‘इराण विरुद्ध इराण’

    दिनांक  13-Jan-2020 20:42:22   
|
Iran _1  H x W:
 


इराणसाठी हा कठीण काळ आहे. महासत्ता अमेरिकेशी युद्ध इराणलाही परवडणारे नाहीच. त्यातच देशांतर्गत आंदोलनाचे रूपांतर गृहयुद्धात झाले, तर इराणच्या सरकारसह खामेंनीच्या खुर्चीलाही हादरे बसतील. म्हणूनच इराणला सामंजस्याची भूमिका स्वीकारून हा गृहकलह आटोक्यात आणावा लागेल.

 

इराणी कुड्स फोर्सेसचे कमांडर कासिम सुलेमानी यांच्यावरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेत युद्धाचे काळे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे २०२०च्या नवीन इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीपासूनच जगाचे संक्रमण तिसर्‍या महायुद्धाकडे तर होणार नाही ना, यावरून जागतिक तर्कवितर्कांनाही उधाण आले. अमेरिकेने सुलेमानीला ठार केल्यानंतर इराणही ईर्ष्येने पेटून उठला. इराकमधील अमेरिकेच्या सैन्यतळांवर इराणने मिसाईल हल्ले सुरू केले. या अशांत परिस्थितीत इराणकडून मात्र एक मोठी चूक झाली. तेहरानवरून युक्रेनच्या दिशेने उड्डाण केलेल्या प्रवासी विमानाला अचानक अपघात झाला. या भीषण विमान अपघातात विमानातील सर्वच्या सर्व १७६ प्रवाशांना, क्रू मेंबर्सना प्राणाला मुकावे लागले. या अपघातानंतरच इराणी वायुसेना, सैन्य संशयाच्या भोवर्‍यात होतेच. पण, हल्ल्यानंतर एक-दोन दिवस उलटल्यानंतरही इराणी सैन्यासह सरकारने या अपघाताशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा धोशा लावला.

काहींनी तर चक्क अमेरिकेवरही संशय व्यक्त केला. पण, सत्य फार काही लपून राहत नाही. अखेरीस इराण सरकारकडूनच हा विमान अपघात त्यांच्या अक्षम्य चुकीमुळे झाल्याची जाहीर कबुली देण्यात आली. त्यानंतर अमेरिका, कॅनडासह जगातील बहुतांश देशांनी इराणवर सडकून टीका केली. युद्धज्वर चढलेल्या इराणी सैन्याला प्रवासी विमान आणि शत्रूचे हल्लेखोर विमान यात फरकही करता येऊ नये, याबाबत संताप व्यक्त झाला. कॅनडाचे या विमानात बहुतांश प्रवासी असल्याने या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, असे आदेश पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दिले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. इराणच्या या भयंकर चुकीबद्दल खुद्द देशाचे सर्वोच्च नेते खामेनी आणि सरकारनेही खेद व्यक्त करत आपल्याकडून खूप मोठी चूक झाल्याची कबुलीही दिली.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख जनरल हुसैन सलामी यांनी तर, “मी अल्लाशपथ सांगतो, मी त्याच विमानात असतो आणि जळून खाक झालो असतो, तरी चालले असते, कारण या दुर्देवी प्रसंगाला तरी सामोरे जावे लागले नसते,” अशी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली. अशाच तीव्र प्रतिक्रिया इराणी उच्चपदस्थांकडून आल्या असल्या तरी अद्याप संबंधित अधिकार्‍यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई इराण सरकारने केल्याचे दिसत नाही. परिणामी, जागतिक विरोधाबरोबरच इराणचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने इराणच्या विविध विद्यापीठांमध्ये, तेहरानच्या आझादी चौकात मोठ्या संख्येने जमले व त्यांनी इराण सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. काळे झेंडे दाखवून इराणी सैन्यालाही धारेवर धरले. “आपला शत्रू अमेरिका नाही, तर देशातच आहे,” यासारखे बॅनर आंदोलकांनी झळकावले.

खामेनींच्या राजीनाम्याचीही मागणी केली. एकीकडे इराणी जनतेचा रोष अनावर होत होता, तर दुसरीकडे इराण सरकार हे आंदोलन दडपण्याच्या पूर्ण तयारीशी मैदानात उतरले. पण, संतप्त आंदोलकांना शांत करण्यात ते अयशस्वी ठरले. जी इराणी जनता त्यांच्या लाडक्या कमांडरच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने त्यांना अलविदा करण्यासाठी उपस्थित होती, अमेरिकेविरोधात द्वेषपूर्ण घोषणाबाजी करत होती, आज तीच इराणी जनता इराण सरकारविरुद्ध उभी ठाकली. आपल्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे एवढा मोठा विमान अपघात घडला, हे या आंदोलनाचे एक प्रमुख कारण असले तरी इराणी जनतेचा सरकारवरील रोष लपूनही राहिलेला नाही. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे तेलाच्या किमती उसळल्या.

महागाई वाढली. त्यात सुलेमानींवरील हल्ल्यानंतर देशभरात असुरक्षिततेचे आणि अराजकतेचे वातावरण आहे. गेल्या वर्षीही इराणी जनतेने हुकूमशाही सरकारविरोधात असेच व्यापक जनआंदोलन पुकारले होते. त्या आंदोलनात तब्बल दीड हजार आंदोलकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे यंदा परिस्थिती चिघळू नये म्हणून इराण सरकार खबरदारी घेत असले तरी अजूनही या आंदोलनावर त्यांना नियंत्रण प्रस्थापित करता आलेले नाही. तेव्हा, इराण सरकारने युक्रेनच्या विमान अपघाताशी संबंधित सर्व दोषींना तत्काळ कडक शासन केल्यानंतरच कदाचित इराणी जनतेचा रोष शांत होईल. एकूणच, इराणसाठी हा कठीण काळ आहे. महासत्ता अमेरिकेशी युद्ध इराणलाही परवडणारे नाहीच. त्यातच देशांतर्गत आंदोलनाचे रूपांतर गृहयुद्धात झाले, तर इराणच्या सरकारसह खामेंनीच्या खुर्चीलाही हादरे बसतील. म्हणूनच इराणला सामंजस्याची भूमिका स्वीकारून हा गृहकलह आटोक्यात आणावा लागेल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.