समाजवृद्धीतून जोपासली कर्तव्यभावना

    दिनांक  16-Apr-2019   


धकाधकीच्या आयुष्यात समाजसेवेचे व्रत अखंडपणे जोपासणार्‍या डोंबिवलीतीलमराठा हितवर्धक मंडळा’ला नुकतीच ५३ वर्षे पूर्ण झाली आहेत. सांस्कृतिक वैभवतेचा वारसा जपणार्‍या डोंबिवलीत मराठा बांधवांनी या मंडळाची स्थापना केली. या संस्थेची आजवरची वाटचालही गौरवशाली ठरली आहे.

 

डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहरात विविध सामजिक संस्था कार्यरत आहे. त्यामध्ये काही मोजक्याच संस्था नावारूपाला आल्या आहेत. त्यापैकी एक नाव डोंबिवलीतील ‘मराठा हितवर्धक मंडळा’चे आहे. ‘मराठा हितवर्धक मंडळ’या संस्थेच्या कार्यक्रमासाठी डोंबिवलीतील एका नावाजलेल्या ज्ञाती समाज संस्थेने त्यांचे सभागृह भाड्यानेसुद्धा देण्यास नकार दिला होता. त्यावेळी या संस्थेच्या तत्कालीन संस्थापक कार्यकर्त्यांनी आपल्या संस्थेचे सभागृह असावे, असा दृढ निश्चय केला आणि समाजाच्या सर्व ज्ञाती बांधवांनी मिळून निधी उभा करून सर्व प्रथम संस्थेसाठी डोंबिवली पश्चिमेला एक जागा विकत घेतली. त्यावर मराठा मंडळाची दुमजली इमारत उभी राहिली. एका झालेल्या अपमानामुळे एकवटलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या समाजाची स्वतंत्र अशी वास्तू उभारल्याची डोंबिवलीतील ही एक आगळीवेगळी कहाणी म्हणावी लागेल.·१९६६ साली समाजातील लोकांना शुभकार्यासाठी एखादी वास्तू असावी या भावनेतून या मंडळाचा पाया रोवण्यात आला. सद्यस्थितीला या संस्थेचे स्वरूप व्यापक झाले असून सर्व समाजघटकासाठी या माध्यमातून काम केले जाते.

 

प्रतिकूल परिस्थितीत उदयास आलेल्या मंडळाच्या यशामध्ये संस्थापक व संस्थाचालकांचा बहुमोलाचा वाटा आहे. १९६६ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर या मंडळाची स्थापना करण्यात आली. १९७० मध्ये मंडळ नोंदणीकृत स्वरूपात मंडळाची घटना तयार झाल्यानंतर बाबासाहेब रामचंद्र देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्थ मंडळ आणि त्यांच्या अधिपत्याखाली काम करणारे कार्यकारी मंडळ गठीत करण्यात आले. १९७५ साली या मंडळाची वास्तू पूर्ण झाली. ही वास्तू टप्प्या-टप्प्याने बांधून घेण्यात आली व स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला त्याचे उद्घाटन झाले. त्यावेळेचे अ‍ॅड. जनरल डॉ. रामराव आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला व सभागृहाच्या रूपात उभ्या राहिलेल्या वास्तूला ‘मराठा मंदिर’ हे नाव देण्यात आले.

 

