्चित कळलेलं आहे की, एखाद्या बिकट परिस्थितीत ‘मी मी’ म्हणणार्‍या लोकांचेही कंबरडे पार मोडले आहे. तसे पाहता या जगात कोणीच पोलादी कणा घेऊन जन्मलेले नाही. आपल्याला ‘प्रयत्नांती परमेश्वर’ म्हणतच पाठ ताठ ठेवायची पराकाष्ठा करावी लागते. आयुष्यात अडथळे येतात आणि जातातही. काही खरेखुरे प्रामाणिक वीर आणि वीरांगना अडथळ्यांची शर्यत आयुष्यभर पार पाडत असतात. अडथळ्यांकडे पाठ फिरवून चालत नाही. त्याऐवजी आपण अडथळ्यांच्या डोळ्यांत डोळे घालून पुढे नक्की काय करावयाचे आहे, हे ठरविले पाहिजे. विघ्नं आपल्या वाटेत यायला लागली की आपल्याला काही केल्या जगायचेच आहे, ही भावना जोर धरायला लागते. त्यामुळे आपले धारिष्ट्य वाढायला लागते. कारण, सजीवतेतच अनेक सकारात्मक भावनाही जन्म घेतात. एकदा का आपलं धैर्य वृद्धिंगत व्हायला लागलं की, आपल्याला कठीण प्रसंगांना सामोरं जायची प्रेरणा मिळते व त्या प्रेरणेने आपण केवळ आपलं वैयक्तिक आयुष्यच नाही, तर आपल्या सभोवतालची परिस्थिती आणि पूर्ण जगालाच बदलायची दृष्टी आणि शक्ती आपल्यात निर्माण करतो. एकूण काय, आपण थोडे सजग असलो की, आपल्यासमोर उभी ठाकलेली विघ्नं आपल्याला भविष्यात येणार्‍या अनेक विघ्नांचा सामना करण्यासाठी सुसज्ज बनवितात. कोरोना विषाणूसुद्धा मानवजातीसाठी एक प्रचंड विघ्न या पृथ्वीतलावर घेऊन आलाय खरा, पण या विश्वाच्या आयुर्मयादेपुढे त्याचं अस्तित्व अल्पवयीन आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, त्याचे युद्ध मानवाच्या अफाट बुद्धिमत्तेशी आहे. या विषाणूने मानवाच्या बुद्धीलाच आव्हान दिले आहे आणि त्यात या विषाणूचा पाडाव निश्चित ठरलेला आहे. थोडं मानवाला सोसायचं आहे, वेदना सहन करायची आहे. पण, आपण भूतकाळातल्या मानवी दृष्टीकडे व त्याच्या शास्त्रीय प्रगतीकडे बारकाईने पाहिलं, तर मानव ‘कोविड-१९’ला पूर्ण निपचित करणार, यात कुणाला शंका नसावी.
आपल्या सगळ्यांना ध्येय हवी असतात. त्या ध्येयामुळेच आपण जे काही करू शकतो, ते एखाद्या अर्थपूर्ण मानवी सेवेसाठी समर्पित करण्यासाठी असते. मग ते शिवाजी महाराज असतो, अल्बर्ट आईन्स्टाईन असोत वा मार्टिन ल्यूथर किंग किंवा महात्मा गांधी असोत. जगात अविस्मरणीय आणि अचाट कर्तृत्व गाजविणार्‍या या व्यक्तींची ध्येयं जितकी विशाल होती, तितकीच त्यांनी सोसलेले अडथळेसुद्धा प्रचंड होते. पण, विश्वातल्या या महान व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला इतकं नक्की दाखवून दिलं की, आपण कुठल्या दिशेने वाटचाल करणार आहोत, याची जाण जेव्हा आपल्याला असते, तेव्हा समोर उभी ठाकलेली विघ्नं आपोआप छोटी व्हायला लागतात. आपल्याला त्यांच्यावर मात करता येण्याजोगी प्रेरणा उत्पन्न व्हायला लागते. मानवी प्रेरणा ही कुठल्याही संसर्गजन्य विषाणूच्या फैलावाला टक्कर देऊ शकेल, इतकी प्रचंड गतीची आहे. आपल्या या गगनव्यापी प्रेरणेमुळेच आपल्या अंगणात ठाकलेल्या प्रत्येक आव्हानांचा गड आपण लीलया पादाक्रांत करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण या प्रेरणेच्या पराक्रमाचं आभाळ किती भव्य असू शकतं, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे. एकदा का आपण ठरविले आणि सुनिश्चित केले की, या अमुक अमुक गोष्टी कुठल्याही परिस्थितीत आपण प्राप्त करायच्या आहेत, तर अचानक समोर उपस्थित झालेली सर्व विघ्नं तीळाएवढी होऊन जातात. आपण आपली पूर्ण ऊर्जा एकत्रित करून आपल्याला चढण्यासाठी आवश्यक असलेले डोंगराचे शिखर लिलया सर करतो.जेव्हा जेव्हा आपण आता या अमुक संकटापुढे हरणार आहोत, अशी आशंका आपल्याला येते, तेव्हा आपण काय करू शकतो? आपण लढाई सोडून तरी देतो व शक्कल वापरून ती लढाई विधायक तरी करू शकतो. जेव्हा सगळे हातातून सुटून चालले आहे, असे आपल्या लक्षात येते, तेव्हा पुन्हा एक नवीन युद्ध आपल्याला नव्या जोमाने सुरू करायला लागते. ज्यांचा आत्मा प्रेरित आहे, अशा सगळ्या व्यक्तींना सहज हार पचत नाही. आपल्या विधायक कल्पनांना वा विचारांना चालना देत ही माणसं नवी लढाई करतात, ती केवळ जिंकण्यासाठी. म्हणजे आपण कधीकधी हा प्रश्न स्वतःला जरूर विचारलाच पाहिजे की, ‘मी काही आणखी करू शकतो का? काही नवीन मार्ग या विघ्नातून शोधू शकतो का?’ कवी केशवसुतांच्या ‘तुतारी’ या कवितेतील आक्रमक व सकारात्मक शब्दांची आजच्या काळाला गरज आहे.
जुने जाऊद्या मरणा लागुनी
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
- डाॅ. शुभांगी पारकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.