‘फकिरा’ कादंबरीतील सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय विचार संपदा!

    दिनांक  01-Aug-2019


 


अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली ‘फकिरा’ (१९५९) ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी समजली जाते. अण्णा भाऊ लिखीत ही ‘मास्टरपीस’ कादंबरी ऐतिहासिक व समकालीन आहे. ‘फकिरा’ कादंबरीच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे सामाजिक एकीकरण, संस्कार, राष्ट्रधर्म, राष्ट्र, राजकीय व्यवस्था, प्रेम अशा उच्च मूल्यांची पेरणी करताना दिसतात. याचबरोबर दिनदलितांचे हीन जीवन, सहिष्णुता, लढवय्येपणा, राष्ट्रीय कर्तव्य या मूल्यांचीही शिकवण देतात म्हणून ‘फकिरा’ सामाजिक व राष्ट्रीय उदात्त व उन्नत भावनेने ओतप्रोत भरलेला दस्तऐवज ठरतो.

 

थोर लेखक अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राच्या पावनभूमीतील व मराठी साहित्या जगतातील जागतिक कीर्तीचा एक तेजस्वी धु्रवतारा! प्रखर अनुभूती व प्रतिभेच्या जोरावर ज्ञानार्जन करून साहित्यसेवेद्वारे देशसेवा राष्ट्रप्रेम, महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक काळापासून ते सद्यकालीन काळापर्यंत अचूक विश्लेषणात्मक मांडणी करणारे अण्णा भाऊ साठे हे एक अद्वितीय नाव आहे. साहित्य हे जगाचा तिसरा डोळा आहे, असं १९५८ च्या पहिल्या भारतीय दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणातून प्रतिपादित करणारे अण्णा भाऊ सामाजिक परिवर्तनातून सक्षम भारत निर्मिती या सात्त्विक ज्ञानाच्या अधिष्ठानावर साहित्य निर्मिती करतात. आपली वैचारिक साहित्यिक भूमिका अधिक स्पष्टपणे मांडताना अण्णा भाऊ लिहितात, “माझा माझ्या देशावर जनतेवर नि तिच्या संघर्षावर अटळ विश्वास आहे.

 

हा देश सुखी आणि समृद्ध व्हावा, इथे समानता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे, अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पाहत मी लिहीत असतो.” अण्णा भाऊंच्या साहित्याचे वैचारिक अधिष्ठान हे भारतीयत्व व राष्ट्रीयत्वाच्या जाणिवांना वृद्धिंगत करून अखंड भारताच्या वैभवशाली परंपरेचा चिरंतन वाहणारा झरा होय. प्रस्थापित साहित्यविचार मापदंड व समिक्षा मूल्य सतत बदलत असतानाही गेली आठ दशके अण्णा भाऊंचे अभिजात साहित्य व दिवसेंदिवस त्याची उपयोगिता व समर्पकता दिवसेंदिवस वाढत आहे, हे सिद्ध करत आहे. “आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे, आम्हाला मांगल्य हवे आहे,” असे अण्णाभाऊंचे मत होते. अण्णा भाऊंचे साहित्य तत्कालीन भारतीय समाजाचा वैश्विक स्वरूपाने विचार करून मांडणी करणारा आविष्कारच म्हणावा लागेलभारतातील वेगवेगळ्या राज्यात उफाळलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर सर्व भारतीयांना शांततेच्या मार्गाची कास धरून हिंसाचाराचा धिक्कार करण्याचे पवित्र विचार अण्णांच्या साहित्यात आढळतात.

 

द्या फेकून जातीयतेला।

करा बंद रक्तपाताला।

आवरोनी हात आपुला।

भारतीयांनो इभ्रत तुमची ईर्षेला पडली।

काढा बाहेर नौका देशाची ।

धरा सावरून एकजुटीने दुभंगली दिल्ली।

काढा बाहेर राषट्रनौका,

ही वादळात गेली॥

 

