‘व्य’ची व्यथा

    दिनांक  17-Oct-2020 22:11:19
|

art_1  H x W: 0

कलेच्या प्रांतातून व्यसनाधीनता आणि व्यभिचार यांना आळा घालण्यासाठी कलेच्या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांबरोबरच, राजकीय इच्छाशक्ती आणि शैक्षणिक धोरण याची जोड ही तितकीच महत्त्वाची आहे, तरच कलेला लागलेल्या ‘व्यभिचार’ आणि ‘व्यसनाधीनता’ या दोन किडी बर्‍याच प्रमाणात नष्ट होतील.


‘व्य’ची व्युत्पत्ती व्यक्त होण्यासाठी झाली. माणूस, व्यक्त होता होता आपण एक अशी व्यक्ती बनलो, जिला स्वतःचे असे एक अस्तित्व आहे. कलागुण, स्वतःचे विचार अशा अनेक आपल्यामधीलच आविष्कारांची आपल्याला जाणीव होऊ लागली आणि त्या जाणिवेतून ‘व्यक्तित्व’ उदयास आले. व्यासंगी व्यक्तिमत्त्व होत गेले आणि मग संघर्ष सुरू झाला तो या व्यक्तिमत्त्वाचे अस्तित्व टिकविण्यासाठी. त्या संघर्षात व्यग्रता आली, व्यस्तता आली. मेहनत तर आलीच; पण काहींच्या नशिबी जसे जसे व्यक्तिमत्त्व फुलत गेले, नवीन नवीन आविष्कार होत गेले, यशाची शिखरे गाठली गेली तर तसे तसे अभिमानही फुंकर घालत फुगवले गेले. परिणामी, व्यस्तता, अपेक्षा, उन्मत्त आविष्कारातून उद्दामपणा, पैसा, प्रसिद्धी आणि हळूहळू व्यक्तिमत्त्वाचा र्‍हास. हा र्‍हास कधी व्यभिचाराच्या रूपातून होतो, तर कधी व्यसनाधीनतेतून. काही जण तर सर्व सद्गुण संपन्न असूनही, केवळ अपयश न पचल्यामुळे व्यसनाधीन होताना दिसतात.


