३१ मार्चपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद : उद्धव ठाकरे

    दिनांक  20-Mar-2020 13:52:15
|
UddhavThackeray _1 &बस, रेल्वे सार्वजनिक वाहने सुरूच

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही ५२वर पोहोचली असून आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. खबरदारी घेण्याचा उपाय म्हणून जीवनावश्यक सेवा वगळता मुंबई महानगरप्रदेशातील सर्व कार्यालये, ऑफीस, दुकाने आणि आस्थापने बंद राहणार असल्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिद्वारे जनतेशी संवाद साधला. जनतेने अजूनही खबरदारी घेण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "कोरोनारुपी महामारीशी लढण्यासाठी सरकार म्हणून आपण सज्ज आहोतच. मात्र, जनतेने या आजाराशी लढणे आता गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. सर्वांनी घरी थांबून या आजाराशी लढा देणे गरजेचे आहे, ही सुट्टी नाही आपण स्वतःवर शिस्तबद्द पद्धतीने घातलेले निर्बंध आहेत. त्यामुळे त्याचे काटेकोरपणे पालन पुढील काही दिवस करणे गरजेचे आहे."

राज्य सरकार आणि पालिका कार्यालयात आता केवळ २५ टक्के कर्मचारी उपस्थित असतील. तसेच ज्या ज्या खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुटी जाहीर केली आहे, त्या सर्वांना किमान वेतन मालकांनी द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी घेतले. 

 
बॅंका सुरू राहणार


कोरोनाशी लढा देत असताना अत्यावश्यक सेवांपैकी एक असलेल्या बॅंका सुरूच राहणार आहेत. कोरोनाचे संकट निघून गेल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न हा आर्थिक विषयांचा निर्माण होणार आहे. त्यादृष्टीनेही पाऊले उचलण्याची सरकार तयारी करत आहे, अशी माहीती मुख्यमंत्र्यांनी दिली.
 

लोकल सेवा सुरूच राहणार
मुख्यमंत्री म्हणाले, "मुंबई महानगरातील लोकल आणि बस सेवा या मुंबईकरांच्या जीवनवाहिन्या आहेत. त्यामुळे या सेवा बंद करून मुंबईतील जीवनावश्यक सेवा ठप्प पडू द्यायची नाही. मुंबईतील रुग्णालये, पालिका कर्मचारी आणि इतर जीवनावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकल सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यकता नसेल तर लोकल प्रवास हा टाळलाच पाहीजे."
 
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद


राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता गर्दीला कारणीभूत ठरणारी सर्व दुकाने, आस्थापने, कार्यालये आणि इतर संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्व खासगी कंपन्या बंद ठेवण्याचे आवाहनही राज्य सरकारने घेतला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.