या ओळींतून अण्णांच्या राष्ट्रीय विचारांची प्रचिती येते. अण्णांनी नमनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवत मूलगामी त्याजागी पहिल्या नमनाचा मान मातृभूमी, हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांना देण्याचे राष्ट्रीय योगदान अण्णा भाऊंनी दिले आहे. यातूनच ‘सर्वप्रथम राष्ट्र’ हीच अण्णा भाऊंच्या ‘नवभारत’ची संकल्पना होती, हे अधोरेखित होते. त्यांच्या साहित्यातील देशभक्ती, देशाभिमान व भारतीय संस्कृतीचा ठेवा वाचकांच्या, अभ्यासकांच्या, शोधनिबंधकारांच्या अभ्यासाचे मोठे विषय होऊ शकतात. ते अजून हाताळले गेले नाहीत. अण्णा भाऊंच्या साहित्य कृतींमधील व्यक्तिरेखा तीन प्रमुख साहित्यिक मूल्य जपण्याचा प्रयत्न करीत असतात. पहिले देशाचे स्वातंत्र्य, दुसरे महिलांची प्रतिष्ठा व शील, तिसरे माणसांचा स्वाभिमान अशी वैश्विक साहित्य निर्मिती करून भारतमातेच्या मराठी दालनात भर घालून अनेक अनमोल शब्दांचे भांडार उधळले आहे. अण्णा भाऊंच्या या अद्वितीय राष्ट्रीय साहित्यिक योगदानामुळे नारायण सुर्वे अण्णा भाऊंना ‘प्रकाशाचा दीपस्तंभ’ असे संबोधतात.

 

१९६१ सालचा महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट कादंबरी’ हा पुरस्कार मिळवणारी ‘फकिरा’ ही कादंबरी मराठी साहित्यातील ‘दीपस्तंभ’ समजली जाते. इंग्रजी राजवटीच्या दरम्यान भारतीयांची होणारी होरपळ, त्याविरुद्धचा लढा, उपेक्षित समाजाची होणारी हालअपेष्टा, इंग्रजी राजवटीचा जुलूम व या सर्वांच्या विरोधात बंड करणारा मातंग वाड्यातील ‘फकिरा’ हा नायक, ज्याला ब्रिटिश फौजा कधीही पकडू शकल्या नाहीत. संपूर्ण गावाला वेठीस धरून ‘फकिरा’ने समर्पण केले नाही, तर गावच्या माळावर बंदी बनवून ठेवलेले सर्व गावकरी मरतील, अशी ब्रिटिशांची धमकी मिळाल्याने गावकर्‍यांच्या जीवाचा धोका ओळखून आत्मसमर्पण करणारा व हसत फासावर जाणारा उमदा दिलदार लढवय्या म्हणजेच अण्णा भाऊंचा नायक ‘फकिरा’ होय.

 

सामाजिक प्रबोधन, भारतीय खेड्यांमधील चिवट परंपरा, जातीयतेच्या पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या उतरंडी, यातून मानसिकद़ृष्ट्या विभागलेला समाज तरीही सामाजिक सलोखा राखण्यासाठी जीवाची बाजी लावणारे राणोजी मांग, फकिरा, विष्णुपंत कुलकर्णी आणि असंख्य आदर्शवत पात्र व त्याचबरोबर ब्रिटिश सरकारचे हस्तक बापू खोत, रावसाहेब पाटील यासारखे पात्रही ‘फकिरा’त आपल्याला पाहायला मिळतात. ‘फकिरा’च्या सुरुवातीलाच राणोजी या गावच्या मोठेपणासाठी जीवाची पर्वा न करणार्‍या मांगवड्यातील उमद्या तरुण व्यक्तिमत्त्वाची ओळख होते

.

दुसर्‍या गावची जोगणी हिंमतीच्या व तलवारीच्या जोरावर आपल्या गावात पळवून आणल्यास या गावची जमीन सुपीक होईल, पाऊस पडेल, अन्नधान्य पिकेल व वाटेगावात सुबत्ता नांदेल व गावातील शंकरराव पाटील जे आपल्या गावात असा बहाद्दूर कोणी जन्माला आला नाही, असे म्हणून अत्यंत उदास आहेत. त्यांची उदासीनताही घालवता येईल, या उद्देशाने प्रेरित झालेला राणोजी जीवाची बाजी लावून जोगणी पळवून आणण्याचे अलौकिक कार्य करण्यास सज्ज होतो. ‘मी मेलो तरी चालेल पण गाव जिता राहिला पाहिजे,’ या उदात्त भावनेने आपल्या पत्नी, मुलांना व आई-वडिलांना मनातल्या मनात पाहून शेवटचा नमस्कार करून गावावरून जीव ओवाळून टाकण्यास सज्ज झालेला राणोजी अत्युच्च शौर्य गाजवून तीनशे माणसांच्या घोळक्यातून शीगावची जोगणी पळवून वाटेगावच्या हद्दीत आणतो. परंतु शीगावचा बापू खोत रिवाज मोडून राणोजीचे शिर कापून नेतो. हाच पुढे वाटेगाव व शिगावमधील संघर्षाचा मुद्दा बनतो.