या व्यसनाधीनतेचा इतका अक्राळ-विक्राळ विळखा कलाक्षेत्राला बसला आहे हे पाहून मन सुन्न होते. भावना गारठून जातात. आपण काय आणि कशी प्रतिक्रिया द्यावी, हे कळत नाही. दादासाहेब फाळके यांच्यापासून सुरू होऊन आजच्या अनुराग कश्यपपर्यंतचा चित्रपटसंस्कृतीचा प्रवास हा मन विषण्ण करतो! आपण सुरुवात कुठून केली आणि कुठे येऊन पोहोचलो आहोत. एक समाज म्हणून आत्ममग्न करणारा विचार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात आपण आपल्या बुद्धीच्या कक्षा इतक्या रुंदावल्या आहेत की प्रतिमानवही तयार करायला आपण मागे पुढे पाहिले नाही. स्वतःच्याच र्‍हासाला वेगवेगळ्या मार्गाने आपण आमंत्रित करत राहिलो आहोत, राहत आहोत. पण, तंत्रज्ञान अजून तरी आपल्या नियंत्रणात आहे. पण, भविष्यात ते तसेच असेल याची शाश्वती मुळीच नाही. पुढच्याच महिन्यांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा फेसबुकमध्ये वापर केला जाणार असल्याचे समजते.बॉलीवूड तर जवळ जवळ व्हेंटिलेटरवरच आहे. Multiple Organ Failure म्हणतात ना, त्याप्रमाणे AR , VR, Animated Movies, OTT प्लॅटफॉर्म्स एक ना अनेक टेक्निकल मार्‍याने त्याच्या अस्तित्वाला धोका आलाच आहे. कलाकार म्हणून नैसर्गिक गुणांनाही तंत्रज्ञानाचे आव्हान आहे. शिवाय, मानसिक दृष्ट्याही काही दिग्गजसुद्धा खचून गेल्यासारखे बरेचदा आढळतात आणि कदाचित या अशा असुरक्षिततेच्या भावनेतून, अतिशय नको इतक्या स्पर्धात्मक परिस्थितीमुळे, फास्ट लाईफ आणि अनिर्बंध जीवनशैली, अपयश, व्यक्तिस्वातंत्र्यातील असंस्कारक्षमता या आणि अशा अनेक. या सगळ्यातून कलाकार व्यसनाधीनतेकडे जास्त ओढले जात असावेत!! आपण नक्की अभिनय करण्यासाठी किंवा एक कलाकार, एक तंत्रज्ञ म्हणून बॉलीवूडमध्ये करिअर करायला आलो आहोत की, फिल्म इंडस्ट्रीत ‘ड्रग पॅडलर’ म्हणून आपले करिअर होत आहे, हेच मुळात कळण्याआधी नवीन पिढी त्या विळख्यात अलगद ओढली जातेय. पैशापुढे कलेची पूजा, कलेचा आविष्कार, कलाकार म्हणून संस्कार, समाजऋण काही काही देणे-घेणे मग उरत नाही. या पिढीची जर अशी स्थिती पुढे राहिली तर कला, संस्कार आणि संस्कृती टिकणार कशी? हा विळखा जर वेळेवर तोडला नाही, तर हळूहळू मराठी इंडस्ट्रीमध्येही त्याची तीव्र झळ बसू लागेल. कदाचित, तिथपर्यंत त्याची पावले जाण्यास सुरुवातही झाली असेल. पण, एक छोटा फरक आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठी कलाकार गुणवंत तर आहेतच; पण रंगभूमीवरून बरेचसे फिल्म जगतात आल्यामुळे मला वाटते अजून तरी संस्कृतीचा आणि संस्काराचा मराठी कलाकारांना धाक आहे. पण, आपण कलाप्रेमी, संस्कार आणि संस्कृतीबद्दल आग्रह धरणारे या विळख्याला कसे सामोरे जात आहोत? काय आणि कशी असेल आपली भूमिका? नुकतेच एका कार्यक्रमात सांगण्यात आले की, जर सगळी नावे बाहेर आली तर बॉलीवूड इंडस्ट्री बंद होऊन जाईल! हे विधान करण्या इतपत याची पाळेमुळे खोलवर रुतली आहेत. राजकीय मानसिकता, कार्यक्षमतेतील त्रुटी यादेखील तितक्याच जबाबदार आहेत या परिस्थितीला.

या कलाकारांबाबत समाज म्हणून आपली भूमिका काय, हा प्रश्न आहे. त्यासाठी थोडे खोलात जावे लागेल. ही पिढी संस्कारक्षम नाही, असेही म्हणता येणार नाही. सुशांत सिंहचेच उदाहरण घेऊ. अतिशय हुशार, बहुआयामी मुलगा. ज्या क्षेत्रात पाय रोवेल त्या क्षेत्रात उंची गाठेल, अशी क्षमता असलेला आताच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारा डायनॅमिक मुलगा! आपले कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींना तितकाच जपणारा. मेहनती आणि विनयशीलही. मुलींच्या बाबतीत दिलखुलास! पुढच्या पाच वर्षांचे फक्त प्लानिंगच नाही, तर ते प्रत्यक्षात उतरविण्याची जिद्द आणि लक्ष केंद्रित असणारा मुलगा. त्याचा शेवट तुम्हा-आम्हा सर्वांनाच माहिती आहे. खरे काय ते बाहेर येईलच! काही व्यक्तींचा जन्मच एखाद्या विशिष्ट हेतूसाठी होतो. याचा तर मृत्यूही अर्थात मनाला चटका लावणाराच आहे. पण, एका नवीन पर्वाची नांदी करून गेला. नाहीतर या बॉलीवूडमधल्या ड्रग्जच्या विळख्याला उलगडणे कठीण होते! वाईट गोष्टी संगतीने लवकर फोफावतात. पण, त्या रोखण्यासाठी, काही चांगले घडवून आणण्यासाठीही मानसिकता लागते, पूरक वातावरण लागते आणि एक 'whistleblower' लागतो. हे सगळे जुळून आले ते सुशांतच्या मृत्यूमुळे. आता तर फक्त ड्रग्जच नाही, तर व्यभिचार आणि ‘फिल्म मेकिंग’च्या व ‘टॅलेंट मॅनॅजमेंट’ कंपन्यांच्या नावाखाली चालणारा खरा धंदा उजेडात येतो आहे. आता गरज आहे ती राजकारण्यांनी राजकारण जरा बाजूला ठेवून या प्रकरणाकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची आणि ही घाण कायमची साफ करण्याची! आपण समाज म्हणून, संस्था म्हणून, एक सर्वसामान्य माणूस म्हणून काय करू शकतो? आपण समाज म्हणून, हे मंथन होत असतानाच काही भरीव शाश्वत संस्कारमय पाया या कलाक्षेत्रात आणि कलाकारांच्या जीवनात नव्याने तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. मग आपली पद्धत कशी असावी, याचा विचार हवा. माझ्या मते हे फक्त एकाच व्यक्ती किंवा संस्थेचे काम नाही, तर त्यासाठी अशा क्षेत्रात काम करणार्‍या विविध संस्था, विविध स्थरातल्या लोकांनी एकत्र येऊन एक ‘कॉमन अजेंडा’ बनवणे गरजेचे आहे. यामुळे संस्था कामे स्वतंत्र करतील. पण, सर्वांचे लक्ष्य एकच असेल. ड्रग्जचा विळखा जसा चहुबाजूनी होतो म्हणजे फ्रेंड्स, ड्रग्ज पॅडलर्सपासून अगदी अमेरिका, पाकिस्तान सप्लायर्सपर्यंत एकजुटीने, बांधिलकीने, सामंजस्याने, तत्परतेने आणि व्यावहारिक दृष्ट्याही चोख काम करतात ते दिसून आले. त्याच गुणवत्तेची आणि बांधिलकीची चांगल्या कामाच्या उभारणीसाठी खरी गरज आहे.

तत्परतेने काम करण्याची प्रमुख क्षेत्रे म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मीडिया. (सर्वच, इलेक्ट्रॉनिक्स तसेच सोशल आणि प्रिंट) ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा फिल्म्स या क्षेत्रात त्यांच्याच फॉरमॅटमध्ये चांगला कन्टेंट द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. पारंपरिकतेचा बाज असण्यापेक्षा विषय पोहोचणे सध्या महत्त्वाचे आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी मग स्वतंत्र चॅनेल असणे गरजेचे आहे. आज बहुतेक चॅनेल्सवर डाव्या विचारांच्या लोकांची मक्तेदारी जास्त पाहतो. त्यामुळे तसेच विचारच समाजात पसरताना दिसतात. इंदिराजींच्या काळात फिल्म डिव्हिजनची स्थापना झाली, त्यांनी त्या क्षेत्राची ताकद ओळखली होती. आपल्याजवळ ही ताकद आज आहे. पण, त्याचा वापर योग्य प्रकारे करण्याची गरज आहे. जर मी फिल्म, ओटीटी, सोशल मीडिया फक्त याच एका क्षेत्राचा विचार केला तर माझ्या मते, त्याचे एक मॅट्रिक्स असावे आणि काम हे सर्वस्तरांमध्ये, सर्व आयाम घेऊन सर्व विधांमधून एकाच वेळेला व्हायला हवे. अगदी लहान मुलांपासून, वयोवृद्धांपर्यंत, कुटुंबापासून ते कॉर्पोरेट संस्कृतीपर्यंत वेगवेगळ्या आयामांचे, वेगवेगळ्या विधांमधून वेगवेगळे गट तयार झाले पाहिजेत. जे एकच ध्येय डोळ्यासमोर घेऊन, ज्यातून आपल्याला कामाचे स्वरूप आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पाच्या प्रतिसादाचे मूल्यांकन करता आले पाहिजे. तसेच प्रत्येक क्षेत्रासाठी मॅट्रिक्स बनवावे. आजकाल शाळेतूनही फिल्म फेस्टिवल्स होतात, जिथे शाळेतील सहावीपासून दहावीपर्यंतची मुले ऍनिमेटेड फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स बनवतात. अप्रतिम विचार असतो त्यांचा. इथे काम करणे गरजेचे आहे. कारण, आजूबाजूला घडणार्‍या गोष्टी ते त्यांच्या आकलनशक्तीप्रमाणे मांडतात. ती संस्कारित करणे गरजेचे आहे. त्यांना तसे पोषक वातावरण देणे गरजेचे आहे. मी, २०१८साली लहान मुलांच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्सना भेट दिली आहे. बाहेरच्या देशातील मुले आपल्या मुलांपेक्षा जास्त सजग आणि तंत्रामध्ये सफाईदार वाटली. आपले विचार आणि संस्कार या माध्यमातून जगातील इतर मुलांपर्यंत जाणे गरजेचे आहे. जमेची बाजू म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर आपल्या या उद्देशासाठी बर्‍याच अंशी पोषक वातावरण तयार केले आहे. तर किशोरवयीन गटापर्यंत सर्व प्रकारच्या जिल्हा परिषदेच्या शाळेपासून इंटरनॅशनल स्कूल्सपर्यंत विविध कलांविषयी शाळांमध्ये अभ्यासक्रम असावा. कलेच्या प्रांतात स्पर्धा, फेस्टिवल्स व्हावीत जे त्यांच्यासाठी सकारात्मक आणि संस्कारक्षमरीत्या व्यक्त होण्याचे एक माध्यम असेल. स्पर्धेची पद्धत ही आंतरराष्ट्रीय दर्जाची असावी. त्यासाठी संशोधन हे आवश्यक आहे. पण, उद्देश हा भारतीय संस्कृतीला अनुसरून असावा. आज अनेक दिग्गज मराठी कलाकार आहेत ज्यांचा पाया मजबूत करणारी त्यावेळी लिटल थिएटर, कुमार कला केंद्र, रविकिरण इ. सारख्या संस्था शाळेशी संलग्न राहून संस्कारक्षम कलाच नव्हे, तर त्यांचं बालपणही जपत होते.

