नायकूचा खात्मा

    दिनांक  06-May-2020 21:41:52
|


riyaz naykoo_1  ज्या देशाच्या
, ज्या राज्याच्या, ज्या व्यवस्थेच्या सगळ्या सोयी-सुविधांचा लाभ घेतला, त्या सगळ्याच्या विरोधात जाऊन जिहादसारखा घातक पर्याय रियाझ नायकूने निवडला. परिणामी रियाझ नायकूचे शिक्षक वा चित्रकार असणे त्याला कोणत्याही गुन्ह्यातून मुक्त करु शकत नाही, उलट त्याची लायकी अशाप्रकारे बंदुकीच्या गोळ्यांच्या वर्षावात मयतीचीच होती.


जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा बलाच्या जवानांनी काम फत्ते करत हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड कमांडर-रियाझ नायकूचा मंगळवारी खात्मा केला. रियाझ नायकूला पकडून देणार्‍याला १२ लाखांचे बक्षीस देण्याची घोषणाही तत्पूर्वी सुरक्षा बलांनी केली होती. परंतु, सुरक्षा बलांनी लावलेल्या सापळ्यात तो अडकला आणि दहशतवादी व जवानांत झालेल्या चकमकीत त्याला ठार करण्यात आले. भारतीय लष्कर, राज्य राखीव पोलीस बल आणि राष्ट्रीय रायफल्सने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत रियाझ नायकूला मारण्यात आले. हंदवाडामध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा बलाच्या जवानांवर हल्ले केल्याचे समोर आले व त्याचा बदला रियाझ नायकूच्या रुपात घेतला गेल्याचेही म्हटले जात आहे. दरम्यान, रियाझ नायकू हा २०१६ साली यमसदनी धाडण्यात आलेल्या बुरहान वानीचा जवळचा सहकारी होता.बुरहान वानीला ठार मारण्यात आल्यानंतर रियाझ नायकूकडे हिजबुल मुजाहिद्दीनचे म्होरकेपण आले. तसेच झाकिर मुसा याने हिजबुल मुजाहिद्दीनपासून फारकत घेतली
, त्यानंतर संघटनेची बांधणी करण्याचे कामही रियाझ नायकू यानेच केले. जिहादच्या नावाखाली रियाझ नायकूने खोर्‍यातील तरुणांना आपल्या मागे उभे केले आणि काश्मीरचा पाकिस्तानमध्ये विलय या एका उद्देशासाठी त्यांच्याहाती बंदुका सोपवल्या. भारत सरकार, भारतीय लष्कर व पोलिसांविरोधात चिथावणी देत रियाझ नायकूने या तरुणांना लढण्यासाठी तयार केले आणि काश्मीर खोर्‍यात दहशतवादी घटना होत राहिल्या. सर्वसामान्यपणे दहशतवाद्यांची विघातक कारवाया प्रत्यक्षात आणण्याची पद्धत लपून, दडून हल्ले करण्याची, स्फोटक पदार्थांच्या साहाय्याने धमाका करण्याची आणि त्यातून दहशत माजवण्याची असते. परंतु, रियाझ नायकूने त्यापेक्षा आणखी एक निराळी पद्धती अंमलात आणली जी त्याआधी कोणीही वापरली नव्हती.रियाझ नायकूचा व्यवहार जशास-तसे असा होता आणि त्यानुसारच त्याने सुरक्षा बलांनाही त्रास द्यायला सुरुवात केली. काश्मीर खोर्‍यातील गेल्या
३० वर्षांच्या अस्थिर वातावरणात असे पहिल्यांदाच घडले. रियाझ नायकूच्या डोक्यातून अपहरण दिनयासारखी एक कल्पना निघाली आणि त्यानुसार हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी वागू लागले. अपहरण दिन म्हणजे, त्या दिवशी अपहरण करायचे. कोणाचे? तर पोलीस अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांचे! कधी? तर सुरक्षा बलांच्या कारवाईला बळी पडलेल्या दहशतवाद्याच्या अंत्यविधीदिनी! त्याआधी रियाझ नायकू पोलिसांना सरकारी सेवा सोडून देण्याचे आवाहनही करत असे. तसेच दहशतवाद्याचे दफन केले जात असताना बंदुकीची सलामी देण्याची कल्पनाही त्याने राबवली.पुढे त्याचवेळी पोलिसांच्या परिवारातील सदस्यांचे अपहरण करण्यात येई व हिजबुल मुजाहिद्दीन किंवा दहशतवादी संघटनेत दाखल झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये
, अशी धमकी त्याच्याकडून दिली जाई. २०१८ साली अशाप्रकारे ११ जणांचे अपहरण केल्याच्या घटना दक्षिण काश्मीरच्या चार जिल्ह्यांत झाल्या. तथापि, ३१ ऑगस्टला म्हणजे २४ तासांत त्यांना सोडून देण्यात आले. परंतु, यावेळी नायकूने एक ऑडिओ क्लिप पाठवली व त्यात असे म्हटले की, “आमच्या कुटुंबीयांना तुम्ही त्रास देणे चालूच ठेवले, तर यापुढे तुमच्या कुटुंबीयांना इजा केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही.नायकूचे असे करण्यामागचे हेतू स्पष्ट होते. पहिला म्हणजे आपण काहीतरी जगावेगळे करतो आहोत, असे दाखवून स्वतःची प्रतिमा तयार करणे, त्या प्रतिमेच्या आधाराने आणखी तरुणांनाही संघटनेत सामील करणे आणि पोलिसांच्या कुटुंबीयांचे अपहरण करुन भीती, दहशत पसरवणे. मात्र, रियाझ नायकूची ही संकल्पना निरुपयोगीच ठरली आणि पोलिसांत किंवा त्यांच्या कुटुंबीयांत भय पसरवण्याचा त्याचा कुटील डाव यशस्वी झाला नाही. ही अभिमानास्पद आणि कौतुकास्पद तसेच राष्ट्रहित सर्वोपरी सांगणारीच घटना म्हटली पाहिजे.उल्लेखनीय म्हणजे
, रियाझ नायकू हिजबुल मुजाहिद्दीनची पुनर्बांधणी करत असताना भारतीय सुरक्षा बलांनी दहशतवाद्यांना जहन्नुममध्ये धाडण्याचे कामही चालूच ठेवले. सुरक्षा बलांनी गेल्यावर्षी १६० दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर यंदा एप्रिलपर्यंत ५० दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा बलांना यश मिळाले. दहशत पसरवण्यासाठी कारवाया करणार्‍यांची दहशत मोडून काढण्याचे काम सुरक्षा बलांनी आपल्या दहशतवादविरोधी मोहिमेतून केले. आताही दहशतवादविरोधी मोहिमेवेळीच रियाझ नायकूला संपवण्यात आले.दरम्यान
, बुरहान वानीला यमसदनी धाडल्यानंतर देशविघात प्रवृत्तींनी एका अजेंड्यांतर्गत एक मोहीम चालवली, ती म्हणजे हेडमास्तरचा मुलगा! बुरहान वानी शाळेतील मुख्याध्यापकाचा मुलगा असल्याचे कानीकपाळी ओरडून सांगताना लोकांच्या मनात त्याच्याविषयी सहानुभूती, आपुलकी निर्माण व्हावी, असा त्यांचा उद्देश होता. तसाच प्रकार रियाझ नायकूच्या मृत्यूनंतरही चालू झाला, होत आहे किंवा आणखी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. रियाझ नायकू हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील होण्याआधी शाळेत अत्यंत हुशार होता, त्याला अभियंता व्हायचे होते, परंतु, काही कारणाने ते शक्य झाले नाही. पुढे तो गणिताचा शिक्षक म्हणून शाळेत रुजू झाला आणि रियाझ नायकूला प्रेमाचे प्रतीक असलेली गुलाबाची फुले चितारण्याची आवड होती, असे पसरवले गेले आणि आताही त्याच्यासंबंधाने तसे लिहिले जात आहे. मात्र, त्याचे पूर्वाश्रमीचे आयुष्य कसेही असले तरी त्याने दहशतवादी म्हणून केलेली कृत्ये न्याय्य किंवा समर्थनीय ठरत नाहीत. उलट त्याने हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये जात जम्मू-काश्मीरचे गणित बिघडवण्याचाच उद्योग केला.प्रेमाऐवजी द्वेष
, घृणा आणि धर्मवेडापायी जम्मू-काश्मीरची भूमी रक्तरंजित करण्याचेच पाप केले. ज्या देशाच्या, ज्या राज्याच्या, ज्या व्यवस्थेच्या सगळ्या सोयी-सुविधांचा लाभ घेतला, त्या सगळ्याच्या विरोधात जाऊन जिहादसारखा घातक पर्याय निवडला. परिणामी, रियाझ नायकूचे शिक्षक वा चित्रकार असणे त्याला कोणत्याही गुन्ह्यातून मुक्त करु शकत नाही, उलट त्याची लायकी अशाप्रकारे बंदुकीच्या गोळ्यांच्या वर्षावात मयतीचीच होती. तसेच विद्यमान केंद्र सरकारने दहशतवाद्यांबद्दल झिरो टॉलरन्सनीतिचा अंगीकार केलेला आहे आणि त्यातून नेतृत्वाचा खमकेपणाही दिसतो. मुख्य प्रवाहापासून दूर जाऊन कोणी दहशतवादाच्या मार्गाने देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार असेल तर त्याची अशीच गत होणार, याचा संदेशही यातून मिळतो. म्हणूनच कोणीही रियाझ नायकूबद्दल सहानुभूती किंवा आपुलकीची भावना तयार करण्यासाठी तशी माहिती पसरवण्याची अजिबात गरज नाही. तसेच अशाप्रकारची माहिती पसरवणार्‍यांची अवस्था इथली राष्ट्रप्रेमी जनता तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, अशी करुन टाकेल, हेही सांगितलेले बरे. जशी बुरहान वानीबद्दल पान्हा फुटणार्‍यांची झाली!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.