 

राणोजी गावकर्यांच्या गळ्यातला ताईत होतो, तर राणोजीचा मुलगा फकिरा बापाच्या खुनाचा बदला घेण्याचा निश्चय करतो. तरुण फकिरा बाजीबा खोताची मुठीसकट तलवार उडवतो व विंचू ठार मारण्याऐवजी त्याला नांगी तोडून जिवंत ठेवणारा फकिरा लोकांचा अत्यंत प्रिय बनतो. रावसाहेब पाटील व बापू खोत ब्रिटिश सरकारचे हस्तक बनून फकिरा व त्याच्या साथीदारांना लहानमोठ्या गुन्ह्यांचा आरोप लावून ब्रिटिशांच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु फकिराच्या बाजूने वाटेगावचा विष्णुपंत कुलकर्णी अत्यंत खंबीरपणे पाठीशी उभा राहतो. विष्णुपंत कुलकर्णी म्हणतात, ‘’जगा, कुत्र्याच्या मौतीनं मरू नका.” विष्णुपंतांचे हे शब्द झुंजार फकिराच्या तलवारीला अधिकच धार आणि मनाला धीर देतात. प्रेरित झालेला फकिरा व त्याचे सहकारी बेडस गावच्या मठकर्‍याचा वाडा लुटून धान्य आणतात व हे सर्व धान्य गावात सर्वांना समान भाग करून वाटप करतात. फकिरा दरोडे टाकून वाटेगावातील दुष्काळात मरणार्‍या माणसांना जीवदान देतो, पण रावसाहेब पाटील व बापू खोत फितुरी करतात व मांग महारांना तीन वेळा हजेरी लावली जाते. चिडून फकिरा व त्याचे सहकारी या प्रथेविरुद्ध बंड करतात.

 

फकिराला धान्य लुटल्यामुळे अटक होते, परंतु अत्यंत निर्णायक क्षणी विष्णुपंत कुलकर्णी फकिराला अटकेतून सोडवतात. दारुगोळ्याचा निपुण वापर म्हणजे फकिरा होय. अखेर फकिरा हा शीगावच्या जोगिणी पळवून आणतो. तो बापू खोताचे मुंडके उडवतो व आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेतो. त्याच्या कृतीने फकिरा वाटेगावचा व संपूर्ण मांग समाजाचा नायक बनतो. फकिरा हा बंडाचा नायक होतो. महार मांगाच्या असहाय्यतेला अण्णा भाऊंचा फकिरा वाचा फोडतो. यामुळेच डॉ. बाबुराव गुरव यांच्या शब्दांत फकिरा हा उपेक्षित दीनदलितांच्या स्वातंत्र्यलढ्याचा वाङ्मयीन वेदच मानावा लागेल. समाजाच्या अंतर्मनातील अस्मितेचे पेटते निखारे, विजेप्रमाणे कडाडणारी त्यांची हत्यारे, थरकाप उडवणारी जिद्द व शौर्य अण्णाभाऊ अत्यंत रसरशीत पद्धतीने शब्दबद्ध करतात. अण्णा भाऊंची ‘फकिरा’ ही कादंबरी सामाजिक समतेचा मोठा ठेवाच म्हणावा लागेल, कारण जातीपाती विसरून गाव म्हणून एकत्र लढण्याचा संदेष स्पृश्य आणि अस्पृश्य यांनी आचरणात आणल्याचे दिसून येते. मांग- महार समाजाच्या दु:खात गावातील सर्व सवर्ण भाग घेतात. याचे स्पष्ट चित्रीकरण या कादंबरीत आढळते.

