कोरोनाची लक्षणे असता मी मदतकार्यात उतरलो, तुम्ही ही चूक करू नका : जितेंद्र आव्हाड

    दिनांक  11-May-2020 18:43:23
|
JItendra Awhad _1 &n
 

 
 


मिलिंद नार्वेकरांनी पाहिली आव्हाडांची सर्व व्यवस्था

 
ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाच्या लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष केले होते. असे असूनही स्वतःसह आपल्या कार्यकर्ते आणि पोलीसांच्या जीव धोक्यात घालून मदतकार्यातही पुढे राहिले. मुंब्रा या त्यांच्या विधानसभा क्षेत्रात अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आपल्याला काहीही होणार नाही या भ्रमात राहिल्यानंतर आता त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप होत असल्याचे त्यांनी स्वतःच कबुल केले आहे. 
 
 
 
जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली आहे. प्रकृती ठिक झाल्यानंतर त्यांनी सर्वांचे आभार तर मानलेच परंतू, कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने किती मोठा धोका पत्करावा लागला याचीही कबुली दिली आहे. कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. जितेंद्र आव्हाड मुलूंड येथील फोर्टीस रुग्णालयात भरती होते. त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. मात्र, तरीही ते आपल्या घरीच क्वारंटाईन राहणार आहेत. 
 
 
२३ एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिथे काही दिवस त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले. घरी आल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन तकेले आहे. त्यांनी कोरोना संदर्भात केलेली चूक कोणीही करू नये. मी कसाबसा या महामारीतून बचावलो आहे, कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याचे हे फळ आहे, असे त्यांनी म्हटले."मी कोरोनाची चाचणी केली होती. रिपोर्ट निगेटीव्ह आली होती. यानंतर मी निश्चिंत झालो होतो. मात्र, मला पुन्हा ताप येत असल्याचे जाणवत होते. मला वाटले साधा ताप आहे, तो आपोआप बरा होईल. मात्र, याच चुकीची मोठी किंमत मोजावी लागली. वेळीच डॉक्टरांकडे जायला हवे होते. कोरोनाची लक्षणे आढळल्यास प्रशासनाच्या तातडीने निदर्शनास आणून द्यायला हवे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते."
 
आव्हाड यांनी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मुख्ममंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही आभार मानले. उद्धव ठाकरेंचे जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर यांनी आव्हाड यांची संपूर्ण व्यवस्था केली होती. एका परिवारातील सदस्याप्रमाणे सर्वांनी मला सांभाळले, अशा भावना आव्हाड यांनी व्यक्त केल्या आहेत. आव्हाड म्हणाले, "आता मला अशक्तपणा जाणवत आहे. कोरोनाशी लढणाऱ्या व्यक्तीला मानसिक आधाराची जास्त आवश्यकता आहे." आव्हाडांसह अन्य १६ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यांच्या दिमतिला पाच पोलीस कर्मचारीही होते. सफाई कर्मचारी, बंगल्यावर कार्यरत असणारे कर्मचारी यांच्यासह ठाण्यातील एका माजी नगरसेवकालाही क्वारंटाईन करण्यात आले होते.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.