लिटल थिएटरनंतर त्याची किंवा तिची एंट्री व्हायची ती अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे यांच्या ‘आविष्कार’मध्ये. अशा अनेक चळवळीच्या संस्था कलाक्षेत्रात होत्या, ज्यात कलाकार अक्षरशः घडवत असत. त्यांचे छिन्नी हातोडे होते उत्तम लेखकांचे उत्तम साहित्य. नकळत बालमनावर शिस्तीचे, मर्यादेचे आणि अमर्याद कलाविष्काराचे संस्कार घडत. आज अगदी तशाच संस्था आणि माणसे नाहीत, फॉर्म कदाचित बदलेल; पण उद्देश तोच ठेवून अशी कार्ये व्हायला पाहिजेत. ते घडू शकते कारण ‘सवाई’ आजही तितकीच डोक्यावर घेतली जाते. असे उपक्रम अन्य भाषिक प्रांतातही व्हायला हवेत आणि तिथले नावीन्यपूर्ण उपक्रम आपणही करायला हवेत. फॉर्म बदलून अवधूत गुप्ते सारखे कलाकार नक्कीच हा उद्देश नकळत मनी ठेवून आपापल्या परीने काम करत आहेत. अशी माणसे किंवा संस्था स्वतंत्र काम करीत असताना एकत्र जोडली पाहिजेत. ही कामे होतही असतील. पण, बर्‍याच ठिकाणी जिथे उदासीनता असेल तिथपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आजवर शिक्षण क्षेत्राची जी दुर्दशा झाली ती धोरणांच्या अभावामुळे. पण, आजही अनेक शिक्षक तुटपुंजा पगारातही, प्रसंगी स्वतः पदरमोड समर्पित वृत्तीने खेड्यापाड्यापासून मनापासून मुलांना घडवत आहेत. कलाक्षेत्रातही असे बरेच असतील. त्यांना धीर देणे, ऍक्टिव्ह करणे महत्त्वाचे आहे. कलेच्या प्रांतातून व्यसनाधीनता आणि व्यभिचार यांना आळा घालण्यासाठी कलेच्या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांबरोबरच, राजकीय इच्छाशक्ती आणि शैक्षणिक धोरण याची जोड ही तितकीच महत्त्वाची आहे, तरच कलेला लागलेल्या ‘व्यभिचार’ आणि ‘व्यसनाधीनता’ या दोन किडी बर्‍याच प्रमाणात नष्ट होतील आणि ‘व्य’च्या व्यथेला उत्तर मिळेल!


- स्वाती इंदुलकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.