सुमारांची पोपटपंची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020
Total Views |


agralekh_1  H x



सत्तेच्या उबेने रुग्णशय्येवरील व्यक्तीही टुणटुणीत होतो तसे पवारच सर्वेसर्वा झाल्याने मराठी साहित्य जगतातील भंगारात गेलेल्यांनाही कंठ फुटू लागला. त्यापैकीच एक अडगळीतला बाहुला म्हणजे श्रीपाल सबनीस, मालकाच्या तोंडाकडे पाहून बोलका झाला, मोदी सरकारमध्ये त्यांना हुकूमशाही दिसू लागली.



सुधारित नागरिकत्व कायदा देशांतर्गत लोकशाहीला घातक आहे. जाती-धर्मावरून हत्या होत असताना केंद्र सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. देशातील लोकशाही धोक्यात आहे अन् हा देश हुकूमशाहीच्या वाटेकडे चालला आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केलेले मत योग्य आहे,” असे सांगत, “सरस्वतीच्या उपासकांना शिष्यवृत्ती द्यायला हवी, मात्र हे सरकार विद्यार्थ्यांना ठोकून काढत आहे. असे असूनही देशात कुठेच हुकूमशाही नाही, असे म्हणणार्‍या ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांची भूमिका योग्य नाही. साहित्यातील एक गट नेहमीच केंद्रातील सरकारची तळी उचलण्याचे काम करतो, त्या गटापैकीच अरुणा ढेरेही असाव्यात,” अशी पोपटपंची अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.



सबनीसांनी जे शब्दांचे बुडबुडे उडवले
, ते इथे सविस्तर देण्याचे कारण म्हणजे या महाशयांचे साहित्यातील योगदान ते काय, हेच मुळी कोणाला माहिती नाही. श्रीपाल सबनीस यांचे नेमके कोणते साहित्य आपल्याला माहिती आहे, असे महाराष्ट्रातल्या वाचकांना विचारल्यास त्याचे उत्तर ‘नाही’ असेच येईल. म्हणूनच मराठीच्या नावावर भरवल्या जाणार्‍या साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षाच्या बौद्धिक कुवतीची माहिती सर्वांनाच व्हावी, लेखक-विचारवंत-बुद्धीजीवी म्हणून प्रस्थापितांनी कोणत्या सुमाराच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली होती, हे मराठीजनांना कळावे आणि साहित्यिक वा साहित्य संमेलनाकडे १२ कोटी मराठी भाषिकांपैकी मूठभरच का फिरकतात, हे त्याच्या आयोजकांनाही समजावे, याच उद्देशाने सबनीस की सब उन्नीस बीस झालेल्या श्रीपालांची विधाने येथे दिली.



यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो असो वा आता वटवट करणारे श्रीपाल सबनीस वा सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणार्‍यांचे टोळके
, ही सर्वच मंडळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नेहमीच खार खाऊन असतात. असे का? कारण २०१४ च्या आधी शरद पवार व त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी असलेल्या देशातल्या वा राज्यातल्या सरकारांनी अशा बोरूबहाद्दरांना खिरापतीसारख्या सोयी-सवलती दिल्या. विविध सरकारी योजना, आयोगांमध्ये अभ्यासक-विशेषज्ज्ञ म्हणून अशा लोकांचा भरणा केला गेला. परंतु, मोदी सरकार सत्तेवर आले आणि सरकारी पैशावर वर्षानुवर्षे जागा अडवून बसणार्‍यांचे, अनुदाने लाटणार्‍यांचे, सरकारी पैशावर चंगळ करणार्‍यांचे वांधे झाले, ऐशोआरामाची वाट लागली, आपणच एकमेव शहाणेच्या आविर्भावात जगणार्‍या अर्धवटांना कोणी विचारेनासे झाले. तथापि, नुकतेच राज्यात सत्तापरिवर्तन झाले नि मोदीविरोधकांच्या मालकाच्या हातात त्याचा रिमोट गेला. शरद पवारांच्या मध्यस्थीने काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सत्तेच्या उबेने रुग्णशय्येवरील व्यक्तीही टुणटुणीत होतो तसे पवारच सर्वेसर्वा झाल्याने मराठी साहित्य जगतातील भंगारात गेलेल्यांनाही कंठ फुटू लागला. त्यापैकीच एक अडगळीतला बाहुला म्हणजे श्रीपाल सबनीस, मालकाच्या तोंडाकडे पाहून बोलका झाला, मोदी सरकारमध्ये त्यांना हुकूमशाही दिसू लागली. त्याआधीही मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून श्रीपाल सबनीस यांनी शरद पवारांच्या बरोबर उभे राहत विरोधाचीच पुंगी वाजवली. भाजपविरोधात पवारांनी एखादे विधान केले की ते उचलून धरायचे, त्याला पुरक असे बोलायचे उद्योग सबनीसांनी केले. शरद पवार, छगन भूजबळ वा राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या मोर्चा-आंदोलनात जाऊन आपली पवारनिष्ठा दाखवायच्या करामतीही श्रीपाल सबनीस करत आले.



गेल्या पाच
-साडेपाच वर्षांतली त्यांची काही वक्तव्ये पाहिली तरी ती शरद पवारांच्या धोरणानुरुपच असल्याचे स्पष्ट होते. ‘भाजपने आधी गोळवलकर गुरुजींना सोडावे आणि मग गांधींना मिठी मारावी’, ‘समाजवादी विचारांशी बांधिलकी जपणारे कार्यकर्ते तयार करावेत’, ‘पद्मविभूषणसाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी कोणता पराक्रम केला?’, ‘भारताचा इतिहास ब्राह्मण्यग्रस्तांनी लिहिला’, ‘देशात लोकांकडून धर्माचे विकृतीकरण सुरु आहे’, ही आणि अशी कितीतरी विधान सबनीस यांनी या काळात केली. वरील सर्वच वक्तव्ये शरद पवारांनी हयातभर जे राजकारण केले, त्याला पुरक अशीच होती व आहेत. आताही पवारांच्या हातात राज्यातल्या सत्तेच्या नाड्या आल्या नि श्रीपाल सबनीसांना भाजप, नरेंद्र मोदींविरोधात उंडारावेसे वाटले. जेएनयु वा जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील घोडविद्यार्थ्यांच्या दंगा-धिंगाण्याकडे दुर्लक्ष करून पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत दंगेखोरांचाच कैवार घेऊ लागले. मात्र, देशातील आणि राज्यातील जनतेला व वाचकांनाही श्रीपाल सबनीस कोणाच्या इशार्‍यावर जिभेची पट्टी चालवतात, हे चांगलेच कळते. मतदारांनी ज्यांना नाकारले, त्यांनी लांड्यालबाड्या करून सत्ता हस्तगत केली व त्यांचीच री श्रीपाल सबनीसही ओढू लागले. परंतु, ‘हुकूमशाही’, ‘हुकूमशाही’ म्हणत चिरक्या आवाजात कितीही किंचाळले तरी जनमत काही त्यांच्या मागे वळणार नाही. कारण जनतेकडे सद्सद्विवेक आहे, काही निर्बुद्धांकडे नसला तरी!



श्रीपाल सबनीस व त्यांच्या पांढर्‍या झग्यावाल्या दोस्ताने हुकूमशाही
-हिटलरशाहीच्या नावाने कित्येकदा गळे काढले. मात्र, आपण जे शब्द उच्चारतो, त्याचा अर्थ तरी मराठी साहित्यिक म्हणविणार्‍यांना कळतो का, असा प्रश्न विचारावासा वाटतो. कारण तसे जर काही असते तर सबनीस वा दिब्रिटो आता जी बेताल बडबड करताना दिसतात, तीदेखील हुकूमशाहीत शक्य झाली नसती वा ते मोदींविरोधात खर्डेघाशीही करू शकले नसते. परंतु, लोकशाहीने दिलेल्या त्यांच्या कोणत्याही स्वातंत्र्यावर कसलीही गदा आलेली नाही, तसेच तसे काही झालेच तर त्याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयीन व्यवस्थाही सुरळीत सुरू आहे. अर्थात डोळे उघडे ठेवून पाहणार्‍यांनाच हे दिसू शकते पण पवारांच्या आदेशावर आंधळ्याचे सोंग घेतलेल्यांना ते कसे दिसेल? त्यांना मोदींचे नाव घेताच अंधाराचीच आठवण येईल नि आपल्या मालकाचे नाव निघाले की ते सूर्य-चंद्राच्या उपमा देऊन त्याची स्तुती करू लागतील. पण जग पायात घुंगरू बांधून मालकासमोर मुजरा करणार्‍यांच्या विचारानुसार चालत नसते वा त्यावर विश्वासही ठेवत नसते, हे श्रीपाल सबनीसांनी लक्षात घ्यावे. दुसरा मुद्दा सरस्वतीच्या उपासकांचा! दिब्रिटो व सबनीस दोघांनाही जेएनयु व जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांचा पुळका आला व ते मोदी सरकारला खलनायक ठरवू लागले.



मात्र
, सरकारी अनुदानावर चालणार्‍या राजकीय अड्ड्याव्यतिरिक्त जेएनयु वा तत्सम विद्यापीठांची ओळख ती काय? आताही तिथल्या काही विद्यार्थ्यांनी आपले ज्ञानार्जनाचे काम सोडून राजकीय भूमिका घेतली. अर्थात भावना व्यक्त करण्याचा अधिकार त्यांनाही आहेच, त्याला कोणी आक्षेप घेऊही शकत नाही. पण या विद्यार्थ्यांची मजल त्याच्याही पुढे गेली. सरस्वतीच्या उपासकांनीच आधी आपल्या वकूबाबाहेरच्या राजकीय, प्रशासकीय निर्णयावरून गोंधळ घातला, हिंसाचार पसरवला, रक्त सांडवले आणि आपण सरस्वतीचे नव्हे तर हिंसेचेच उपासक असल्याचे दाखवून दिले. अशा परिस्थितीत ज्या सुधारित नागरिकत्व कायद्याशी भारतीय मुस्लिमांचा वा देशातील जनतेचा तसूभरही संबंध नाही, त्यावरून काहूर माजवत हिंसाचार, जाळपोळ, दगडफेकीचा अधिकार त्यांना कोणी दिला, असा प्रश्न पडतो. म्हणूनच विद्यार्थी असल्याच्या आडून जर कोणी गुंडगिरी वा मवालीगिरी करत असेल तर त्याचे पोलिसी व कायदेशीर परिणामही त्यांना भोगावेच लागणार, ते कोणीही टाळू शकत नाही. त्यामुळेच आपले म्हणणे ऐकून घेत नाही म्हणून फॅसिस्टांसारखी खुनी कृत्ये करणारे विद्यार्थीच खरे तर इथे हिटलरच्या जातकुळीतले ठरतात, पण कायदेतज्ज्ञ होऊ पाहणार्‍या श्रीपाल सबनीसांना ते समजून घ्यायचे नाही, कारण समजून घेतले तर त्यांच्यावर पवारांची कृपादृष्टी कशी पडेल?



दरम्यान
, साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी केंद्र सरकारची तळी उचलली, असे विधानही श्रीपाल सबनीस यांनी केले. अरुणा ढेरे यांनी आपल्या स्वयंप्रेरणा व स्वयंअध्ययनानेच देशात हिटलरशाही नसल्याचे विधान केल्याचे दिसते, कारण स्वयंप्रकाशी व स्वयंप्रज्ञ व्यक्ती कोणत्याही गटात कधी सामील होत नसतो वा तशा गटाच्या दबावामुळे आपले मतही तयार करत/बदलत नसतो. पण स्वतः सबनीस आणि त्यांच्या गटातल्यांनी आतापर्यंत कोणाची तळी उचलली होती? आताही ते नेमके कोणाच्या तोंडासमोर गोंडा घोळत शेपट्या हलवत आहेत? तुकडे फेकावे म्हणून ते कोणाकडे आशाळभूतपणे पाहत आहेत? हे श्रीपाल सबनीस यांच्या पूर्वीच्या कृती आणि उक्तीतूनच स्पष्ट होते. त्यामुळे पवारांनी चावी फिरवली की तोंड उघडणार्‍यांनी अरुणा ढेरे यांच्यावर गटा-तटाचा आरोप करण्याआधी, मोदी-शाह व भाजपला गुन्हेगार ठरवण्याआधी आपले हात कोणत्या व्यक्तीच्या गटापुढे जुळतात, ते पाहावे.

@@AUTHORINFO_V1@@