मराठा हितवर्धक मंडळाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल पाहता आजच्या घडीला संस्थेचे तीन हजार सभासद आहेत. आजवरच्या संस्थेच्या वाटचालीत गोपाळराव राणे, श्रीधर सावंत, भाई खानविलकर, सुरेंद्र विचारे, केशवराव साळवी, जगन्नाथ गुजर, चंद्रकांत पवार, गणपतराव कागदे, मीराबाई कागदे, मधुकर कदम, श्रीरंग बाबर, रघुनाथ सुर्वे आदींचे मोलाचे योगदान लाभले आहे. सद्यस्थितीला मंडळाच्या अध्यक्षपदी राजेंद्र बने आहेत. वार्षिक स्नेहसंमेलन, शिवजयंती उत्सव, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, व्याख्यानमाला, आरोग्य शिबीर, मंडळाचा वर्धापन दिन, दसरा संमेलन, तर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वार्षिक कौटुंबिक सहल आणि गुढीपाडवा शोभायात्रेत सहभाग असे दरवर्षीचे उपक्रम ठरविण्यात आले आहे. त्याचबरोबर श्रावणी मेळावा, भोंडला, तीळगूळ समारंभ, जागतिक महिला दिनी विशेष कार्यक्रम असेही उपक्रम केले जातात. मराठा समाज संघटित व बलवान करणे, भारताच्या उज्ज्वल परंपरेस अनुसरून राष्ट्रकार्यासाठी विद्यार्थ्यांचे आत्मबल वाढविणे, मागासलेल्यांची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, शारीरिक व आर्थिक अशी सर्वांगीण उन्नती घडवून आणणे, राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने सर्वांना सुसज्ज करणे, गरीब, योग्य व होतकरू मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत येणार्‍या अडचणी दूर करणे, पुस्तक पेढी काढणे, विशेष गुणवत्ता दाखविणार्‍या विद्यार्थी / विद्यार्थिनींना पारितोषिके देणे, त्यांना सभाधीट करण्यासाठी व उन्नतीकरिता मार्गदर्शन करणे, सभागृह, मंगल कार्यालय व सांस्कृतिक केंद्र स्थापणे व चालविणे व त्यासाठी स्वत:ची भव्य वास्तू उभारणे, शाळा, वाचनालय, ग्रंथालय, वसतिगृह, दवाखाना, योगवर्ग व वृद्धाश्रम स्थापणे व चालविणे, सुशिक्षित बेकारांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगधंदे व नोकर्‍या उपलब्ध करून देणे, क्रीडा शाखा स्थापन करणे, अंतर्गत व्यायामशाळा स्थापणे, योगिक, बौधिक स्पर्धा आयोजित करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांत सहभागी होणे, मैदानी स्पर्धा व सामने आयोजित करणे, त्याकरिता मंडळाने स्वतंत्र नियम करून त्यानुसार क्रीडा कार्यपद्धती अनुसरणे, युवक व महिला यांच्या उन्नतीच्या व परस्पर सहकारी तत्त्वाच्या योजना हाती घेणे, या तत्त्वांवर संस्थेचे काम सुरू आहे.

 

मंडळाचा टेबल टेनिस विभाग गेले ३८ वर्षे कार्यरत आहे. वाचनाची आवड जोपासणार्‍यांच्या अनुषंगाने गेल्या १८ वर्षांपासून मंडळाचे ग्रंथालय सुरू आहे. व्यायामशाळा, संगणक प्रशिक्षण, नृत्याचे वर्ग, कराटे प्रशिक्षण तसेच महिलांसाठी स्वास्थ्य योगवर्ग विनामूल्य चालविले जातात. मंडळाकडून काही कल्याणकारी योजनादेखील राबविल्या जातात. उच्च शिक्षणासाठी एक लाखांपर्यंत कर्जाऊ शिष्यवृत्ती अल्प व्याजदरात दिली जाते. दुर्बल असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यासाठी मदत दिली जाते. याचबरोबर ‘कॅन्सर हार्ट रीलिफ फंड यातूनही रुग्णांना आर्थिक साहाय्य दिले जाते. मंडळाची व्यायामशाळा १८ वर्षांपासून कार्यरत आहे. वधू-वर सूचक मंडळ, अंबिका योग कुटीर ठाणे संचालित महिला स्वास्थ्य योग वर्ग कार्यरत आहे. काही दानशूर व्यक्तींनी ठेव ठेवलेल्या व्याजातून व मंडळाच्या उत्पन्नातून सभासद व त्यांच्या पाल्याकरिता शालांत, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदविका, पदवीधर, उच्चपदवीधर अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येतो.

 

मराठा हितवर्धक मंडळाचा ५२ वा वर्धापन दिन आणि त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दसरा संमेलनास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त गोविंद बोडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अनेक संस्था उदयास येत असतात. मात्र, त्या काळाच्या ओघात टिकत नाहीत. ज्या संस्थेकडे नि:स्वार्थपणे काम करणारे कार्यकर्ते असतात, त्याच संस्था टिकतात. ‘मराठा हितवर्धक मंडळ’ ही संस्था अशाच नि:स्वार्थी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे तब्बल ५२ वर्षे टिकली व अजूनही टिकून आहे, ही बाब साधी नाही. “कल्याण-डोंबिवलीचा नवा इतिहास भविष्यात कधी लिहिला जाईल, त्यावेळी ‘मराठा हितवर्धक मंडळा’च्या कार्याची दखल घ्यावी लागेल,” असे गौरवोद्गार कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी काढले आहेत.

 

कार्यकारी मंडळ

 

राजेंद्र बने (अध्यक्ष), गजानन आणेराव (उपाध्यक्ष), निखील माने (कार्यवाह), निलेश सावंत (सहकार्यवाह), अशोक नाईक (खजिनदार), सदस्य - उमेश चाळके , धनंजय चाळके, मारुती माने, नारायण देसाई, विजय शेलार, उमेश आयरे, अमित साटम, ज्ञानेश्वर सावंत, वर्षा कदम, स्मिता बागवे. विश्वस्त विद्याधर शेलार, चंद्रकांत माने (कार्यकारी विश्वस्त), श्रीराम चाळके, सदानंद तावडे, नीता भोसले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat