मृत कोरोना योद्ध्यांच्या वारसांना बेस्टमध्ये कायमस्वरूपी सेवेची संधी

    दिनांक  16-May-2020 16:56:06
|

best_1  H x W:
मुंबई : कोरोनाशी झुंज देताना मृत पावलेल्या बेस्ट उपक्रमाच्या चार कामगारांच्या वारसांना बेस्टमध्ये नोकरी देण्यात आली आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी तसे अधिकृतपणे जाहीर केले आहे. कोरोनाशी लढा देताना आत्तापर्यंत सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी चौघांच्या वारसांना बेस्टमध्ये कायमस्वरूपी सेवेची संधी देण्यात आली आहे. इतर तीन कामगारांच्या वारसांनाही लवकरच बेस्टमध्ये सामावून घेण्यात येईल, असे सुरेंद्र बागडे यांनी जाहीर केले आहे.


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. कधीही न थांबणारी, घड्याळाच्या काट्याप्रमाणे २४तास धावणारी मुंबई लॉकडाऊनमुळे जिथल्या तिथे ठप्प झाली. फक्त अत्यावश्यक सेवेचे कर्मचारीच जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना इच्छित स्थळी पोहोचविण्याचे काम बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाचे कर्मचारी (चालक-वाहक) करीत आहेत. बेस्टच्या सर्व विभागांचा त्यात सहभाग आहे. त्यामुळेच लॉकडाऊनच्या काळातही मुंबईकरांना सेवासुविधा मिळत आहेत. मुंबईची एक लाईफ लाईन ठप्प असली तरी गल्लोगल्ली पोहोचणारी दुसरी लाईफलाईन (बेस्ट) जीवावर उदार होऊन सेवा बजावत आहे.


मुंबईत कोरोनाचा कहर असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दररोज दीड ते दोन हजार बसेस रस्त्यावर धावत आहेत. तितकेच चालक-वाहक जीवावर उदार होऊन सेवा बजावत आहेत. मात्र अपुऱ्या सोई-सुविधांमुळे चालक-वाहकानाही कोरोनाची लागण होत आहे. आतापर्यंत बेस्टच्या १०८कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून अनेकांनी त्यावर मात केली. मात्र दुर्दैवाने सात कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे. सर्व कामगार संघटनांनी त्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक विचार करून बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना बेस्टमध्ये कायमस्वरूपी सेवेची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न आहे. मात्र उपाययोजना करूनही काही कर्मचाऱ्यांचे दुर्दैवाने निधन झाले आहे.या कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेत सामावून घेऊन त्यांना कायमस्वरूपी आर्थिक आधार देण्यात येत आहे. अद्यापपर्यंत ४ मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना उपक्रमाच्या सेवेत नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत उर्वरित मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना लवकरच उपक्रमाच्या सेवेत दाखल करून घेण्यात येत आहे.
-सुरेंद्रकुमार बागडे

महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.