 

‘फकिरा’च्या रक्तात ओतप्रोत भरलेला गुण म्हणजे माणुसकी ! रघुनाथ ब्राह्मणाच्या वाड्यावर खजिना लुटायला गेलेला ‘फकिरा’ त्याच्या परम माणुसकीचे दर्शन देतो व स्त्रियांची अब्रू व चारित्र्य स्वत:च्या जीवापेक्षा महत्तम मानतो, याची साक्ष देतो. फकिरा हा दरोडेखोर नाही तर माणुसकीची चाड असणारा स्वाभिमानी, निर्भय, निर्मळ मनाचा व अन्यायाविरोधात बंड करण्याची धमक असणारा सर्वमान्य नायक आहे. इंग्रजी सत्ता उलथून पाडण्याची ‘फकिरा’ची आकांक्षा देशातील पारंपरिक श्रद्धा व भक्तिभाव अत्यंत स्पष्टपणाने या कादंबरीत मांडली आहे. यातील जोगिणीचा खेळ हा अंधश्रद्धांवर आधारलेला नाही तर लोकसंस्कृतीशी नाळ जोडणारा आहे. शंकर पाटील व विष्णुपंत कुलकर्णी हे संस्कृतीचे प्रवक्ते बनले आहेत. विष्णुपंत हे एक आदरशील, करारी आणि दमदार व्यक्तिमत्त्व आहेत. संकटकाळी सर्वांना उद्देशूून ते म्हणतात, “माझ्याही भोवती आक्रोश सुरू आहे, मी संकटात आहे परंतु माझे स्पष्ट मत आहे की, तुम्ही जगलेच पाहिजे! मरणापेक्षा आज जगणं महत्त्वाचं आहे.

 

विष्णुपंत कुलकर्णी हे शोषितांच्या प्रती कणव असलेले गावातील सर्वमान्य नेतृत्व आहे. दुष्काळी परिस्थितीत सर्व मांग-महार मंडळींना, “जा दुबळे होऊ नका, हेही दिवस जातील, दिवस घर बांधून राहत नाहीत,” असा दिलासा देतात. वि.स. खांडेकरांनी विष्णुपंतांचे वर्णन ‘दिलदार, करारी व सार्‍या गावावर प्रेम करणारा’ असे केले आहे. ‘फकिरा’ या साहित्य जगतातील दुर्मीळ कलाकृतीमधून सांस्कृतिक, राष्ट्रीय रूपक, इंग्रजी पिळवणुकीच्या विरोधातील नायक, सामाजिक बलिदान, हौतात्म्य भारतीय संस्कृतीमधील प्रतीक जसे की, मैदानी खेळ, कसरती, प्राचीन युद्धकला यासाठी लेखणी झिजवतात. पोवाडे, गीत, लावणी, लोकनाट्य, कथा, नाटक कांदबर्‍या या विपुल साहित्य प्रकारामधून विविधांगी लेखनात अण्णा भाऊंचे भारत देश, भारतभूमीविषयीचे चिंतन, स्पष्टपणे प्रकट होते. पंजाब, दिल्ली, बंगाल, गुजरात व महाराष्ट्र येथील विविध प्रश्नांवर सांगोपांग विचार अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यविश्वात विस्ताराने मांडले आहे.

 

‘फकिरा’च्या माध्यमातून अण्णा भाऊंनी भारतीय समाजाच्या ऐतिहासिक जडणघडणीचा सर्वांगीण इतिहास मांडला आहे. भारतीय इतिहासातील पुराण, जातक कथा, नीतिपर अनेक गोष्टींमधून तत्कालीन समाज जीवनाचे आकलन ‘फकिरा’ कादंबरीत होते. राष्ट्र राज्य, धर्मप्रणाली या गोष्टींचाही ऊहापोह आनुषंगिकपद्धतीने ‘फकिरा’ कादंबरी मांडते. त्यामुळे ही कादंबरी राष्ट्रवादी लेखन परंपरेमधून पुढे आली आहे, हे स्पष्ट होते. वसाहतीच्या काळात जातीव्यवस्थेमुळे भारतीय समाज जीवनावर झालेल्या परिणामाची चिकित्सक मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, निकोलस डर्क्स, सुझान बेले, रोझलिंड ओ हेलन यांच्या लिखाणातून झाली. तीच परंपरा यशस्वीपणे पुढे नेली आहे ती अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ कादंबरीने. ‘फकिरा’ ही कादंबरी ब्रिटिश जुलमी राजवटीच्या विरोधात भारतीय जनतेचा प्रातिनिधीक हुंकार मांडते. न्यायाधिष्ठित समाजरचनेचा आग्रह अण्णा भाऊंच्या संपूर्ण साहित्यात ओतप्रोत भरला आहे. ‘स्मशानातील सोनं’ ही त्यांची कथा देशातील वंचितांची विदारक मांडणी करून त्या दुःखाच्या परिमार्जनातील सामूहिक जबाबदारीची संवेदना मांडते.

 

- डॉ. बळीराम गायकवाड

८७७९८२५७७२