आर्य स्थलांतराच्या सिद्धांताचे ढोबळमानाने स्वरूप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2020
Total Views |


Arya_1  H x W:



पाश्चात्त्यांनी मांडलेल्या या ‘आर्य स्थलांतर किंवा आक्रमण’ सिद्धांताचे (AIT / AMT) स्वरूप नेमके काय आहे, हे अजून जरा तपशीलवार समजून घ्यावे लागेल. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून तसेच इराणच्या परिसरातून हे आर्य लोक भारतात आले, असे संशोधन त्यांनी मांडलेले तर आहेच. त्याला जोडून काही इतरही संशोधने त्यांनी मांडलेली आहेत आणि त्याद्वारे आपली बाजू भक्कम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचे स्वरूप अगदी ढोबळमानाने आणि थोडक्यात या लेखात आपण समजून घेऊ.


वाङ्मयीन आणि भाषाशास्त्रीय (Linguistics) निष्कर्ष


ऋग्वेदातल्या काही देवतांच्या वर्णनांवरून हे आगंतुक आर्य दिसायला कसे होते, बोलायला कसे होते, स्वभावाने कसे होते, हे ही त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या मते ते आर्य लोक दिसायला गोरे, उंच, धिप्पाड, घार्‍या डोळ्यांचे, धारदार/सरळ नाक असलेले असे होते. ते युद्धशास्त्रात प्रवीण होते, आक्रमक वृत्तीचे होते. ते बहुधा घोड्यावर बसूनच सगळीकडे फिरत. मोहेंजोदरो, हडप्पा, वगैरे सप्तसिंधूंच्या प्रदेशात ते जेव्हा आक्रमणे करायला गेले, तेव्हाही ते असेच घोड्यावरूनच गेले. त्याच्या आधी त्या प्रदेशात घोडेच नव्हते! आर्यांनीच ते तिथे प्रथम नेले. ते अग्नीची पूजा करत, निसर्गात आढळणार्‍या विविध गोष्टींना देवता मानून त्यांचीही ते पूजा करत. त्यांची भाषा संस्कृतप्रमाणे होती. ती भारतीयांच्या वेद वगैरे प्राचीन साहित्यातल्या भाषेशी मिळतीजुळती होती, पण आजची संस्कृत भाषा जशी आहे, तशी मात्र नव्हती. इतकेच नाही, तर ती पर्शियन, इंग्लिश, लॅटिन, गोथिक, ग्रीक, इत्यादी युरोपीय आणि मध्य आशियन भाषांशीदेखील मिळतीजुळती होती. कारण, ते आर्य तिथूनच तर आलेले होते ना! हे आक्रमण अथवा स्थलांतर सुमारे इ. स. पूर्व 1800 ते 1500 च्या दरम्यान कधीतरी झालेले असावे, असा काळाचादेखील निष्कर्ष या संशोधनात काढला गेला आहे.



पुरातत्त्व (Archaeology) आणि उत्खननातील निष्कर्ष


पाश्चात्त्य विद्वानांनी असेच अजूनही काही रसभरीत निष्कर्ष यातून काढलेले आहेत. जसे की, मागच्या लेखात वर्णन केल्याप्रमाणे देवांचा राजा इंद्र - म्हणजेच ‘पुरंदर’ याने जी नगरे फोडली आणि तेथील संपूर्ण संस्कृतीच उद्ध्वत करून टाकली, तीच पुढे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सिंधू नदीच्या काठी केलेल्या उत्खननात आढळून आली. तिथे काही लोकांचे मृतदेहसुद्धा दफन केलेल्या स्थितीत मिळाले, ते आर्यांनी ठार मारलेल्या तिथल्या स्थानिक लोकांचेच असणार! तिथे अनेक मुद्रा (Seals) मिळाल्या. पण, त्यात वैदिक देवदेवता, यज्ञ-याग, चालीरीती यांचा काहीच मागमूसदेखील मिळत नाही. गंमत म्हणजे, त्यात काही वन्य प्राण्यांच्या छबी दिसतात, पण फक्त घोड्याच्याच तेवढ्या नाहीत! आणि वेदांमध्ये मात्र घोड्याची वर्णने अनेक ठिकाणी सर्रास दिसतात. तीच गोष्ट रथांचीही. सिंधू-मुद्रांवर रथ दिसत नाहीत. पण, वैदिक साहित्यात मात्र रथ काही ठिकाणी आहेत! त्या मुद्रांवर एका गूढ लिपित काहीतरी लिहिलेले दिसते खरे. पण वेदमंत्र म्हणावेत, इतपत मात्र ते मोठे लिखाण वाटत नाही. तात्पर्य काय तर त्या सर्व मुद्रा, मृतदेह आणि इतर वस्तू या आर्यांच्या आक्रमणाच्या आधीच्या काळातल्या असाव्यात. आर्यांनी सिंधू नदीच्या प्रदेशात आक्रमण करून तो प्रदेश जिंकल्यावर पुढचा काळ मात्र बराच शांततेचा गेलेला असावा. त्यामुळे या पुढच्या शांततेच्या काळातच वेदांची निर्मिती झालेली असावी. त्याचमुळे वेदांमध्ये घोडे दिसतात, पण सिंधूकाठच्या या नगरांमध्ये मात्र घोड्याचे अवशेष दिसत नाहीत, असा निष्कर्ष या पुरातत्त्ववेत्त्यांनी सांगितलेला आहे.


article_1  H x


 


पाश्चात्त्यांचा कालानुक्रम (
Chronology)


वर म्हटल्याप्रमाणे जर हे आर्यांचे आक्रमण इ. स. पूर्व 1800 ते 1500च्या दरम्यान कधीतरी झालेले असेल, तर वेदांचा काळ साहजिकच त्याच्या नंतरचा ठरतो. याला आधार मानून पुढे अशाच प्रकारे भारतीय इतिहासातल्या इतर काही संशोधनांमधून विविध पाश्चात्त्य संशोधकांनी आणि विद्वानांनी भारतातल्या विविध घटनांचा, व्यक्तींचा, काळ ठरविलेला आहे. त्याच्या तपशीलात जाणे आत्ता इथे अप्रस्तुत होईल. पण, त्याचा एकूण गोषवारा मांडायचा झाल्यास त्या सर्व घटना आणि व्यक्ती पाश्चात्त्य संशोधनानुसार काळाच्या रेषेवर काहीशा अशा दिसतात-


article_1  H x

या संशोधनातून आलेले निष्कर्ष प्रत्यक्षात इतर अनेक शास्त्रीय कसोट्यांवर फोल ठरतात. त्यांच्या बाबतीत अनेक प्रतिप्रश्न अनेक अभ्यासकांनी उभे केलेले आहेत. ते काही अनुत्तरितच राहिलेले आहेत, तर काहींची उत्तरे वादग्रस्त आहेत. आज अनेक भारतीय अभ्यासक, विद्वान मंडळी या क्षेत्रात संशोधनात पुढे आलेली आहेत. त्यांनी यापैकी एकेक विषयाचा एकेक पैलू घेऊन त्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि अथक परिश्रम घेऊन संशोधन केलेले आहे. त्यासाठी त्यांनी भाषाशास्त्र (Linguistics), पुरातत्त्वशास्त्र (Archaeology), जनुकशास्त्रातील (Genetics) DNAच्या प्रसाराविषयक संशोधन, मानववंशशास्त्र (Anthropology), समुद्रविज्ञान (Oceanography), भू-जलशास्त्र (Hydrology), भूविज्ञान (Geology), खगोलविज्ञान (Astronomy) इत्यादी अनेक उपलब्ध ज्ञानशाखांचा आधार घेतलेला आहे. त्यातून आर्यांचे हे तथाकथित स्थलांतर आणि कालानुक्रम या दोन्ही अंगांनी तर्कशुद्ध मांडणी केलेली आहे. त्याद्वारे वर दिलेल्या खोडसाळ चर्चेतले बहुतेक सर्वच मुद्दे प्रतिवाद होऊन निकाली निघालेले आहेत. कसे, ते आपण प्रथम असेच ढोबळमानाने पुढच्या लेखात, आणि एक-एक करून अधिक तपशीलात जाऊन त्यापुढच्या लेखांमध्ये क्रमश: पाहू.



(क्रमश:)


-
वासुदेव बिडवे

(लेखक भारताचे प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान - अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@