१०० कोटींच्या राखेतून फिनिक्स झेप घेणारा नवानी उद्योगसमूह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2020   
Total Views |
nanvani_1  H x



तो अवघा दोन वर्षांचा असताना आईच्या मायेचं आभाळच हरपलं. लहान भाऊ तर अवघ्या सहा महिन्यांचा होता. मोठा भाऊ छोट्यासाठी आईच जणू बनला. मायेने काळजी घेऊ लागला. कोणतीही गोष्ट घेतली तर दोन घेणार, एक भावाला अन् मग स्वत:ला. हा मुलगा मोठा झाला, शिकला. उद्योजक बनला. भावालासुद्धा त्याने उद्योजक बनवले. एका टप्प्यावर मोठी झेप घेण्याच्या जिद्दीत त्याने १०० कोटी रुपयांचं चक्क जहाज विकत घेतलं. मात्र २००८ सालच्या आर्थिक वादळात ते जहाज सापडलं अन् बुडालं. पुन्हा तो उद्योजक शून्यावर आला. भावाच्या मदतीने पुन्हा नव्याने सुरुवात केली. आज त्यांचा उद्योग ३० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल करत आहे. ही कथा आहे उद्योगविश्वातील अशोकाची. नवानी ग्रुपचे अशोक नवानी यांची.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. पण हे स्वातंत्र्य मिळालं ते फाळणीच्या दु:खासोबत. या फाळणीत सगळ्यात जास्त होरपळला तो सिंधी समाज. पाकिस्तानातील सिंध प्रांतात आर्थिकदृष्ट्या गब्बर असणारा हा समाज फाळणीनंतर मात्र भारतात वंचितांचं जिणं जगू लागला. भारत सरकारने सिंधी निर्वासितांसाठी उल्हासनगर येथे निर्वासित छावण्या उभारल्या. या छावणीत पाकिस्तानातून आलेला १७ वर्षांचा पारुमल आपल्या बहिणींसोबत राहू लागला. तिथेच तो शिकला. मोठा झाला. पदवीधर झाल्यावर एअर इंडियामध्ये नोकरीस लागला. त्याचवेळी देवी नावाच्या सुविद्य मुलीसोबत पारुमलचा विवाह झाला. त्यांना दोन मुलं झाली. अशोक अन् विनोद. मात्र नियतीला हे सुख मानवलं नाही. देवीचं अकाली निधन झालं. तेव्हा अशोक दोन वर्षांचा होता तर विनोद अवघ्या सहा महिन्यांचा.

आईचं मातृत्व हरपल्याने अशोक आणि विनोदमध्ये मायेचे बंध कमालीचे जुळले. आज साठीमध्ये असतानासुद्धा हे दोन्ही भाऊ स्वत:साठी कोणतीही वस्तू घेताना आपल्या भावाचा विचार करतात, ते या मायेमुळेच बहुधा. १९८१ साली अशोकने पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर एका विकासकाकडे नोकरी करण्यास सुरुवात केली. अशोकची मेहनत आणि कौशल्य पाहून त्या विकासकाने अशोकला भागीदार बनविले. वसई-विरारच्या परिसरात नुकताच औद्योगिक पट्टा आकारास येत होता. तेथील गाळे बांधण्याचे काम त्यांची कंपनी करू लागली. बांधकाम व्यवसायात आल्याने अनेक बांधकाम व्यावसायिकांसोबत ओळखी झाल्या होत्या. त्यांना सिमेंटची गरज असायची, हे ओळखून अशोकने आपल्या भावाला सिमेंट उद्योगात आणले. विनोद आता सिमेंटचे वितरण करू लागला. एसीसी सिमेंट, एल अ‍ॅण्ड टी, नर्मदा सिमेंट अशा सर्वोच्च सिमेंट उत्पादक कंपनीसोबत काम केल्याने भारतीय सिमेंट बाजारपेठेत ते एक प्रमुख सिमेंट वितरक बनले.

हे वितरण करत असताना एका सिमेंट उत्पादकाने ट्रान्सपोर्ट तुम्हीच का नाही करत, असे विचारले. इथेच ट्रान्सपोर्टेशनच्या व्यवसायाची मुळं रुजली. रत्नागिरी ते मुंबई असा सिमेंट परिवहनाचा प्रवास पुढे महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशाच्या सीमा पादाक्रांत करू लागला.

२००८ मध्ये जागतिक पातळीवर झेप घ्यायची, या उद्देशाने अशोक नवानी आणि विनोद नवानी यांनी २५ हजार टन आकाराचं, तब्बल १०० कोटी रुपयांचं एक मोठ्ठं जहाज विकत घेतलं. संयुक्त अरब अमिरात मध्ये लॉजिस्टिकचं कार्यालय थाटलं. २००८ मध्ये लेहमन ब्रदर्समुळे जागतिक मंदीची लाट आली आणि या लाटेत हे जहाज गटांगळ्या खाऊ लागलं. दरम्यान, सिमेंटच्या वितरकांनीदेखील जागतिक मंदीमुळे व्यवसाय करण्यास असमर्थता व्यक्त केली. पैशाची टंचाई असल्याने बांधकाम व्यवसायाला फटका बसला. शेवटी नाईलाजास्तव नवानी बंधूंना हे जहाज विकावं लागलं. पुन्हा शून्यावर हे बंधू आले. मात्र, राम-लक्ष्मण हे भाऊ जंगलात राहूनसुद्धा सोन्याची लंका जिंकू शकले ते निव्वळ जिद्दीमुळे. हीच जिद्द या दोघा भावांमध्येसुद्धा होती आणि सोबत होता अशोक नवानी यांचा सिव्हिल इंजिनिअर झालेला मुलगा मोहित.

बाजारपेठेत इतके वर्ष सचोटीने केलेल्या उद्योगामुळे एक गुडविल होतं, ते कामाला आलं. पुन्हा उद्योग उभा राहिला. आज नवानी ग्रुपकडे ७० ट्रक आहेत. सोबत ते वीज प्रकल्पांमध्ये तयार होणार्‍या राखेचं वितरण करतात. ही राख बांधकाम व्यवसायात वापरली जाते. सोबत बांधकाम व्यवसायसुद्धा जोमाने सुरू आहे. भिवंडीमध्ये सध्या नवानी समूहाचा भलामोठ्ठा लॉजिस्टिक पार्क आकारास येत आहे. विनोद नवानी यांचा मुलगा श्रवण अमेरिकेहून कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर पदवी मिळवून आता घरातील व्यवसायास हातभार लावत आहे.

सध्या नवानी समूहाची वार्षिक उलाढाल ३० कोटी रुपयांची असून ३०० हून अधिक लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ते रोजगार देत आहेत. अशोक आणि विनोद नवानी हे खर्‍या अर्थाने आधुनिक उद्योगविश्वातील राम-लक्ष्मणाची जोडी आहे.

@@AUTHORINFO_V1@@