‘फुटाणे’ मार्गाने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2020
Total Views |
CM Uddhav Thackery in Mah


 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची म्हणून एक आब आहे, ती राखण्यासाठी तरी उद्धव ठाकरे यांनी लोकांमधून निवडून येण्याचा प्रयत्न तरी करावा. आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेतच!

विदेशी सांभाळत

स्वदेशीला टाळू लागले

पेग मारताच विन मानणारे

पेंग्विन पाळू लागले

 

रामदास फुटाणेंच्या या कवितेचा सोनिया गांधी मूळ विदेशी असण्याशी, शिवसेनेने भाजपला टाळण्याशी किंवा राणीच्या बागेतल्या पेंग्विनशी मुळीच संबंध नाही. मात्र, ही चक्रम कविता आता आठविण्याचे कारणही तसेच चक्रम आहे. महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याचे मुख्यमंत्री आता त्याच मार्गाने विधान परिषदेत पोहोचणार आहेत, ज्या मार्गाने या कवितेचे कवी रामदास फुटाणे पोहोचले होते. म्हणजे, किमान त्यांचे तसे प्रयत्न तरी चालू आहेत. तसा प्रस्ताव महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने पारीत करून राज्यपालांकडे पाठविला आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपालांनी नियुक्त करून काही मंडळींना पाठविण्याची तरतूद आहे. ही तरतूद घटनात्मक असली तरी या तरतूदीमागचा उद्देश वेगळा आहे.

 

राजकीय सोय’ लावण्यासाठी ही तरतूद केलेली नाही. यशवंतरावांच्या काळात ‘गीतरामायण’ लिहिणारे ग. दि. माडगूळकर अशा प्रकारे विधान परिषदेत आमदार होते. शरद पवारांच्या काळात वर उल्लेख केलेले रामदास फुटाणे, तर रानातल्या कविता लिहिणारे ना. धों. महानोर विधान परिषदेवर राज्यपालांच्या माध्यमातून आले होते. नाही म्हणायला उद्धव ठाकरेच काय सगळेच ठाकरे परिवारातले सदस्य कुठल्या ना कुठल्या ‘कलां’मध्ये पारंगत आहेतच. अगदी आदित्य ठाकरेंचाही एक कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. पण, त्याचा अर्थ ठाकरे पितापुत्रांना ‘कलावंत’ म्हणून मान्यता देऊन राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे सदस्यपद दिले जावे, असे मुळीच नाही.

 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले, हा जसा एका चमत्कारिक पेच आहे, तसाच आता त्यांच्या सदस्यत्वाचाही पेच आज निर्माण झाला आहे. आज कोरोनामुळे चमत्कारिक स्थिती निर्माण झालेली असली तरी त्यापूर्वी आपल्या एखाद्या खंद्या कार्यकर्त्या आमदाराला सांगून त्याचा राजीनामा घेऊन ते तिथून निवडून येऊ शकत होते. चिरंजीव आदित्यच्या बाबतीतही त्यांनी तेच केले. आदित्य निवडून येण्याबाबत त्यांना इतकी खात्री होती की, त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या सचिन अहिरांना त्यांनी ‘सेनावासी’ करून घेतले होते. सुनील शिंदे नावाच्या आमदाराला त्यासाठी सन्मानाने घरी बसविण्यात आले आणि आदित्य ठाकरे विधानसभेसाठी मार्गस्थ झाले.

 

उद्धव ठाकरे दादरहून निवडून येतील, असाही प्रचार मध्यंतरीच्या काळात केला गेला होता. मात्र, गेल्या सहा महिन्यांत तो निर्णयही त्यांना घेता का आला नाही? एरवी ‘युद्ध’, ‘लढाई’, ‘भोंगे’ असल्या शब्दांच्या फटाक्यांच्या माळांच्या माळा पेटविणार्‍या मुख्यमंत्री आणि त्यांच्या राऊतांनी कुठल्यातरी आमदाराला गाठून त्याच्या पक्षनिष्ठेची परीक्षा घ्यायला हरकत नव्हती. मात्र, तेही जमलेले दिसत नाही. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे दिल्लीहून धाडलेले मुख्यमंत्री. मात्र, पृथ्वीराज बाबाही मुख्यमंत्री झाल्यावर विधान परिषदेवर सहा महिन्यांच्या कालावधीत निवडून आले होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यावर अशा प्रकारे निवडून येण्याचीही संधी होती. मात्र, तिथेही ते निवडून आले नाहीत आणि आता ते अशा मार्गाने आपले मुख्यमंत्रिपद टिकवू पाहात आहेत.

 

आज कोरोनाच्या संकटाची ढाल करून ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंसाठी वातावरणनिर्मिती केली जात आहे, त्याला तोड नाही. वस्तुत: ‘कॅरम खेळा, पत्ते खेळा’ अशा खुमासदार गप्पा मारणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदाही काही ठोस माहिती घेऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेले नाहीत. लहानशा राज्याचे मुख्यमंत्रीही यावेळी अत्यंत प्रगल्भतेचे दर्शन घडवित आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आपल्या डॉक्टरांशी संवाद साधत असतात. सरकार काय काय करते आहे, याची आकडेनिहाय माहिती देत असतात. अरविंद केजरीवालदेखील ज्याप्रकारे पत्रकार परिषद घेत असतात, त्यातही आपण करीत असलेल्या कामांची ते तपशीलवार माहिती देतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र ‘युद्ध’, ‘भोंगे’ असले काही तरी शब्द वापरून ‘सामना’चे अग्रलेख पाडत असल्याप्रमाणे गप्पांत रंगलेले असतात.

 

हे अन्य काही नसून ‘राजकीय टाईमपास’ आहे. स्वत: मैदानावर उतरून एकही निवडणूक न लढविलेल्या व्यक्तीकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? ज्या शरद पवारांच्या व्यूहरचनेने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, त्या पवारांचा आदेश तरी त्यांनी ठेवायला हवा होता. पवारांनी मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठी केलेल्या कुरापतींवर एक वेगळा अग्रलेख होऊ शकतो. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी त्यावर समर्थन करणारा उत्तम युक्तिवादही केला आहे. इतके सारे करूनही आपला बारामती हा जगप्रसिद्ध मतदारसंघ मात्र त्यांनी पक्का बांधला. त्यात कुठलीही हयगय किंवा हलगर्जीपणा केलेला नाही. मुख्यमंत्रीपदासाठी लाचार न होता अन्य कुणालाही तिथे बसविण्यासाठी लागणारा बिनधास्तपणा हा बाळासाहेबांचा धाडसी निर्णय महाराष्ट्राने पाहिला.
 

बिनधास्तपणा अशासाठी की, राजकारणात जेव्हा तुम्ही असे काही करता, त्यावेळी तोच माणूस राजकीयदृष्ट्या मोठा होऊन तुमच्या डोक्यावर बसण्याची भीती असते. पण, नेता जेव्हा बाळासाहेबांसारखा जबरदस्त असतो, तेव्हा तो अशा भयगंडाने पछाडला जात नाही. उद्धव ठाकरेंसमोरची दुसरी भीतीही अशीच आहे. आज त्यांनी आदित्य ठाकरेंना जरी आपल्या जागी काही काळापुरते का होईना मुख्यमंत्री केले, तरी शिवसेनेतनूच पुढचा ‘ज्योतिर्रादित्य सिंधिया’ बाहेर पडू शकतो. तसे एक-दोन ‘ज्योतिर्रादित्य सिंधिया’ भाजपच्या संपर्कात कायमच होते. आता त्या दोघा-तिघांनाही नीट सांभाळण्याची कसरत करीतच हे सरकार चालू आहे. मोठ्या इमारतीला रंग लावण्यासाठी बांबूची परात बांधली जाते, तसे आज महाराष्ट्राचे सरकार उभे आहे. पण, ती परात नसून तीच मूळ इमारत आहे, असे सांगण्याचे प्रयोग सध्या सुरू आहेत.

 

जोपर्यंत काथ्या सुतळीने बांधलेले त्याचे जोड मजबूत आहेत, तोपर्यंत ही परात उभी राहाणार. माध्यमांतल्या काहींनाही हे सरकार टिकलेले हवे आहे. कारण, त्यांना या सरकारविषयी प्रेम नसून भाजपचा मुख्यमंत्री ही त्यांची मूळ पोटदुखी आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे वाढत असतानाही ‘महाराष्ट्राचे सरकार चांगले काम करीत आहे’ असे तुणतुणे सारखे वाजतच असते. उद्धव ठाकरे हे काही आमच्या विचारांचे मुख्यमंत्री नाहीत. त्यांचे खासदार-आमदार बाळासाहेबांच्या सोबतीने मोदी व फडणवीसांचे फोटो लावूनच निवडून आले आहेत. आजच्या स्थितीत मात्र ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मग ते कुठल्या का मार्गाने का असे ना! मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची म्हणून एक आब आहे ती राखण्यासाठी तरी उद्धव ठाकरे यांनी लोकांमधून निवडून येण्याचा प्रयत्न तरी करावा. आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेतच!

 
 
@@AUTHORINFO_V1@@